भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) १ जानेवारी रोजी झालेल्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्याबरोबरच राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना यो-यो चाचणी ( Yo-Yo Test ) तसेच डेक्सा चाचणी (Dexa Test) अनिवार्य करण्याचा निर्णयही बीसीसीआयने घेतला आहे. मात्र, ‘डेक्सा टेस्ट’ नेमकी काय आहे? ती का केली जाते? सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण :भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियात? त्रयस्थ ठिकाणांचा प्रस्ताव फलद्रुप होईल का?
यो-यो चाचणी काय आहे?
यो-यो चाचणी टीम इंडियासाठी नवीन नाही. २०१९ च्या विश्वचषकापूर्वीच याची सुरुवात झाली होती. या चाचणी दरम्यान खेळाडूंना ७.३० मिनिटांत दोन किलोमीटर धावणे बंधनकारक आहे. तसेच या चाचणीत पास होण्यासाठी खेळाडूंना १७ गुण मिळवणे अनिवार्य आहे. दरम्यान, करोनामुळे ही चाचणी बंद करण्यात आली होती. मात्र, आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकादरम्यान खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि प्रदर्शनानंतर ही चाचणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे अंबाती रायुडू, सुरेश रैना, पृथ्वी शॉ, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमीसह अनेक खेळाडू वेळोवेळी या चाचणीत नापास झाले आहेत.
याबाबत ‘द इंडियन एक्सप्रेस’ बोलताना, भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रामजी श्रीनिवासन म्हणाले, ”यो-यो चाचणीत फलंदाजांना १७ आणि वेगवान गोलंदाजांना १९ गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. मात्र, आता भारतीय संघाला केवळ यो-यो चाचणीवर अवलंबून राहून चालणार नाही. मी २०११ मध्येच बीसीसीआय आणि एनसीएला खेळाडूंची डेस्का चाचणी करावी, अशी शिफारस केली होती. या चाचणीद्वारे शरीरातील चरबी, पातळ स्नायू, पाण्याचे प्रमाण आणि हाडांची घनता समजून घेण्यास मदत होते. विशेष म्हणजे काही किक्रेट बोर्डांनी १० वर्षांपूर्वीच ही चाचणी सुरू केली होती. भारतातदेखील ही चाचणी फारपूर्वीच सुरू व्हायला पाहिजे होती.”
हेही वाचा – विश्लेषण : ‘सर्वकालीन सर्वोत्तम’ पेले यांची मृत्यूशी झुंज…
डेस्का चाचणी म्हणजे काय? ती कशी करतात?
डेक्सा चाचणी ही एकप्रकारे बोन डेंसिटी टेस्ट ( BDT) आहे. ही चाचणी करताना क्ष-किरण ( X-Ray) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यादरम्यान दोन लेझन बीमद्वारे शरीराचे स्कॅनिंग केले जाते. या चाचणीद्वारे शरीरातील चरबी, पातळ स्नायू, पाण्याचे प्रमाण आणि हाडांची घनता समजून घेण्यास मदत होते. ही संपूर्ण प्रक्रिया डेक्सा मशीनद्वारे केली जाते. अगदी १० मिनिटांमध्ये होणारी ही चाचणी खेळाडूंच्या फिटनेसची माहिती घेण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.