चिन्मय पाटणकर
राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यावर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची चर्चा सुरू झाली. मात्र सीबीएसई, आयसीएसई आदी परीक्षा मंडळाचे निकाल अद्याप जाहीर न झाल्याने अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. अन्य मंडळांचे निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लांबणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नसलेल्या भागात महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाते?
राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन आणि पारंपरिक पद्धतीने महाविद्यालय स्तरावर अशा दोन पद्धतीने राबवली जाते. त्यात मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने, तर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नसलेल्या भागांत पारंपरिक पद्धतीने महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल फॉर द स्कूल सर्टिफिकेशन एग्झामिनेशन (आयसीएसई) आदी अन्य मंडळांचे दहावीचे विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. त्यामुळे या सर्व मंडळांच्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. दरवर्षी सर्वसाधारणपणे जून-जुलैमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होते.
अकरावीच्या प्रवेशांचे यंदा काय झाले?
करोना प्रादुर्भावामुळे यंदा दहावीच्या परीक्षा प्रचलित लेखी पद्धतीने होऊ शकण्याबाबत साशंकता होती. त्यामुळे सीबीएसईने परीक्षा पद्धतीमध्ये बदल करून दोन सत्रांची स्वतंत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. तर राज्य मंडळाने शाळा तेथे केंद्र असे नियोजन करून लेखी परीक्षा घेतली. दरम्यान अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी शिक्षण विभागाने मे महिन्यातच अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची मुभा देण्यात आली. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरणे, गुणपत्रक अपलोड करण्यासह प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे सुरू करण्यात येईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. राज्य मंडळाने १७ जूनला दहावीचा निकाल जाहीर केला. मात्र आयसीएसई आणि सीबीएसईचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू केलेला नाही. परिणामी राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून जवळपास वीस दिवसांनंतरही सहा महापालिका क्षेत्रांतील लाखो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. तर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नसलेल्या भागात महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. काही ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणिक कामकाज सुरू झाले आहे.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अन्य मंडळांचे विद्यार्थी किती?
केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाचे विद्यार्थीच बहुसंख्य असतात. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सीबीएसई, आयसीएसई आदी अन्य मंडळाचे विद्यार्थी जवळपास दहा टक्के असतात, तर सीबीएसईचे विद्यार्थी पाच टक्के असतात असे शिक्षण विभागाचे निरीक्षण आहे. गेल्या वर्षीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जवळपास साडेपाच लाख जागांसाठी राबवण्यात आली होती.
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे होणार काय ?
अन्य मंडळाचे निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे निर्देश शासनाकडून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाला देण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य मंडळांचे निकाल जाहीर झाल्यावर अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा सुरू केला जाणार आहे. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नसलेल्या भागात महाविद्यालय स्तरावरील प्रवेश प्रक्रियेत अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.
प्रवेश प्रक्रिया लांबण्याचा परिणाम काय?
दरवर्षी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातील बदलांमुळे, प्रवेश फेऱ्या वाढल्याने प्रवेश प्रक्रिया लांबते. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा, निकाल आदी शैक्षणिक प्रक्रिया कोलमडली होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. तर यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेत संपण्याच्या दृष्टीने मे महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल लांबल्याने प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा होऊन त्याचा अकरावीच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होतो.
chinmay.patankar@expressindia.com