मैदानातील आपल्या कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत असणारा जगातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. टेनिस कोर्टात प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने थेट ऑस्ट्रेलिया सरकारलाच आव्हान दिलं आहे. हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं असून या खटल्याचा निकालही समोर आला आहे. कोर्टाने नोव्हाक जोकोव्हिचच्या बाजूने निर्णय दिला असून ऑस्ट्रेलिया सरकारला मोठा झटका दिला आहे. मात्र तरीही ऑस्ट्रेलियाच्या गृहमंत्री नोव्हाक जोकोव्हिचला देशाबाहेर पाठवण्यावर ठाम आहेत. पण हे नेमकं प्रकरण काय आहे? याचा करोनाशी काय संबंध आहे? या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय झालं होतं ?

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेला १७ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू, पदाधिकारी आणि प्रेक्षकांना लसीकरण अनिवार्य आहे. परंतु गतविजेत्या जोकोव्हिचने आतापर्यंत एकदाही करोना प्रतिबंधक लस घेतल्याचा पुरावा सादर केलेला नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या स्पर्धेतील समावेशाबाबत संभ्रम कायम होता. अखेर मंगळवारी ‘इन्स्टाग्राम’वर टाकलेल्या पोस्टमध्ये जोकोव्हिचने स्वत:च या संदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला.

‘‘तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या जवळच्या व्यक्तींसह गेले काही दिवस वेळ घालवल्यानंतर वैद्यकीय सूट मिळाल्याचा पुरावा घेत मी आगामी टेनिस स्पर्धांसाठी सज्ज होत आहे,’’ असे जोकोव्हिचने पोस्टमध्ये नमूद केलं होतं. ३४ वर्षीय जोकोव्हिचला यंदा विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम मिळवण्याची संधी असून सध्या तो, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या नावावर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.

“मेलबर्न विमानतळावरच रोखलं”

लसीकरणातून वैद्यकीय सवलत मिळाल्यावर जोकोव्हिच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी मेलबर्नमध्ये दाखल झाला होता. मात्र, आठ तासांहून अधिक वेळ त्याला विमानतळावरच थांबवण्यात आलं होतं. करोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी नागरिकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशाची परवानगी आहे. लसीकरणाचा नियम न पाळल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला होता. त्यानंतर त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आलं होतं. जोकोव्हिचचा चार दिवस मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये राहावं लागलं.

…पण व्हिसा रद्द का केला?

मागील सहा आठवडय़ांत ज्या व्यक्तींना करोनाची बाधा होऊन गेली असेल, त्यांना लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळू शकते असा ऑस्ट्रेलियातील नियम सांगत असल्याचे उघडकीस आलं आहे. मात्र लसीकरणाचे नियम न पाळल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला होता.

“जोकोव्हिचला कैद्यासारखी वागणूक”

जोकोव्हिचला कैद्यासारखी वागणूक देत असल्याचा त्याच्या कुटुंबीयांकडून आरोप करण्यात आला. मात्र, यात तथ्य नसून जोकोव्हिचला ऑस्ट्रेलिया सोडण्याची पूर्ण मोकळीक असल्याचं गृहमंत्री कॅरेन अँड्रय़ूज म्हणाल्या.

‘‘जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियात कैद्यासारखे डांबून ठेवलेले नाही. त्याला हवे तेव्हा मायदेशी परतण्याची सूट असून येथून बाहेर पडण्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दल मदत करेल,’’ असे अँड्रय़ूज यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच जोकोव्हिचसाठी वेगळे नियम तयार करण्यात आल्याचे आरोप ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे अध्यक्ष क्रेग टिले यांनी फेटाळून लावले होते. ‘‘ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू, पदाधिकारी आणि चाहते यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. मात्र, २६ जणांनी वैद्यकीय सूट मिळण्यासाठी आमच्याकडे अर्ज केला आणि यापैकी काहींनाच आम्ही सूट दिली. जोकोव्हिचसाठी कोणताही वेगळा नियम करण्यात आला नाही,’’ असे टिले म्हणाले होते. दरम्यान, चेक प्रजासत्ताकची खेळाडू रेनाटा व्होराकोव्हाचा व्हिसा शुक्रवारी रद्द करण्यात आला होता.

