ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात कायदेशीर करण्याचा निर्णय रद्द केला. त्यामुळे अमेरिकेतील राज्यांना आता सोयीनुसार गर्भापातासंदर्भात कायदे करता येणार आहेत. एखाद्या महिलेने गर्भपात करावा की नाही, हे आता संबंधित राज्य सरकार ठरवेल. अमेरिकेत सध्या अशी १३ राज्ये आहेत, ज्या राज्यांमध्ये गर्भपात बेकायदेशीर आहे. एकंदरीतच महिलांनी गर्भपात न करता मुलांना जन्म द्यावा, अशी अमेरिकेतील सरकारची इच्छा आहे. यातून ‘बेबी ड्रॉप बॉक्स’ ही संकल्पना काही वर्षांपूर्वी उदयास आली होती. ही संकल्पना नेमकी काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या अहवालात भारताचं स्थान काय? चीनला मागे कधी टाकणार?
‘बेबी ड्रॉप बॉक्स’ ही संकल्पना नेमकी काय?
आपण ज्या प्रकारे पोस्टाच्या पेटीत पत्र टाकतो, त्याच प्रमाणे महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर जर तिला त्या बाळाचे संगोपन करायचे नसेल, तर त्याला बेबी बॉक्समध्ये नेऊन ठेवता येते. त्यानंतर त्या बाळाचे संगोपन सरकारद्वारे केले जाते. या बॉक्समध्ये नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळापासून ते सात दिवसांच्या बाळापर्यंत ठेवण्याची परवानगी असते. तसेच काही राज्यांमध्ये एका महिन्याच्या बाळालाही बेबी बॉक्समध्ये ठेवण्याची परवानगी दिली जाते.
हेही वाचा – विश्लषण : इस्लाममध्ये मद्यप्राशन ‘हराम’, मुस्लीम राष्ट्रांमध्ये मद्यासंंबंधीचे नियम काय?
‘बेबी बॉक्स’ सुरूवात नेमकी कशी झाली?
अमेरिकेत लहान वयात आई होण्याचे प्रमाण जास्त आहे. साधारणपणे १० पैकी तीन मुली वयाची २० वर्ष पूर्ण करण्यापूर्वीच गर्भवती राहतात. आकडेवारी नुसार एका वर्षात साधारण ७.५ लाखांहून अधिक किशोरवयीन मुली गर्भवती राहतात. त्यापैकी अनेक मुली एकतर कायदे शिथील असणाऱ्या राज्यात जाऊन गर्भपात करतात किंवा बाळाला जन्म देऊन कुठेतरी सोडून जातात. अशा परिस्थितीत या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो. अशा मुलांसाठी न्यूयॉर्कसह काही राज्यांनी १९९९ मध्ये अर्भक संरक्षण कायदाही पारीत केला होता. त्यानंतर अमेरिकेत ‘बेबी ड्रॉप बॉक्स’ ही संकल्पना सुरू झाली.
हेही वाचा – विश्लेषण : नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीत नेमका फरक काय?
अशी असते बॉक्सची रचना
बेबी बॉक्स हे स्टीलचे बनलेले असतात. पाच ते सहा किलो वजनाचे नवजात बाळ आरामात ठेवता येईल, इतका मोठा त्याचा आकार असतो. तसेच तापमान नियंत्रित करण्यासाठी यात विशेष यंत्रणा बसवण्यात आली असते. एखाद्याने नवजात बाळ खिडकीत ठेवल्यानंतर अलार्म वाजतो. त्यानंतर पाच मिनिटांच्या आता नर्स येऊन त्या बाळाला आत घेऊन जाते. जर नर्सला पोहोचायला उशीर झाला, तर इमर्जन्सी अलार्मही वाजतो. याचबरोबर बाळाला कोणताही संसर्ग होऊ नये, यासाठी स्वच्छतेचीही काळजी घेतली जाते.
जर्मनीसह इतर देशांमध्येही ‘बेबी ड्रॉप बॉक्स’चा वापर?
जर्मनीमध्ये २००० सालापासून ‘बेबी ड्रॉप बॉक्स’ वापर सुरू झाला. त्यानंतर नवजात बालकांच्या मृत्यूच्या संख्येत झपाट्याने घट झाली. यापूर्वी नको असलेल्या नवजात बालकांना जंगलात नेऊन ठेवण्यात येत होते, तिथे त्या बालकांचा एकतर भुकेने किंवा जंगली प्राण्याच्या शिकारीमुळे मृत्यू होत होता. जर्मनीसह कॅनडा, जपान, मलेशिया, नेदरलॅंड, फिलिपीन्स आणि रशियातही ‘बेबी ड्रॉप बॉक्स’चा वापर केला जातो. भारतातही १९९४ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या संकल्पनेतून ‘बेबी ड्रॉप बॉक्स’ सुरू करण्यात आले होते. त्यानंतर इतर दक्षिण भारतातील राज्यांमध्येही ‘बेबी ड्रॉप बॉक्स’चा वापर सुरू झाला.