इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. तसा इस्रायल आणि पॅलेस्टाइन हा संघर्ष मागील अनेक वर्षांपासून चालत आला आहे. मात्र सोमवारपासून जुन्या जेरुसलेम शहराजवळ दोन्ही बाजूने हल्ले केले जात आहेत. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लीम आणि अर्मेनियन लोकांसाठी महत्वाचं धार्मिक स्थळ असणाऱ्या या ठिकाणाला आता जवळजवळ युद्धभूमीचं स्वरुप आलं आहे. मध्य पूर्व आशियामध्ये उफाळून आलेल्या या संघर्षामागे काही तात्कालीन कारणंही आहेत. सोमवारपासून हमासने इस्रायलवर १६०० हून अधिक रॉकेट्स डागल्याचा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला आहे. यापैकी ४०० रॉकेट्स गाझा पट्टीमध्येच पडली. इस्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीम या प्रणालीने सुमारे शंभर रॉकेट्स आकाशातच निकामी केले. आयर्न डोम ही इस्रायलची लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे हाणून पाडण्याची प्रणाली आहे. २०११ पासून ही यंत्रणा उपयोगात आहे.
या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमधील ६०० ठिकाणांवर हल्ला केल्याचं असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे गाझा पट्टीमध्ये तळ ठोकून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनाही इस्रायलवर रॉकेट्सच्या माध्यमातून हल्ले सुरुच ठेवले आहेत. गाझामध्ये आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये १७ मुलांचाही मसावेश आहे. तर ४०० हून अधिक जण इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांमध्ये जखमी झालेत. तर दुसरीकडे दक्षिण इस्रायलमधील सात जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका सहा वर्षाच्या मुलाचही संमावेश असल्याचं एएफपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. इस्रायल आणि हमास दोघांनीही दिर्घ संघर्षाची तयारी दर्शवली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, हमासला या आक्रामकतेची खूप किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे. “ही तर केवळ सुरुवात आहे. येत्या काही दिवसांमध्ये हमासच्या काही वरिष्ठ कमांडर्सला आम्ही लक्ष्य करणार आहोत,” असंही नेतन्याहू यांनी सांगितलं आहे. इस्रायल आणि हमासमधील या युद्धामुळे जगभरात दोन गट पडले आहेत. एकीकडे इराणसहीत सर्व इस्लामिक देशांनी इस्रायलवर टीका केली असतानाच दुसरीकडे अमेरिकने इस्रायलचं समर्थन केलं आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बायडन यांनी या संघर्षासंदर्भात भाष्य करताना इस्रायलला आपलं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलं आहे. बुधवारी रात्री बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. जो बायडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना, “हा संघर्ष लवकरच संपेल अशी मला आशा आहे,” असं स्पष्ट केलं तसेच, “जेव्हा इस्रायलच्या सीमा ओलांडून हजारो रॉकेट त्यांच्यावर हल्ला करण्यात येत असेल तर त्यांना स्वत:चं संरक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे,” असंही बायडन म्हणालेत. सध्या सुरु असणारा संघर्ष हा गाझा पट्ट्यामध्ये इस्रायल आणि हमासदरम्यानचा २०१४ नंतरचा सर्वात मोठा संघर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हा संघर्ष कशामुळे सुरु झालाय यामागील कारणं अनेकांना ठाऊक नाहीयत. त्याचसंदर्भात आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
रमजान आणि घर सोडण्यासंदर्भातील धमक्या…
सध्या सुरु असणारा संघर्षाची ठिणगी ही इस्लाम धर्मियांच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल महिन्याच्या मध्यवर्ती कालावधीमध्ये पडली. इस्रायल पोलिसांनी जुन्या जेरुसलेम शहरातील दमासकर गेट परिसरामध्ये नाकाबंदी करुन सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवेश बंद केला. सामान्यपणे रमजानच्या महिन्यामध्ये शुक्रवारचा नमाज झाल्यानंतर इस्लाम धर्मीय लोकं या ठिकाणी एकमेकांना भेटतात. त्यामुळेच पोलिसांनी हा परिसर बंद केल्याने हिंसा उफाळून आली. पॅलेस्टिनींनी अशाप्रकारे प्रवेश बंदी करणे म्हणजे आमच्या एकत्र येण्याच्या स्वातंत्र्यावर इस्रायलकडून गदा आणली जात असल्याचा आरोप केला. नंतर येथील नाकाबंदी काढून टाकण्यात आली मात्र तोपर्यंत पॅलेस्टिनीवरुद्ध इस्रायली असा संघर्ष पेटला होता. यामागील दुसरं कारण ठरलं ते म्हणजे अनेक पॅलेस्टिनींना पूर्ण जेरुसलेममधील शेख जहार या परिसरातील त्यांनी घरं सोडून जाण्यास सांगण्यात आलं होतं. यासंदर्भात पॅलेस्टिनी विरुद्ध ज्यू लोकांदरम्यानच्या न्यायलयीन लढाई सुरु आहे. या संदर्भातील निकाल हा ११ मे रोजी लागणार होता मात्र या संघर्षामुळे तो पुढे ढकलण्यात आलाय.
