शैलजा तिवले :-
विंचूदंशावरील लस संशोधन हा विषय डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी विंचूदंशावरील प्रतिलशीचे संशोधन स्वत: केल्याचा दावा करत त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, असा आरोप या लशींच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरांनी केला आहे. विंचूदंशावरील लशीची निर्मिती आणि प्रभावीपणा याबाबत समजून घेऊ.
मुलाखतीमध्ये डॉ. बावस्करांनी काय म्हटले? –
विंचूदंशावरील प्रतिलस प्रभावी असून यामुळे रुग्ण सहा तासांमध्ये बरा होतो. प्रतिलशीच्या चाचण्या केल्या. त्यावरही संशोधन केले. याची दखल आंतराष्ट्रीय नियतकालिकाने घेतली. आता कोणत्या रुग्णाचा विंचूदंशाने मृत्यू झाला तर माझे संशोधन अयशस्वी झाले, असे वक्तव्य डॉ. बावस्कर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले होते.
वाद का निर्माण झाला? –
या मुलाखतीमध्ये डॉ. बावस्कर यांनी आपणच लशीचे संशोधन केल्याचा दावा केला आहे. मात्र, हे संशोधन हे हाफकिनने केले असून त्याचे संपूर्ण श्रेय हाफकिनचे आहे, असे या लशीच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये सक्रिय असलेले रत्नागिरीचे डॉ. विवेक नातू यांचे म्हणणे आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाला दिले जाणारे प्रोझोसिन हे औषध विंचूदंशावर प्रभावशाली असल्याचा शोध डॉ. बावस्कर यांनी लावला. त्यांनी अनेक रुग्णांना प्रोझोसिनचा वापर करून वाचविले. प्रोझोसिन औषध दिल्यावर रुग्णावर पुढील २४ ते ४८ तास बारकाईने लक्ष ठेवावे लागत असे. त्यामुळे यातून रुग्ण बरे होण्यास बराच कालावधी लागत होता. विंचूदंशावरील प्रतिलशीचा शोध १९९७ साली हाफकिन संस्थेने लावला. त्यावेळी मात्र डॉ. बावस्करांनी ही लस उपयोगी नाही असा दावा करून या लशीच्या वापराला मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यांच्या या विरोधामुळे २००५ साली तत्कालीन आरोग्य विभागाने लशीचा वापर न करता फक्त प्रोझोसिनचा वापर करण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे या लशीचा वापर सुरुवातीच्या काळात फारसा केला गेला नाही, असे डॉ. नातू यांचे म्हणणे आहे. डॉ. नातू यांचे निष्कर्ष पाहून डॉ. बावस्कर यांचा १९९७पासून या लशीला असलेला विरोध मावळला आणि त्यांनी ही लस उपयोगी असल्याचे २००७ साली मान्य केले. त्यांनी केलेल्या विरोधामुळे तोपर्यंत अनेक रुग्णांचे नुकसान झाले. त्यानंतर डॉ. बावस्करांनी २०११ साली ही लस प्रभावी असल्याचे संशोधन जाहीर केले. यासाठीची माहिती आम्ही केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून त्यांनी चोरली आहे. तसेच अशा कोणत्याही वैद्यकीय चाचण्या अन्य ठिकाणी सुरू असल्याचे माहिती नाही, असा उल्लेखही या अभ्यासामध्ये केला आहे. परंतु प्रत्यक्षात २००७ साली आमचे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर याची तपशीलवार माहिती मी डॉ. बावस्करांना दिली आहे. त्यामुळे डॉ.बावस्कर खोटे बोलत आहेत असा आरोप डॉ. नातू यांनी केला आहे.
लशीच्या वैद्यकीय चाचण्या कशा सुरू झाल्या? –
डॉ. नातू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लशीच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या. ही लस प्रोझोसिन दिलेल्या रुग्णाला दिल्यास काही तासांतच रुग्ण बरा होतो. त्यामुळे ही लस अधिक प्रभावी असल्याचे पहिले संशोधन डॉ. नातू यांनी केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. रवी बापट यांच्या मार्गदर्शनाखाली २००७ साली प्रसिद्ध केले. रुग्णांना लशीची किती प्रमाणात मात्रा देणे गरजेचे आहे आणि रुग्णांचे वर्गीकरण कसे करावे याचा अभ्यास दहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर मांडण्य़ात आला.
डॉ. बावस्कर यांचे म्हणणे काय आहे? –
लशीचे संशोधन केल्याचा दावा आपण वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाही. लशीचे संशोधन हे हाफकिननेच केले आहे. लशीला आपला सुरुवातीला विरोध होता. परंतु विज्ञान बदलत राहते, त्यानुसार लस फायदेशीर असल्याचे जाणवल्यामुळे आपले मत बदलले. लशीचे संशोधन प्रसिद्ध करण्यापूर्वी २०११ साली नातू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लस प्रभावी असल्याचे संशोधन प्रसिद्ध केले होते. वैद्यकीय चाचण्यांमध्ये आपल्याला जे आढळले तेच आपण प्रसिद्ध केले. त्यामुळे संशोधनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चुकीचा आहे. आपल्याला पद्मश्री हा एकूण वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामाच्या आधारे दिलेला आहे, असे डॉ. बावस्कर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.