करोनाच्या दुसऱ्या लाटेआधी नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने केंद्र सरकारवर आणि आरोग्य यंत्रणांबरोबरच अधिकाऱ्यांवरही टीका केली जात आहे. असं असतानाच दुसरीकडे केंद्राकडून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य वैज्ञानिक सल्लागार असणाऱ्या के. विजय राघवन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला करोनाची तिसरी लाट भारताला टाळता येणार नाही तसेच ही लाट कधी येणार हे ही सांगू शकत नाही असं म्हटलं होतं. विजय राघवन दोन दिवसांनंतरच तिसऱ्या लाटेमुळे होणारा परिणाम आपण कठोर निर्बंधांच्या माध्यमातून कमी करु शकतो असं म्हटलं होतं. विजय राघवन यांच्याबरोबरच इतर तज्ज्ञांनीही मागील काही आठवड्यांपासून तिसऱ्या लाटेसंदर्भात इशारा देत आहेत. स्थानिक प्रशासन आणि काही रुग्णालयांनी त्यांच्याकडील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तयारी केली आहे. येत्या कालावधीमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच तिसऱ्या लाटेच्या भीतीने ही तयारी केली जात आहे. मात्र करोनाची किंवा साथीच्या रोगांमध्ये लाट म्हणजे नक्की काय असतं?, लाट आल्याचं कसं ओळखलं जातं? यासंदर्भातील माहिती अनेकांना ठाऊक नसतं. त्याचसंदर्भात आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

लाट म्हणजे काय?

खरं सांगायचं तर साथीरोग शास्त्राप्रमाणे संसर्गाची लाट म्हणजे नक्की काय याची ठोस व्याख्या उपलब्ध नाहीय. मात्र संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढणे आणि घटणे यासंदर्भात बोलताना लाट हा शब्द वापरला जातो. सामान्यपणे दिर्घकालीन दृष्टीकोनातून लाट ही संज्ञा वापरली जाते. जेव्हा बाधितांची संख्या वाढते तेव्हा रुग्णसंख्येचा आलेख एखाद्या लाटेप्रमाणे दिसतो. आधीच्या काळी ठराविक कालावधीमध्ये होणाऱ्या संसर्गासंदर्भात बोलताना लाट हा शब्द वापरला जायचा. नैसर्गिक पद्धतीने अनेक विषाणूंचा संसर्ग ठराविक कालावधीत होऊन नंतर रुग्णसंख्या कमी व्हायची यालाच लाट येणे आणी ओसरणे असं म्हटलं जायचं.

मागील दीड वर्षांपासून करोनाबाधितांची जगभरातील संख्या सतत वाढत आहे. मात्र असं असतानाही ठराविक कालावधीमध्ये ठराविक भूभागावर अचानक रुग्णसंख्या वाढण्याचा ट्रेण्ड मागील दीड वर्षांमध्ये दिसून आला. आता भारतामध्ये अशापद्धतीने कमी कालावधीत अगदी मोठ्याप्रमाणात रुग्णसंख्या वाढण्याचा प्रकार दोन वेळा घडला आहे. काही महिन्यांच्या कालावधीमध्ये सातत्याने रुग्णसंख्या वाढ होत गेल्याचे दोन टप्पे मागील दीड वर्षात भारतामध्ये होऊन गेले.

नक्की वाचा >> समजून घ्या : प्राणवायू म्हणून ओळखला जाणारा ‘मेडिकल ऑक्सिजन’ घातक कसा ठरु शकतो?

एखाद्या प्रदेशातील देश, राज्य किंवा शहरांमध्ये येणारी लाट ही त्या त्या परिसरातील परिस्थितीवर अवलंबून असते. उदाहणार्थ दिल्लीमध्ये आतापर्यंत करोनाच्या चार लाटा येऊन गेल्यात. मागील दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दिल्लीत ठराविक अंतराने तीन वेळा करोना रुग्णसंख्येतील वाढ आणि घट अनुभवली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये फेब्रुवारीपर्यंत करोनाबाधितांच्या संख्येचा आलेख फारसा वाढलेला नव्हता. या राज्यांमध्ये करोनारुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाल्याचं दिसलं नव्हतं. मात्र फेब्रुवारीनंतर तेथील आलेख वाढलेला दिसत आहे. असं का होतं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असलं तरी सर्व ठिकाणांसाठी ठराविक काळात लाट येईल असं ठामपणे सांगता येत नाही. (खालील ग्राफ पाहा)

लाट आली हे कसं ओळखतात?

सध्या भारतामध्ये तिसरी लाट येण्यासंदर्भातील चर्चा आहे. याचाच अर्थ असा की राष्ट्रीय पातळीवर करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेतला उच्चांक काढून दैनंदिन करोनाबाधित रुग्णसंख्या कमी होत असल्याने करोना कर्व्ह म्हणजेच करोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख खाली जाताना दिसत आहे. करोना आलेखाने सहा मे रोजी उच्चांक गाठल्याचं सांगितलं जात आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाली आहे. ४.१४ लाखांवरुन आज रुग्णसंख्या २.६० लाखांपर्यंत खाली आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्याही ३२ लाख २५ हजारांपर्यंत आलीय. सर्वाधिक रुग्णसंख्या असताही हाच आकडा ३७ लाख ४५ हजार इतका होता. सध्या सुरु असणारा ट्रेण्ड पाहता जुलैपर्यंत भारतामधील परिस्थिती फेब्रुवारीप्रमाणे होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर ती सतत काही आठवडे, महिने वाढत राहील आणि त्यालाच तिसरी लाट असं म्हटलं जाईल.

नक्की वाचा >> समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?