अल अक्सा मशीद
जेरुसलेमच्या जुन्या शहरात असणाऱ्या अल अक्सा मशीदीजवळच्या परिसरामध्ये सध्या उफाळून आलेल्या हिंसेदरम्यान दोन्हीकडील लोक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. मुस्लीम धर्मियांसाठी अल अक्सा मशीद ही तिसरी सर्वात पवित्र जागा असल्याचं मानलं जातं. मोहम्मद पैगंबरांनी इथूनच इहलोक सोडला असं मुस्लीम धर्मीय मानतात. चर्च ऑफ होली सेपल्चर हे ख्रिस्ती लोकांसाठी महत्वाचं असणारं प्रार्थनास्थळही याच जुन्या जेरुसलेम शहरामध्ये आहे. येशू ख्रिस्तांचा मृत्यू आणि पुन:रुथ्थानाचा ऐतिहासिक वारसा या जागेला असल्याचं ख्रिस्ती लोकं मानतात. रोम सम्राज्याच्या काळात इसवी सन ७० मध्ये ज्यू धर्मियांसाठी पवित्र असणारं इथलं मंदीर पाडून टाकण्यात आलं. मात्र या मंदिराची पश्चिमेकडील भिंत आजही कायम असून ती या दोन जागांच्या जवळ आहे. ज्यू धर्मीयांसाठी आता हे मंदिराचे अवशेषच पवित्र स्थळ असून त्यांना पोटल किंवा पश्चिमी भिंत असं म्हटलं जातं. या मंदिराचा पाया ज्या भागी आहे तिथून जगाची निर्मिती झाली असं ज्यू मानतात. ज्या पठारावर अल अक्सा मशीद आहे तिथेच ज्यू धर्मियांसाठी पवित्र मानलं जाणारं डोम ऑफ रॉक म्हणजेच दगडी घुमट ही धार्मिक वास्त आहे. या वास्तूला ज्यू धर्मियांमध्ये फार मानाचं स्थान आहे. त्याचप्रमाणे येथे अर्मेनियन वंशाच्या लोकांसाठी पवित्र असणारी जागाही याच पठारावर आहे. या जेरुसलेम प्रशासनाने इतर शहरापासून वेगळ्या केल्या असून त्यामध्ये तटबंदी घातली आहे.
अल अक्सा मशीद असणाऱ्या या जागेचा ताबा शेजारच्या जॉर्डन देशाकडे आहे. येथील कारभार वफ्फ या गटामार्फत चालवला जातो. वर्षातील काही ठराविक काळासाठी पर्यटकांना अल अक्सा मशीदीमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र येथे केवळ मुस्लीम धर्मियांनाच प्रार्थना करण्यासाठी परवानगी आहे. मागील काही वर्षांपासून कट्टर आणि राष्ट्रवादी विचारसरणीचे ज्यू व्यक्ती पोलीस बंदोबस्तामध्ये तटबंदीच्या प्रवेशद्वारांपर्यंत जातानाचं चित्र पहायला मिळत आहेत. ज्यू धर्मीय लोक आता या मशीच्या तटबंदीजवळच्या भागामध्ये प्रार्थना सभांचे आयोजन करत आहे. अशाप्रकारे या ठिकाणी प्रार्थना करणं हे १९६७ साली इस्रायल, जॉर्डन आणि मुस्लीम धार्मिक संघटनांनी केलेल्या नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळेच पॅलेस्टिनींना ज्यू लोकांनी अशाप्रकारे अगदी मशीदीजवळ येऊन प्रार्थना करणं आणि या ठिकाणाला ज्यू धर्मियांनी भेट देणं हा उकसवण्याचा प्रकार असल्यासारखं वाटतं. त्यामुळेच येथे अनेकदा लहान मोठ्या प्रमाणात पॅलेस्टिनी विरुद्ध ज्यू असा संघर्ष घडत असतो.
