ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी विश्वविजेत्या स्पेनला शूटआऊटमध्ये ३-० असा पराभवाचा धक्का देत मोरोक्कोने कतार येथे सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेच्या सुरुवातीला मोरोक्कोचा संघ इतका मोठा पल्ला गाठेल अशी क्वचितच कोणी कल्पना केली असेल. मात्र, सांघिक कामगिरी आणि जिद्दीच्या जोरावर मोरोक्कोने साखळी फेरीत बेल्जियम आणि बाद फेरीत स्पेनसारख्या संघांवर मात करत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. मोरोक्कोच्या यशात खेळाडूंसह प्रशिक्षक वालिद रेग्रागुई यांचा महत्त्वाचा वाटा आहे. विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा मोरोक्को चौथा आफ्रिकी, तर पहिलाच अरब देश ठरला. फुटबॉलमधील या सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम आठ संघात मोरोक्कोने कसे स्थान मिळविले आणि त्यांच्या कामगिरीचे काय वैशिष्ट्य होते याचा आढावा.

प्रशिक्षकांनी काय जादू केली?

बोस्नियाच्या वाहिद हलिलहोजिक यांच्या मार्गदर्शनात मोरोक्कोने कतार विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. मात्र, त्यानंतर परिस्थिती बदलली आणि विश्वचषक स्पर्धेच्या तीन महिने आधी मोरोक्को महासंघाने हलिलहोजिक यांना प्रशिक्षकपदावरून हटवले. मोरोक्को महासंघाने फ्रान्समध्ये जन्मलेल्या पण, मोरोक्कोसाठीच खेळलेल्या रेग्रागुई यांची प्रशिक्षकपदी निवड केली. रेग्रागुई १०० दिवसांतच विश्वचषकासाठी संघाची कशी बांधणी करणार अशीच चर्चा होती. महासंघाला त्यांच्या क्षमतेविषयी खात्री होती म्हणूनच त्यांनी रेग्रागुईंवर विश्वास टाकला होता. आफ्रिकन फुटबॉलमध्ये रेग्रागुईंची तुलना अनेकदा विख्यात प्रशिक्षक होजे मोरिन्योंबरोबर केली जाते. कडक शिस्त आणि मनुष्य व्यवस्थापनेचे कौशल्य या जोरावर रेग्रागुई यांनी मोरोक्कोच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारली. त्यांनी हकिम झियेशसारख्या आघाडीच्या खेळाडूला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. खेळाडू अनेक आठवडे कुटुंबियांपासून दूर राहणार असल्यामुळे रेग्रागुई यांनी खेळाडूंच्या कुटुंबियाना संघासोबत राहण्याची परवानगी दिली. याचा मोठा फरक खेळाडूंवर झाला आणि त्याचे परिणाम त्यांच्या कामगिरीत दिसून आले.

विश्लेषण: उपांत्यपूर्व फेरीतून कोणते संघ करणार आगेकूच? फ्रान्स, अर्जेंटिना, ब्राझील…?

मोरोक्को फुटबॉल महासंघाचा या यशात किती वाटा?

यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील मोरोक्कोच्या यशाचे श्रेय तेथील फुटबॉल महासंघालाही जाते. मोरोक्कोचे राजा मोहम्मद सहावे यांनी देशाच्या फुटबॉल संरचनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. २००९ मध्ये महासंघाने त्यांची राष्ट्रीय फुटबॉल अकादमी उघडली. यामुळे संघातील सध्याच्या नायेफ ॲग्यएर्ड आणि युसुफ एन नेसरी यांसारखे गुणी खेळाडू मोरोक्कोला गवसले. त्याचबरोबर त्यांनी युरोपमधूनही गुणवत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. शाळा आणि क्लबमध्ये फुटबॉल अधिक कसे विस्तारता येईल याकडे त्यांनी लक्ष दिले. राजधानी रबातच्या अगदी बाहेर मोहम्मद सहावे फुटबॉल संकुल तयार करण्यात आले. खेळाचे संकुल कसे असावे याचा उत्तम नमुना म्हणून याकडे बघता येईल. संकुलात चार पंचतारांकित हॉटेल्स आणि ‘फिफा’ मान्यताप्राप्त आठ मैदाने आहेत. यातील एक मैदान हवामान नियंत्रित इमारतीमध्ये आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधाही येथे उपलब्ध होतात.

