म्यानमारमध्ये लष्कराने बंड करत लोकप्रिय नेत्या आंग सान सूू ची यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाचं सरकार बरखास्त केलं. एक फेब्रवारी रोजी आंग सान सूू यांना ताब्यात घेत सत्तांतर झालं. मात्र या सत्तांतरणाला स्थानिकांनी विरोध केला असून देशभरामध्ये हजारोच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. ‘लाँग लिव्ह मदर सू’ आणि ‘लष्करी हुकूमशाहीचा निषेध असो’ अशा घोषणा देत हजारो नागरिक लष्करी हुकूमशाह कमांडर-इन चीफ जन. मिन आँग हलेइंगविरोधात घोषणा देत आहे. तसेच लोकशाही व्यवस्थेच्या समर्थनार्थ अनेकजण या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सत्तांतरणाला विरोध करताना अनेक लोकशाहीवादी आंदोलनकर्ते तीन बोटांनी आकाशाकडे सलाम करत आपला विरोध नोंदवत आहेत. मात्र हा तीन बोटांनी करता येणारा सलाम खास आहे. या तीन बोटांचा सलाम नक्की आहे तरी का आणि तो कुठून आला आहे?, त्याचा अर्थ काय यासंदर्भात आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.
खरं तर म्यानमारमधील आंदोलकांकडून वापरण्यात येणारा तीन बोटांचा सलाम हा विरोधाचं प्रतिक बनला आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये थायलंडमधील राजाविरोधात लोकशाहीचं समर्थन करणाऱ्या आंदोलकांनी ही निदर्शने केली त्यावेळेसही विरोध करण्यासाठी हा तीन बोटांचा सलाम वापरण्यात आला. म्यानमारमध्ये सर्वात आधी सत्तांतरणाला विरोध करण्यासाठी हा तीन बोटांचा सलाम येथील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वापरला. त्यानंतर तरुणांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं सरकार पाडल्याच्याविरोधात आंदोलन करताना हा तीन बोटांचा सलाम वापरला. सत्तांतरणानंतर पुढच्याच रविवारी यांगूनच्या निरनिराळ्या भागांत निदर्शने सुरू करण्यात आली. या आंदोलकांनी हा तीन बोटांचा सलाम आपल्या आंदोलनाची निशाणी म्हणून वापरण्यास सुरुवात केलीय.
Shame on you China : म्यानमारमधील सत्तांतरणाविरोधात चिनी दूतावासासमोर नागरिकांचे आंदोलनhttps://t.co/jA9jSAkIs5
कमांडर-इन चीफ जन. मिन आँग हलेइंगविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर#China #myanmar #myanmarmilitarycoup #Myanmarcoup #MyanmarDemocracy #Myanmarprotests #MyanmarProtest— LoksattaLive (@LoksattaLive) February 15, 2021
हा सलाम नक्की आला तरी कुठून?
खरं तर हा असा तीन बोटांनी सलाम करण्याची पद्धत सुझॅन कॉलिन्सचे चित्रपट आणि हंगर गेम्स पुस्तकामधून झाली. हा सलाम करताना अंगठ्याने हाताची सर्वात छोटं बोटं म्हणजेच करंगळी दाबून तीन बोटांनी सलाम केला जातो. हा सलाम पुस्तक आणि चित्रपटाच्या कथेनुसार काल्पनिक जगातील हुकुमशाह असणाऱ्या प्रेसिडंट स्नो च्या शासनाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना केला जातो. हा सलाम म्हणजे हुकूमशाहीविरोधातील एकतेचे प्रतिक असल्याचं कथेत दाखवण्यात आलं आहे.
थायलंडमध्येही दिसला हा सलाम
दक्षिण आशियामध्ये असणाऱ्या म्यानमारमधील लोकांनी आपल्या नेत्या आंग सान सूू यांना बळजबरीने ताब्यात घेण्याच्या निर्यणावरोधात झेंडे, बॅनर आणि पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरलेत. या आंदोलनकर्त्यांनी हाच तीन बोटांचा सलाम करत आम्ही एक आहोत आणि आमचा या हुकूमशाहीला विरोध आहे हे दर्शवण्यासाठी हा सलाम वापरण्यास सरुवात केलीय. मात्र यापूर्वीही २०१४ साली पहिल्यांदा थायलंडमध्ये आंदोलन झालं तेव्हा हा सलाम वापरण्यात आला होता. यावेळेस थायलंडमधील तरुणांनी लष्कराने सत्ता ताब्यात घेण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठवताना हा सलाम वापरला होता. तीन बोटांचा सलाम पहिल्यांना म्यानमारमध्ये हाँगकाँगच्या लोकशाहीवादी आंदोलनामध्ये वापरण्यात आला.
इतका लोकप्रिय झाला की…
पाहता पाहता हा सलाम हुकूमशाही व्यवस्थेला विरोध करण्याचं प्रतिक म्हणून वापरला जाऊ लागला. जवळजवळ प्रत्येक रॅलीमध्ये हा सलाम दिसून लागला. या सलाम इतका लोकप्रिय झाला की थायलंडमधील लष्कराने यावर बंदी घातली. मात्र त्यानंतरही अनेकदा आंदोलकांनी हा सलाम वापरला. यानंतर २०१४ साली हाँगकाँगमधील बहुचर्चित अंब्रेला रिव्हल्यूशनच्या काळातही हा तीन बोटांचा सलाम आंदोलनकर्त्यांनी वापरला.
इंटरनेटची सुरुवात…
खरं तर २०१० मध्ये म्यानमारमध्ये लोकशाही सरकार यावे यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. या कालावधीमध्ये देशातील लोकांना जगभरातील लोकांशी जोडण्याच्या उद्देशाने इंटरनेटची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय क्रांतीकारी ठरला. इंटरनेटमुळे म्यानमारमधील तरुणांना जगभरातील संस्कृती आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळू लागली. म्यानमारमधील लोकांनी पेपे आणि फ्रॉगसारख्या गोष्टींचाही वापर विरोध दर्शवण्यासाठी केला. २०१६ साली याचा वापर अमेरिकेतील आंदोलनातही करण्यात आला.