चिन्मय पाटणकर
गेल्या काही दिवसांत राज्याला पावसाने झोडपले. त्यामुळे बहुतांश भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली, तर काही ठिकाणी भूस्खलन होण्याचे प्रकारही झाले. मात्र यंदा पाऊस लांबल्याने पाण्याचा प्रश्न या पावसाने सोडवला ही दिलासादायक बाब… इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास अरबी समुद्रात तयार झालेली द्रोणीय स्थिती कारणीभूत होती. द्रोणीय स्थिती हा पाऊस पडण्यातील मोठा हवामानशास्त्रीय घटक आहे. म्हणूनच हवामानातील द्रोणीय स्थिती, त्याची कारणे आणि त्याचे होणारे परिणाम समजून घेणे आवश्यक ठरते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामानातील द्रोणीय स्थिती म्हणजे काय?

द्रोणीय स्थिती म्हणजे पानांचा द्रोण किंवा इंग्रजी व्ही सारखा आकार असतो. त्याला इंग्रजीत ‘ऑफशोअर ट्रफ’ म्हणतात. ही द्रोणीय स्थिती अरबी समुद्रात म्हणजे भारताच्या पश्चिमेला असलेल्या गुजरातपासून केरळपर्यंत संपूर्ण किंवा कोणत्याही ठरावीक भागात तयार होते. त्यात द्रोणाच्या आकाराचा निमूळता भाग समुद्राच्या पृष्ठभागावर असतो. उंच आकाशात शून्य किलोमीटर ते बारा किलोमीटरपर्यंत कोणत्याही उंचीवर किंवा दोन समान हवेच्या दाबाच्या मध्यभागी एखादा एकाकी खाली गेलेला हवेचा दाब असल्यास त्याला द्रोणीय स्थिती म्हटले जाते. उदाहरणार्थ, किनारपट्टीपासून पश्चिमेकडे एक ते दोन किलोमीटरवर हवेचा दाब एक हजार दोन मिलिबार आहे आणि तिथून सात किलोमीटरवर तेवढाच हवेचा दाब असल्यास आणि पाण्याच्या पृष्ठभागी हवेचा दाब ९९६ किंवा ९९८ मिलिबार असल्यास द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जाते. काही वेळा द्रोणीय स्थिती भूभागावरही तयार होऊ शकते.

द्रोणीय स्थिती कशी तयार होते?

द्रोणीय स्थिती कशी तयार होते या बाबत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे सांगतात, की जागतिक पातळीबरोबर आपल्या देशाच्या भूभागावरही हवेच्या दाबाचे पट्टे तयार होत असतात. ते हंगामानुसार बदलत असतात. प्रत्येक महिन्याला, दिवसाला सरासरी हवेच्या दाबाचे पट्टे ठरलेले असतात. भूमीवर किंवा समुद्रावरील ज्या बिंदूवर सारख्या प्रमाणात हवेचा दाब असतो, त्या ठिकाणाला समदाबाची ठिकाणे म्हणतात आणि ही समदाबाची ठिकाणे ज्या रेषेने जोडली जातात त्याला आयसोबार म्हणतात. जुलैमध्ये भारतात आयसोबार पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात. त्याच्या समांतर रेषा उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत तयार होतात. पृथ्वीच्या चलनवलनामुळे त्या-त्या वेळी, त्या-त्या ठिकाणी हवेचे दाब तयार होतात. तसेच मान्सून काळात अरबी समुद्रात हवेचे दाब तयार होतात आणि आयसोबार दरम्यान एकाएकी कमी दाबाची घळ तयार झाल्यास त्याला द्रोणीय स्थिती म्हटले जाते. द्रोणीय स्थिती विशेषतः जून, जुलै, ऑगस्टमध्ये तयार होते. द्रोणीय स्थिती तयार होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. द्रोणीय स्थिती तयार होण्यास भारतीय समुद्रीय द्विध्रुवता (इंडियन ओशन डायपोल) हा घटक सकारात्मक असणे अधिकच पूरक ठरते.

द्रोणीय स्थितीचा परिणाम काय होतो?

द्रोणीय स्थिती तयार होणे पावसासाठी अनुकूल असते. या द्रोणीय स्थितीमुळे मोसमी पावसाच्या अरबी समुद्राच्या शाखेतून पश्चिम किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्याच्या पश्चिमेकडील चार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र द्रोणीय स्थितीची तीव्रता किती त्यावर पावसाचे प्रमाण कमी-जास्त होते. द्रोणीय स्थिती तीव्र स्वरूपाची असल्यास समुद्राच्या पृष्ठभागापासून त्याची उंची जास्त असते. तीव्र स्वरूपाच्या द्रोणीय स्थितीमध्ये वारे द्रोणाच्या निमुळत्या आकारात येऊन आदळतात आणि तितक्याच वेगाने ते घाटमाथ्याच्या उंचीपर्यंत जाऊन आदळतात. द्रोणीय स्थिती तीव्र असताना घाटमाथा, पश्चिम किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यास भरपूर पाऊस पडतो.

सध्या असलेल्या द्रोणीय स्थितीमध्ये काय बदल संभवतात?

येत्या दोन-तीन दिवसांत सध्याची द्रोणीय स्थिती काहीशी विरळ झाल्यास १८ जुलैपासून थोडी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. मात्र, काही वेळा द्रोणीय स्थिती संपूर्णपणे नाहीशी होऊनही कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस पडू शकतो. केवळ त्यासाठी अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य किंवा पश्चिमकेडून येणारे मोसमी वारे बळकट असण्याची आवश्यकता असते. द्रोणीय स्थितीमध्ये पावसाची तीव्रता मात्र अधिक असते, असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे सांगतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what are the consequences of extreme weather conditions print exp abn