विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब सायबर पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे. याआधी वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी फडणवीसांना बजावली होती. मात्र, भाजपाने याविरोधात आक्रमक होत शक्तिप्रदर्शनाची तयारी केल्याने पोलिसांनी फडणवीस यांच्या घरी जाऊन जबाब नोंदविण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

बीकेसी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांतर्फे देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर त्यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. पोलीस बदली घोटाळा प्रकरणात अहवाल लीक झाल्याप्रकरणी फडणवीसांना बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर फडणवीसांनीह आपण हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी फडणवीसांच्या घरी जाऊन जबाब नोंदवून घेण्यात येत आहे.

फडणवीसांच्या नोटिशीविरोधात भाजपा आक्रमक

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा गोपनीय अहवाल फुटल्याने गोपनीयता कायद्याचा भंग, तसेच त्यांनी बेकायदा दूरध्वनी टॅपिंग केल्याप्रकरणी मुंबई व पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलिसांनी पाठविलेल्या प्रश्नावलीला फडणवीस यांनी उत्तर न दिल्याने त्यांना रविवारी सकाळी ११ वाजता सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे जाहीर केले आणि भाजपe नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. भष्टाचार करणाऱ्यांना सोडून तो उघड करणाऱ्यांवर राजकीय हेतूने कारवाई होत असल्याची टीका आमदार आशीष शेलार यांनी केली होती. राज्यभरात देवेंद्र फडणवीसांना आलेली मुंबई पोलिसांची नोटीस जाळून निषेध नोंदवण्यात येत आहे. यावेळी महाविकास सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसह शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी तातडीची सुनावणी पार पडली. यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात शुक्लां यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून २५ मार्चपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. 

राज्य गुप्तचर विभागाच्या कागदपत्रांच्या गहाळ होण्याच्या प्रकरणाच्या संदर्भात आयटीएस तपासात मुंबई सायबर पोलिस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्षीदार म्हणून चौकशी करत आहे. याआधीही फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीचा हवाला देत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कागदपत्रे मागण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली होती.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये लाच घेतल्याचा दावा

देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२१ मध्ये महाराष्ट्रात उच्च पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लाचखोरी सुरू असल्याचा आरोप केला होता होता. त्यावर त्यांनी गुप्तचर विभागाच्या अहवालाचा हवालाही दिला होता. मात्र सरकारी कागदपत्रे गहाळ झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी त्याला समन्स बजावले होते.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा समावेश असलेल्या राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) कागदपत्रांच्या गहाळ होण्याच्या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्यांचे महत्त्वाचे साक्षीदार असल्याची माहिती मुंबई सायबर सेलने न्यायालयाला दिली होती. गृह मंत्रालयाकडून कागदपत्रे आणि तांत्रिक पुराव्यांची मागणी राज्य सरकारने केली होती.

२३ मार्च २०२१ रोजी एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी काही कागदपत्रे आणि तत्कालीन एसआयडी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ तयार केलेल्या अहवालांकडे लक्ष वेधले. त्यांनी असा दावा केला होता की राज्याने अहवालावर कारवाई केली नाही आणि म्हणून ते पेन ड्राईव्हसह संपूर्ण साहित्य गृहमंत्रालयाकडे सोपवणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी, फडणवीस यांनी शुक्ला यांनी तत्कालीन पोलिस महासंचालकांना कथितपणे लिहिलेल्या पत्राचा हवाला दिला होता. त्या पत्रात फोन टॅपिंगचा तपशील होता. या प्रकरणानंतर रश्मी शुक्ला यांच्यावरही परवानगीशिवाय सरकारी नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता. या पत्रानंतरच फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यातच आता माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यात येत आहे.