अमली पदार्थ विक्री नियंत्रण विभागाने (एनसीबी) बुधवार (२८ सप्टेंबर) रोजी मुंबई विमानतळावरून एका बोलिव्हियन महिलेला ‘ब्लॅक कोकेन’ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. या महिलेच्या चौकशीनंतर एनसीबीने गोव्यामधून एका नायजेरियन व्यक्तीलाही अटक केली आहे, जो ही कोकेन घेणार होता.
एनसीबीचे विभागीय अधिकारी अमित घावटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, आमच्याकडे विश्वसनीय सुत्रांकडून माहिती आली होती की अशाप्रकारे एक दक्षिण अमेरिकन व्यक्ती विमानाने मुंबईत येणार आहे, ज्यानंतर आम्ही संबंधित महिलेस पकडले. या महिलेच्या सामानाची झडती घेतली असता, तिच्या बॅगेत १२ घट्ट बांधलेली पाकिटे आढळली. ज्यांची तपासणी केली असता त्यामध्ये काळ्या रंगाचा पदार्थ दिसला, नंतर हे ‘ब्लॅक कोकेन’ असल्याचे स्पष्ट झाले.
ब्लॅक कोकेन नेमके काय आहे? –
ब्लॅक कोकेन हे दुर्मिळ ड्रग आहे. जे सामान्य कोकेन आणि अनेक प्रकराच्या रसायनांचे मिश्रण आहे. जे की विमानतळांवर सुरक्षा रक्षकांसोबत तैनात असलेल्या विशेष स्निफर डॉग्सना देखील वासावरून ओळखता येत नसल्याचे आढळून येत आहे. याचाच फायदा घेत सध्या दक्षिण अमेरिकन ड्रग पेडलर्सच्या माध्यमातून हे भारतात दाखल होत आहे. हे दिसायला कोळशासारखे प्रमाणे दिसते. याचा अत्यंत व्यसनाधीन आणि अवैध मादक पदार्थांच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्याला कोकेन हायड्रोक्लोराइड किंवा कोकेन बेसही म्हणतात. यामध्ये कोळसा,कोबाल्ट, सक्रीय कार्बन किंवा लोहमीठ यांसारख्या गोष्टींचे मिश्रण करून तयार केले जाते, असे करून याचा रंग बदलला जातो.
पकडणे कठीण का आहे? –
स्निफर डॉग देखील ब्लॅक कोकेन पकडू शकत नाहीत. याचे एक कारण आहे. याचा वास रोखला जातो आणि रंगही बदलला जातो. अन्य कोकेनप्रमाणे दिसू नये म्हणून रंग बदलला जातो. याशिवाय यामध्ये विविध प्रकारची रसायनांचे मिश्रण असल्याने त्या वासही बंद होतो. यातील सक्रीय कार्बन हा त्याचा वास पूर्णपणे शोषून घेते, त्यामुळे विमानतळावरील तपासणी दरम्यान पोलीस आणि स्निफर डॉगही हे पकडू शकत नाहीत.
भारतात कुठून पोहचते? –
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, भारतात कोकेन पोहचण्याचा सर्वात मोठा स्त्रोत दक्षिण अमेरिकी देश आहेत. या ठिकाणी कोकाची झाडे मोठ्याप्रमाणावर आढळतात. त्यामुळे कोकेन येथून सर्वप्रथम मुंबईत आणि नंतर देशभरातील अन्य शहरांमध्ये पोहचते. यामध्ये प्रामुख्याने मेट्रो सिटी आणि गोवा यांचा समावेश आहे. सामान्यत: नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये कोकेन सर्वात महागडे आहे. समाजातील उच्चवर्गात याचा जास्त वापर होताना दिसतो.
किती धोकादायक आहे? –
ब्लॅक कोकेनमध्ये अनेकप्रकारच्या रसायानांचा वापर केला जातो, त्यामुळे ते अतिशय धोकादायक आहे. त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. सामान्यत: याचे सेवेन करणाऱ्यांना डोकेदुखी किंवा उलटी देखील होऊ शकते. याशिवाय विषाणू संसर्ग, हृदयविकाराचा झटका, हेपेटायटीस ‘बी’ आणि ‘सी’चाही धोका असतो.