राष्ट्रीय स्तरावर तिसरी लाट येण्याआधीच काही राज्यांमधील रुग्णसंख्या सतत वाढती राहू शकते. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या अशापद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे. याचसंदर्भातील उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातील अमरावती, सांगली आणि काही इतर ठिकाणी रुग्णसंख्या अद्यापही वाढताना दिसत आहे. मात्र या रुग्णसंख्या वाढीचा जोपर्यंत करोनारुग्णवाढीच्या राष्ट्रीय आलेखावर परिणाम होत नाही तोपर्यंत या रुग्णवाढीला लाट असं म्हणता येणार नाही. तसेच संसर्गाचं प्रमाण जितक्या ठराविक जागेत मर्यादित असेल तितक्या लवकर संसर्ग कमी होण्याची शक्यताही अधिक असते. मात्र मुंबई, पुण्यासारख्या काही शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढीचा कालावधी अधिक राहिला आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.

तिसरी लाट अधिक घातक असणार का?

करोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षाही मोठी असेल अशी शक्यता काहींनी वर्तवली आहे. मात्र ही लाट नक्की कशी असेल हे आताच सांगता येणार नाही. सामान्यपणे साथीच्या रोगांमध्ये येणारी प्रत्येक पुढची लाट ही आधीच्या लाटेपेक्षा सौम्य असते. कारण जसाजशी लाटांची संख्या वाढत जाते त्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकसंख्येला विषाणूचा संसर्ग होऊन गेलेला असतो. साथीच्या रोगांमध्ये जशाजशा लाटा वाढत जातात त्याप्रमाणे त्याची दाहकता कमी होण्याची शक्यता असते कारण प्रत्येक आधीच्या लाटेत काही ठराविक लोकसंख्येमध्ये या विषाणूंविरोधात लढण्याची रोगप्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोना काळात रुग्णालयांकडून पाठवला जाणारा SOS म्हणजे काय?, त्याचा अर्थ काय असतो?

सामान्यपणे साथरोग शास्त्रामध्ये वापरलं जाणारं हे स्पष्टीकरण आणि दावा भारतामध्ये करोनासंदर्भात अगदी उलट ठरला. सप्टेंबरच्या मध्यात करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली तेव्हा देशातील अगदीच मोजक्या लोकसंख्येला करोनाचा संसर्ग होऊन गेला होता. करोनाचा संसर्ग कमी होण्यामागे काही विशेष कारण नव्हतं. मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला करोनाची लागण झालेली नसताही करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली. सप्टेंबरपासून पुढील पाच महिने भारतातील रुग्णसंख्या का कमी झाली यासंदर्भातील ठोस माहिती अद्याप उपलब्ध नसून त्याबद्दलचं संशोधन सुरु असल्याचं समजते.

मात्र वर नमूद केल्याप्रमाणे दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा सौम्य असेल असं समजून अनेकांनी करोनाची साथ आता संपुष्टात येत असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र घडलं याच्या उलट. दुसरी लाट ही अधिक घातक ठरली. दुसऱ्या लाटेतील मृतांची संख्या ही आधीच्या लाटेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळेच तिसरी लाटही याच ट्रेण्डप्रमाणे अधिक घातक असेल असं काहीजण म्हणत आहेत. मात्र तिसरी लाट अधिक घातक असेल असं ठामपणे सांगता येणार नाही. दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना संसर्ग होऊन गेलाय. पहिल्या लाटेच्या कालावधीमध्ये असणाऱ्या संसर्ग दरापेक्षा दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा दर हा जवळजवळ दुप्पटहून अधिक होता. चाचणी करुन संसर्गावर शिक्कामोर्तब न झालेल्या रुग्णांची संख्याही दुसऱ्या लाटेत बरीच असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्याचप्रमाणे लसीकरणामुळे रोगप्रतीकारशक्ती वाढून लोकसंख्येचा बराच मोठा भाग या विषाणूचा सामना करण्यासाठी सज्ज असेल. त्यामुळेच दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी असेल असंही मानलं जात आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खरंच गोमूत्र, शेणाचा लेप फायद्याचा ठरतो का?

करोना विषाणूमध्ये सतत बदल होत असल्याने दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट तिव्र असणार नाही असं म्हणणं घाईचं ठरले. या म्युटेशन्समुळे आधी संसर्ग होऊन गेलेल्यांना किंवा लस घेतलेल्यांना संसर्ग होणार नाही असं ठामपणे सांगता येणार नाही.

तिसरी लाट टाळता येईल का?

तिसरी लाट येणार असं १०० टक्के सांगू शकतो, असा दावा अनेक तज्ज्ञ करत आहेत. मात्र ती कशी येणार, कधी येणार, तिचा परिणाम कसा असेल याबद्दलची ठोसपणे माहिती देता येणार नाही. मात्र ही लाट येणार हे नक्की आहे. विजय राघवन यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांनी कठोर निर्बंध पाळले तर तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी करता येऊ शकतो. तसेच आधीच्या दोन्ही लाटांपेक्षा तिसरी लाट खूपच सौम्य असेल असंही म्हणता येईल. त्यामुळेच तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवणं हे अधिक सहज शक्य होईल अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

लोक या कालावधीमध्ये कशी वागतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. सरकारी सूचना, करोना नियम कसे पाळतात यावर लाटेच्या दहकता किती असेल हे सांगता येईल. दुसऱ्या लाटेने भारतीयांना या विषाणूसंदर्भात बेजबाबदारपणा महागात पडू शकतो ही शिकवण मात्र नक्की दिलीय. त्यामधून भारतीय धडा घेऊन तिसऱ्या लाटेचा सामना कसा करतात हे येणार काळच सांगेल.

Story img Loader