या ठिकाणी सर्व धर्मियांना प्रार्थनेसाठी परवानगी देण्यात आली पाहिजे असं इस्रायलमधील काही लोक म्हणतात. मात्र पॅलेस्टिनींचा याला विरोध आहे. इस्रायल हळूहळू या ठिकाणाचा ताबा मिळवले किंवा त्याचं विभाजन करेल अशी भिती पॅलेस्टिनींना आहे. मात्र आम्हाला या ठिकाणी कोणताही बदल करण्याची इच्छा नसल्याचं इस्रायलकडून सांगण्यात येतं.
जेरुसलेम संघर्षाच्या केंद्रस्थानी
इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या सीमेजवळ असणारं जेरुसलेम हे वादाच्या केंद्रस्थानी आहे. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या जुनं जेरुसलेममधील टेकडी जगभरातील ज्यू लोकांना टेम्पल माऊंट म्हणून ठाऊक आहे. ज्यू धर्मियांसाठी ही सर्वात पवित्र जागा आहे. तर मुस्लीमांसाठीही अल अक्सा मशीदमुळे जुनं जेरुसलेम पवित्र धार्मिक स्थळांच्या यादीत तिसऱ्या स्थानी येतं. या ठिकाणी एकंदरीत मुस्लीम, ज्यू, ख्रिस्ती आणि अर्मेनिय अशा चार वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांसाठी महत्वाची अशी धार्मिक स्थळं आहेत.
इस्रायल कायमच जेरुसलेम हा देशाचा अविभाज्य भाग असल्याच सांगत आलं आहे. इतकच नाही तर जेरुसलेम ही देशाची राजधानी असल्याचंही इस्रायल सांगतं. इस्रायलने पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवला असून यामध्ये जुन्या जेरुसलेम शहराचाही समावेश आहे. १९६७ साली झालेल्या युद्धामध्ये इस्रायलने हा प्रदेश ताब्यात घेतला. याच प्रदेशाच्या आजूबाजूला गाझा पट्टीचा भाग आहे.
दुसरीकडे पॅलेस्टाइनला या जागा पुन्हा ताब्यात घ्यायच्या आहेत. या ठिकाणांवर ताबा मिळवून हीच पॅलेस्टाइनची राजधानी करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र इस्रायलने या शहराचा पूर्वेकडी भाग हा आपल्या देशासोबत जोडून घेतल्याची घोषणा केली. मात्र याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाही.
इतर धोरणंही जाचक
पूर्व जेरुसलेममध्ये जन्मलेल्या ज्यू व्यक्तींना इस्रायलचं नागरिकत्व देण्यात येतं. मात्र याच ठिकाणी जन्मलेल्या पॅलेस्टाइनींना इस्रायलकडून कायमचं नागरिकत्व देण्यात येत असलं तरी ठराविक काळ मर्यादेपेक्षा अधिक काळ शहराबाहेर राहिल्यास हे नागरिकत्व काढून घेण्याचा हक्क सरकारकडे आहे. एकदा का अशापद्धतीने नागरिकत्व गेलं की पॅलेस्टाइनींना इस्रायलच्या नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो मात्र ती प्रक्रिया खूपच दिर्घ आणि अनिश्चित आहे. अनेकदा नागरिकत्व गेल्यावर पॅलेस्टाइनी लोक अर्ज करत नाहीत कारण त्यांना या ठिकाणावर इस्रायलचा ताबा मान्य नाहीय.
इस्रायलने पूर्व जेरुसलेममध्ये ज्यू लोकांची वस्ती असणारा प्रदेश वसवला आहे. आज या ठिकाणी दोन लाख २० हजार ज्यू लोकं राहतात. इस्रायलच्या ज्यू लोकांची वस्ती वाढवण्याच्या धोरणामुळे येथे पॅलेस्टाइनींना राहण्यासाठी पर्याय नसल्याने गर्दी, अनधिकृत बांधकाम मोठ्याप्रमाणात वाढणे यासारख्या समस्या निर्माण झाल्या असून आता इस्रायल या अनधिकृत बांधकामांवर पर्यायाने पॅलेस्टाइनींवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.