तलिबानने महिलांना अफगाणिस्तानमध्ये योग्य हक्क दिले जातील असं म्हटलं आहे. शरिया कायद्यानुसार हे हक्क दिले जातील असं तालिबानने स्पष्ट केलं आहे. मात्र तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून चर्चेत असणारा हा शरिया कायदा नक्की आहे तरी काय? तालिबानच्या शरिया कायद्यामध्ये नक्की काय वेगळं आहे हा प्रश्न अनेकांना पडला. त्यावर टाकलेली ही नजर.
शरिया म्हणजे काय?
मुस्लीम धर्मशास्त्र पंडितांनी कुराण व सुन्नतच्या आधाराने संशोधन करून इस्लामी धर्मशास्त्र तयार केलेले आहे. कुराण व पगंबराचे सुन्नतचे आदेश जे समाजाच्या व व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित आहेत. ते महत्त्वाचे व अविभक्त भाग असल्यामुळे त्यांचा दर्जा परमेश्वराच्या कायद्याप्रमाणे आहे असे मानले जाते. असेही म्हटले जाते की शरियाचे पालन करण्याची आज्ञा कुराणमध्ये दिली आहे. याचा अर्थ शरिया कायदा रूढी, प्रथा, परंपरेने चालत आलेले नियम आहेत व त्याला कायद्याची उपमा दिलेली आहे. शरिया जे समर्थक असे मानतात की ती दैवी व अपरिवर्तनीय आहे. असं मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्या रुबिना पटेल यांनी काही वर्षांपूर्वी लोकसत्ताच्या संघर्ष संवाद सदरात लिहिलेल्या लेखामध्ये म्हटलं आहे. (हा लेख तुम्ही येथे क्लिक करुन वाचू शकता)
तालिबानने शरियाच्या मूळ कायद्यात बदल करुन आपला स्वत:चा शरिया कायदा बनवलाय. तालिबानच्या सांगण्यानुसार शरिया कायद्यामध्ये कशाला परवानगी आहे कशाला नाही यासंदर्भातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे…
> महिला खरेदीसाठी बाजारामध्ये जाऊ शकतात का?
हो त्या जाऊ शकतात. मात्र बाजारामध्ये जाताना महिलांसोबत त्यांच्या कुटुंबातील एखादा पुरुष (लहान मुलगा किंवा प्रौढ) सोबत असणं बंधनकारक असल्याचं यापूर्वी अफगाणिस्तानवर सत्ता असताना बनवलेल्या नियमांमध्ये म्हटलं होतं.
नक्की वाचा >> भारताने पाठवलेली मदत पण… तालिबानने राष्ट्राध्यक्षांचाच मृतदेह जेव्हा राजवाड्यासमोरील सिग्नलवर टांगला
> महिला मैत्रिणींसोबत बाहेर जाऊ शकतात का?
यापूर्वी तालिबानची अफगाणिस्तानवर सत्ता होती तेव्हा त्यांनी महिलांना घरात कोंडून ठेवल्याप्रमाणे नियम बनवले होते. त्यानुसार महिलांना मैत्रिणींसोबत घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती.
> महिला पुरुषांसोबत बोलू शकतात का?
तालिबानने महिलांनी १२ वर्षांवरील पुरुषांशी किंवा कुटुंबाचा सदस्य नसणाऱ्या पुरुषांशी बोलू नये असा नियम शरिया कायद्याअंतर्गत केलाय.
> महिलांना शिक्षणाचा अधिकार आहे का?
महिलांना शिक्षणाचा अधिकार असला तरी त्यांना नियमितपणे शाळेत पाठवण्यास बंदी आहे. ज्या शाळा, कॉलेज आणि मदरश्यांमध्ये पुरुष जातात तिथे महिलांना जाऊ दिलं जात नाही.
