बॉलिवूड चित्रपट आणि वाद हे आता समीकरण बनले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ ते ‘थँक गॉड’ पर्यंत बॉलिवूडचे हे चित्रपट धार्मिक मुद्द्यांवर भाष्य करणारे होते. एकीकडे छित्रपट तर दुसरीकडे ओटीटीसारखं माध्यम जिथे दर्जेदार वेबसीरिज पाहायला मिळतात. ओटीटी माध्यमावर बंधन नसल्याने साहजिकच शिवराळ भाषा, बोल्ड सीन्स यामुळे वेबसीरिज चर्चेचा विषय बनतात. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेली ‘तांडव’ वेबसीरिजमुळे बराच गदारोळ झाला होता.
तांडव वेबसीरीज जानेवारी २०२१ रोजी ‘अॅमेझॉन प्राईम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. त्यानंतर या वेबसीरिजच्या विरोधात ठिकठिकाणी विरोध करण्यात आला होता. हिंदू देवतांचा यात अपमान करण्यात आला आहे असे अनेकांनी म्हंटले. आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात ‘तांडव’ वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती . देशभरातून या वेबसीरिजला विरोध झाला होता. अॅमेझॉन प्राईमने दिलगिरीदेखील व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशात अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण चिघळत गेले आणि अॅमेझॉन प्राईम इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांच्याविरोधात लखनौमध्ये एफआयर दाखल करण्यात आली होती . मात्र कालच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने पुरोहित तपासात सहकार्य करत असल्याचे लक्षात घेऊन दिलासा दिला. या प्रकरणी ५ मार्च २०२१ रोजी पुरोहित यांना अटक होण्यापासून संरक्षणही दिले होते.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने २७ जानेवारी २०२१ रोजी वेबसीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना कोणत्याही सक्तीच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा दिग्दर्शित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.