दशकभरातील गुंतवणुकीचा मोरोक्कोला कसा मोबदला मिळाला?

मोरोक्कोच्या सरकार आणि महासंघाने केलेल्या गुंतवणुकीचा फायदा आता हळूहळू मिळायला लागला आहे. मोरोक्कोमधील पुरुष आणि महिला क्लब संघांनी आफ्रिकन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. कॉन्फेडरेशन चषकही मोरोक्कोने पटकावला. मोरोक्कोचा संघ पहिल्या महिला आफ्रिका कप ऑफ नेशन्स स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आला आणि पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला. आता मोरोक्कोचा पुरुष संघ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंतचे मोरोक्कोचे हे सर्वांत मोठे यश आहे. हे यश कौशल्य आणि परिपूर्ण नियोजनानेच त्यांना मिळाले आहे.

मोरोक्कोची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी कशी राहिली?

विश्वचषक स्पर्धेत मोरोक्को संघ अत्यंत कठीण गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरणारा दुसरा आफ्रिकन संघ ठरला. मोरोक्कोने बेल्जियम आणि क्रोएशिया या दोन्ही प्रतिभावान संघांना मागे सारत अव्वल स्थान प्राप्त केले. बेल्जियमवर विजय मिळवत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनला हरवण्याची किमया केली. अशी कामगिरी करणारा मोरोक्को पहिला आफ्रिकन संघ ठरला. भविष्यात फुटबॉल जगतातील इतर संघ मोरोक्कोला कमी लेखण्याची चूक करणार नाहीत, हे या कामगिरीने सिद्ध झाले.

मोरोक्को संघाला देशाबाहेरील खेळाडूंचा आधार कसा?

कॅनडा, फ्रान्स, स्पेन, नेदरलँड्स, बेल्जियम आणि इटलीमध्ये जन्मलेल्या खेळाडूंचा समावेश असलेला मोरोक्को हा विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत वैविध्यपूर्ण संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. संघातील प्रत्येक खेळाडू हा वेगळ्या पद्धतीने खेळतो. विश्वचषकाच्या संघातील २६ पैकी १६ खेळाडू एकतर परदेशात जन्मलेले किंवा लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांचे प्रशिक्षक मोरोक्कोसाठी खेळले असले, तरी त्यांचा जन्म पॅरिसचा. दुसऱ्या देशाचे खेळाडू संघात असण्याचे फारसे आश्चर्य नाही. यंदा विश्वचषकात १०० हून अधिक खेळाडू त्यांच्या पितृदेशाव्यतिरिक्त दुसऱ्या देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. दुसऱ्या देशांकडून खेळण्याच्या नियमात ‘फिफा’ने बदल केल्याचा फायदा या सगळ्या खेळाडूंनी करून घेतला. त्यामुळेच मोरोक्को संघ स्थलांतरित खेळाडूंवर अवलंबून राहिला यात आश्चर्य नाही. मोरोक्कोचा प्रमुख खेळाडू हकिम झियेश, नौसेर माजरौई आणि सोफायन अमराबत यांचा जन्म नेदरलँड्सचा. अश्रफ हकिमीचा जन्म स्पेनमधला. तो वयाच्या सहाव्या वर्षापासून रेयाल माद्रिदच्या अकादमीत दाखल झाला. गोलरक्षक यासिन बोनो हा कॅनडियन वंशाचा, तर कर्णधार रोमन साइस, सोफियान बौफल यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला. या अन्य देशांमध्ये जन्मलेल्या खेळाडूंचे मोरोक्कोच्या यशात महत्त्वाचे योगदान आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is behind success of moroccan football team print exp sgy