जोकोव्हिचला वाईट वागणूक -किरियॉस

ऑस्ट्रेलियन प्रशासनाकडून जोकोव्हिचला दिली जात असलेली वागणूक अत्यंत वाईट असल्याची टीका ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किरियॉसने केली. ‘‘माझ्या आईचे आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या इतर लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी मी लसीचे दोन्ही डोस घेतले. मात्र, जोकोव्हिचची परिस्थिती अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळली जात आहे. तो उत्कृष्ट खेळाडू तर आहेच, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो माणूस आहे. त्याला मिळणारी वागणूक अत्यंत वाईट आहे,’’ असे किरियॉसने ‘ट्वीट’ केलं होतं.

जोकोव्हिचकडून चाहत्यांचे आभार

ऑस्ट्रेलियन प्रशासनाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करून त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर त्याला जगभरातून असंख्य चाहत्यांनी पाठिंबा दर्शवला. त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून सर्वाचे आभार मानले होते. ‘‘जगभरातून तुम्ही मला दर्शवत असलेल्या पाठिंब्याबद्दल खूप आभार. मला पाठबळ जाणवत असून त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे,’’ असे जोकोव्हिच म्हणाला होता.

“करोनाबाधेमुळे जोकोव्हिचला वैद्यकीय सवलत”

जोकोव्हिचच्या परत पाठवणीला आव्हान देण्यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात काही कागदपत्रे सुपूर्द केली. ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’ संघटनेने त्याला १ जानेवारीला लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्याचे प्रमाणपत्र दिले. काही दिवसांपूर्वीच करोनातून बरा झाल्याने ही सवलत मिळाल्याचा त्यात उल्लेख असल्याचा दावा वकिलांनी केला होता. ‘‘१६ डिसेंबर २०२१ रोजी जोकोव्हिचच्या करोना चाचणीचा अहवाल पहिल्यांदा सकारात्मक आला होता. मागील ७२ तासांत ताप किंवा अन्य कोणतीही लक्षणे नाहीत,’’ असे वैद्यकीय सवलतीच्या प्रमाणपत्रात म्हटलं होतं.

ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन प्रशासनाने या खटल्याच्या तयारीसाठी न्यायालयाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. मात्र, ऑस्ट्रेलियन गृहमंत्री कॅरेन अँड्रूज यांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने त्याचा व्हिसा पुनरावलोकन आणि परत पाठवणीचा निर्णय सोमवापर्यंत प्रलंबित ठेवला होता.

विरोधाभासी सल्ल्यांमुळे गोंधळ -टिले

करोनामुळे सतत बदलत्या परिस्थितीत मिळणाऱ्या विरोधाभासी सल्ल्यांमुळे जोकोव्हिचबाबत निर्णय घेताना गोंधळ झाल्याचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे अध्यक्ष क्रेग टिले यांनी स्पष्ट केलं होतं. ऑस्ट्रेलियातील दोन वैद्यकीय मंडळ आणि नंतर ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या संयोजकांनी जोकोव्हिचला लसीकरणात वैद्यकीय सवलत दिली होती. संयोजकांनी केंद्र सरकार, गृहमंत्रालय आणि व्हिक्टोरिया राज्य सरकारशी चर्चा करूनच सर्व निर्णय घेतल्याचे टिले म्हणाले होते.

जोकोव्हिचने जिंकला खटला –

चार दिवस मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये घालवल्यानंतर नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील खटला जिंकला. कोर्टाने नोव्हाकला मोठा दिलासा दिला असून ऑस्ट्रेलिया सरकारला चांगलाच झटका दिला. कोर्टाने ऑस्ट्रेलिया सरकारकडून नोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.

कोर्टाने नोव्हाक जोकोव्हिचचा पासपोर्ट आणि इतर सामान परत करण्याचा आदेश सरकारला दिला आहे. मात्र कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही देशाच्या गृहमंत्र्यांनी आमच्याकडे अद्यापही नोव्हाक जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियाबाहेर पाठवण्याची ताकद आहे, त्यामुळे यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. दुसरीकडे जोकोव्हिच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होणार ही नाही याबाबत अजून स्पष्टता नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is controversy between novak djokovic and australian governemnt causing court battle sgy