संरक्षण दलाच्या संरक्षण विषयक खरेदी करारांना मान्यता देणाऱ्या Defence Acquisition Council (DAC) ने नुकतेच विविध शस्त्रास्त्र खरेदी करण्यास मान्यता दिली. यामध्ये नव्या श्रेणीतील Corvettes चाही समावेश आहे. नवे तंत्रज्ञान असलेल्या Corvettes या युद्धनौकांमुळे भविष्यात नौदलाच्या ताकदीत मोलाची भर पडणार आहे.
Corvettes काय आहेत ?
नौदलात मुख्यतः संरक्षणाची आणि प्रतिहल्ल्याची जबाबदारी ही प्रामुख्याने पाण्याच्या पृष्ठभागावर कार्यरत असणाऱ्या दोन प्रकारच्या युद्धनौकांवर असते. भर समुद्रात स्वतंत्रपणे संरक्षणाची जबाबदारी असलेल्या विनाशिका (Destroyer) आणि पाणबुडी कारवायांसाठी – देशाच्या सागरी क्षेत्राच्या संरक्षणाची भुमिका बजावणाऱ्या फ्रिगेट (frigates). सामन्यातः विनाशिका युद्धनौका या सहा हजार टन पेक्षा जास्त वजनाच्या असतात तर फ्रिगेटचे वजन सुमारे तीन हजार ते सहा हजार टन च्या दरम्यान असते. तर Corvettes या तीन हजार टन पेक्षा कमी वजनाच्या असतात. बहुतांश नौदलात Corvettes युद्धनौकेचे वजन हे ५०० ते २००० टन एवढे असते. किनारी भागात गस्त घालणे, पाणबुडी विरोधी कारवाई करणे अशी प्रमुख जबाबदारी Corvettes वर असते. काही Corvettes या क्षेपणास्त्रवाहु असतात. Corvettes सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वजन आणि आकार कमी असल्याने समुद्रात वेगाने संचार करण्याची, हल्ला करण्याची क्षमता असते.
भारतीय नौदलाकडे कोणत्या प्रकारच्या Corvettes आहेत ?
नौदलाकडे ५ विविध प्रकारात एकुण २० Corvettes आहेत. Kora Class (कोरा क्लास – वजन १४०० टन – ४ युद्धनौका ), Khukri-class( खुकरी क्लास – वजन १४०० टन- ३ युद्धनौका ), Veer Class ( वीर क्लास – वजन ४५० टन – ७ युद्धनौका) या विविध प्रकारच्या Corvettes असून त्या क्षेपणास्त्रवाहू म्हणून ओळखल्या जातात. तर Kamorta-class ( कामोत्रा क्लास – वजन ३३०० टन – ४ युद्धनौका), अभय क्लास ( २ युद्धनौका- वजन ४५० टन ) या Corvettes पाणबुडी विरोधी कारवायांसाठी म्हणून ओळखल्या जातात. तर ९०० टन वजन असलेल्या Anti Submarine Warfare Shallow Water Craft प्रकारातील १६ आणि दोन हजार टन पेक्षा जास्त वनज असलेल्या Next Generation Missile Vessels प्रकारातील ६ Corvettes ची बांधणी ही देशामध्येच केली जात आहे.
नव्या Corvettes ची क्षमता काय आहे ?
सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे ८ नव्या Corvettes दाखल करुन घेण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. आता याबाबत टेंडर प्रक्रिया पूर्ण करत देशातील युद्धनौका बांधणी करणाऱ्या एका कंपनीला याचे कंत्राट देण्यात येईल. साधारण यामध्ये एक वर्षे जाईल अशी अपेक्षा आहे आणि २०२८ पासून नव्या Corvettes नौदलात दाखल व्हायला सुरुवात होतील असा अंदाज आहे.
नव्या Corvettes या स्टेल्थ प्रकारातील असतील म्हणजे या युद्धनौकांना रडारवर ओळखता येणे अवघड असेल. पाणबुडी विरोधी कारवाई आणि क्षेपणास्त्रवाहू अशा दोन्ही जबाबदाऱ्या या नव्या Corvettes वर असेल. तसंच अत्याधुनिक इंजिनामुळे यांचा वेगही चांगला असेल. तेव्हा शत्रुपक्षाच्या युद्धनौकांवर शत्रुपक्षावर प्रहार करण्याची क्षमता इतर Corvettes च्या तुलनेत अधिक असेल. या Corvettes ची रचना, निर्मिती ही पुर्णपणे स्वदेशी असेल. तेव्हा अशा नव्या Corvettes मुळे नौदलाची ताकदीत मोलाची भर पडणार आहे यात शंका नाही.