दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एरंडेलाच्या बिया आणि एरंडेल तेलाच्या उत्पादनात जगात भारताची मक्तेदारी आहे. एकूण जागतिक उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत भारताचा वाटा आहे. शिवाय जागतिक एरंडेल तेल आणि उपपदार्थाच्या व्यापारातही भारत महत्त्वाची भूमिका बजावतो. ‘द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने नुकतीच अहमदाबादमध्ये ‘ग्लोबल कॅस्टर कॉन्फरन्स’ पार पडली. या परिषदेत यंदा एरंडेलाच्या बियांचे सरासरीपेक्षा जास्त उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या विषयी..

देशातील बिया व तेलाचे उत्पादन किती?
जगात सर्वाधिक एरंडी बिया आणि एरंडेल तेल उत्पादन भारतात होते. त्यापाठोपाठ चीन, ब्राझिल, मोझांबिक, थायलंड, म्यानमार, इथिओपिया आहेत. एकूण जागतिक उत्पादनाच्या ८६ ते ९० टक्के उत्पादन भारतात होते. त्या खालोखाल चीनमध्ये ७, ब्राझीलमध्ये ५ आणि मोझांबिकमध्ये २ टक्के उत्पादन होते. देशांतर्गत गुजरातमध्ये ७८ टक्के, राजस्थानमध्ये १८ टक्के, आंध्र प्रदेशात २ टक्के, कर्नाटक १ टक्का आणि इतर राज्यांत १ टक्का उत्पादन होते. २००० सालापर्यंत देशात एरंडेल तेलाचे उत्पादन सरासरी आठ ते नऊ लाख टनांच्या आसपास होते.

एरंडी बियांची सद्य:स्थिती काय?
२०२२-२३ मध्ये एरंडी बियांचा मागील वर्षांचा शिल्लक साठा १ लाख ८३ हजार ७०० टन होता, तर उत्पादन १९ लाख २१ हजार ३०० टन होण्याचा अंदाज आहे. एकूण एरंडी बियांचा साठा २१ लाख ५ हजार टन होण्याचा अंदाज होता. यंदा १८ लाख पाच हजार ३०० टन बियांपासून तेल उत्पादनाचा आणि वर्षअखेरीस २ लाख ९९ हजार ६०० टन एरंडी बियांचा साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. देशातील एरंडी बियांचा काढणी हंगाम जानेवारी ते एप्रिल दरम्यान असतो. एरंडीच्या लागवडीखालील क्षेत्राचा विचार करता २०२१-२२ मध्ये भारतात ८ लाख ३० हजार हेक्टर, ब्राझिलमध्ये ४७ हजार हेक्टर, चीनमध्ये १२ हजार हेक्टर आणि अन्य देशांत १ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे.

साठा आणि उत्पादन किती?
यंदा, म्हणजे २०२२-२३ मध्ये मागील वर्षांचा ११ हजार ६०० टन एरंडेल तेलाचा शिल्लक साठा आहे. यंदा तेलाचे उत्पादन सुमारे आठ लाख ४८ हजार ५०० टन होण्याचा अंदाज आहे. देशात एकूण आठ लाख ६० हजार १०० टन तेलाचा साठा असण्याची शक्यता आहे. तर यंदा एकूण एरंडेल तेल निर्यात सहा लाख ५२ हजार ५०० टन होण्याची शक्यता आहे. द्विपक्षीय करारांतर्गत एक लाख ३५ हजार टन तेलाचा व्यापार होण्याची आणि देशांतर्गत उपयोगासाठी ५५ हजार टन तेलाचा वापर होण्याची शक्यता आहे. निर्यात आणि देशांतर्गत गरज मिळून एकूण आठ लाख ४२ हजार ५०० टन तेलाची गरज असेल. वर्षअखेरीस देशात एकूण १७ हजार ६०० टन तेल शिल्लक असेल.

एरंडेल तेलाच्या निर्यातीची स्थिती काय?
२०२१-२२ मध्ये सहा लाख पाच हजार टन एरंडेल तेलाची निर्यात झाली. २०२२-२३ मध्ये ती सहा लाख ५२ हजार टनांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. भारतातून सर्वाधिक निर्यात चीनला होते. २०२२-२३ मध्ये चीनला ३ लाख १२ हजार टन, युरोपला ७० हजार टन तर अमेरिकेला ७० हजार टन तेलाची निर्यात होण्याचा अंदाज आहे.

आर्थिक उलाढालीची स्थिती काय असेल?
एरंडेल तेलाच्या खरेदी-विक्रीतून आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ११ लाख ७७ हजार कोटी रुपये जीएसटीचे संकलन झाले होते. करोनाकाळात २०२०-२१ मध्ये त्यात घट झाली आणि ते ११ लाख ३७ हजार कोटी रुपयांवर आले होते. २०२३-२४ मध्ये ते १८ लाख २९ हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. २०२०-२१ मध्ये देशात भरघोस उत्पादन झाले होते. पण करोनामुळे २०२१-२२ मध्ये चीनमधून मागणी कमी झाली होती. २०२२-२३ मध्ये चीनसह जगभरातून मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. २०२३-२४ मध्ये देशात एरंडी बियांचे उत्पादन चांगले म्हणजे एकूण जागतिक उत्पादनाच्या ९० टक्के होण्याची शक्यता आहे. देशातून एरंडेल तेल आणि उपपदार्थाची एकूण निर्यात १० हजार कोटींवर (१.४ अब्ज डॉलर) जाण्याचा अंदाज आहे. एरंडेल तेल आणि उपपदार्थाची एकूण जागतिक आर्थिक उलाढाल चार अब्ज डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे.

एरंडेल तेलाचा उपयोग काय?
एरंड वनस्पतीला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. एरंडाचे पान हाताच्या पंजासारखे दिसते म्हणून संस्कृत भाषेत एरंडाच्या पानांना गंधर्वहस्त म्हणतात. कमी वेळात वेगाने वाढणारी वनस्पती म्हणून एरंडाला वर्धमानही म्हणतात. एरंडाच्या बियांपासून तेल काढले जाते. हे तेल पोटाच्या विकारांवर रामबाण औषध मानले जाते. पोट साफ होण्यासाठी पूर्वी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वाना एरंडेल तेल पिण्यास दिले जाई. याशिवाय कफ विकारावर गुणकारी, शुक्र धातू वाढविणारे, संधिवात, केस गळणे, टक्कल पडणे, पचनाच्या समस्या, लकवा, अर्धागवायू, पार्किन्सन्स आदी समस्यांवर गुणकारी व वेदनाशामक म्हणूनही त्याचा वापर केला जातो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what global castor oil market says print exp 0323 amy
Show comments