नक्की वाचा >> अफगाणिस्तान सोडताना चार गाड्या भरुन पैसा नेला?; अशरफ घनी यांनी दिलं सविस्तर स्पष्टीकरण
> महिलांना मेकअप करण्याची परवानगी आहे का?
तालिबानने १९९६ ते २००१ दरम्यान सत्तेत असताना महिलांनी नेलपॉलिशही लावू नये असं आपल्या शरिया कायद्यामध्ये म्हटलं होतं.
> महिलांना गाणी वाजवण्याचा नाचण्याचा अधिकार आहे का?
तालिबानच्या शरिया कायद्यानुसार संगीत हे बेकायदेशीर गोष्ट आहे. पार्ट्यांमध्ये गाणी वाजवणाऱ्यांना आणि नाचणाऱ्यांना तालिबानने शिक्षा केल्याची उदाहरणं आहेत.
> महिलांना कार्यालयामध्ये जाऊन काम करण्याची परवानगी आहे का?
तालिबानने महिलांना काम करण्याची परवानगी देण्यात येईल असं म्हटलं आहे. मात्र समोर आलेल्या बातम्यानुसार बँका तसेच सरकारी संस्थांमधील महिला कर्मचाऱ्यांना तालिबान्यांनी घरी नेऊ सोडलं. त्यानंतर त्यांनी तुमच्या जागी तुमच्या घरातील पुरुषांना कामावर पाठवा असंही सांगितलं.
नक्की वाचा >> “…तर पुन्हा एकदा अफगाणी जनतेसमोर राष्ट्राध्यक्षाला फासावर लटकवलं असतं”; घनी यांनी व्यक्त केली भीती
> बुरखा घालणं बंधनकारक आहे का?
होय. शरिया कायद्यानुसार सौंदर्याचं प्रदर्शन करणं चुकीचं आहे. आठ वर्षांवरील मुलीने बुरखा घालणं बंधनकारक असल्याचं तालिबानचे नियम सांगतात. जेव्हा महिला कुटुंबातील पुरुषांबरोबर बाहेर पडतात किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलतात तेव्हा बुरखा सक्तीचा आहे.
> महिलांच्या बोलण्यासंदर्भातही आहेत का बंधनं?
महिलांनी कसे बोलावे याबद्दलही तालिबानने शरियाअंतर्गत नियम केलाय. त्यानुसार महिलांनी एवढ्या हळू आवाजात बोलणं अपेक्षित असतं की त्यांचा आवाज अनोळखी व्यक्तींना ऐकू जाता कमा नये. हा नियम महिला महिला जमल्या तरी किंवा सार्वजनिक ठिकाणी सारखाच आहे.
> महिलांना हाय हिल्स घालण्याची परवानगी आहे का?
तालिबानने हाय हिल्सवर बंदी घातलीय. महिला चालताना त्यांच्या पावलांचाही आवाज येता कामा नये असं तालिबानच्या नियमांमध्ये आहे.
> बाल्कनीमध्ये बसण्यास परवानगी आहे का?
तालिबानच्या शरिया कायद्यानुसार महिलांना बाल्कनीमध्ये बसण्याचीही परवानगी नाहीय.
> महिला मॉडेलिंग करु शकतात का?
महिलांचे फोटो काढणे, चित्रिकरण करण्यावर बंदी आहे. वृत्तपत्र, पुस्तके, पोस्टरवर महिलांचे फोटो असता कामा नये असं तालिबानचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> तालिबानचा लसीकरणाला विरोध : अफगाणिस्तानला करोना, पोलिओचा धोका; लसीकरणची टक्केवारी आहे अवघी ०.६ %
> नियम मोडला तर शिक्षा काय?
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना तालिबानच्या राजवटीमध्ये कठोर शिक्षा देण्यात येते. यामध्ये सार्वजनिकरित्या बदनाम करणे, दगडाने ठेचून मारणे. चाबकाचे फटके मारणे अशा शिक्षांची तरतूद आहे.