प्रवाशांना विमानप्रवास सुखकर आणि कागदपत्राशिवाय करता यावा, या उद्देशाने केंद्र सरकारने गुरुवारी ‘डिजीयात्रा’ हे नवीन अॅप सुरू केले आहे. या अॅपचा वापर करून आता प्रवशांना ओळखपत्र किंवा बोर्डिंग पास अशा कागदपत्रांशिवाय प्रवास करता येणार आहे. त्यासाठी विमानतळांवर ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’सुद्धा बसवण्यात आली आहे. सुरूवातीला ही सुविधा दिल्ली बंगळुरू आणि वाराणसी अशा तीन विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि विजयवाडा अशा आणखी चार विमानतळांवर ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ‘डिजीयात्रा’ नेमकं काय आहे? ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’ म्हणजे काय? आणि ही प्रणाली नेमकी कशा पद्धतीने काम करते? जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण: नागरिकत्व सुधारणा कायद्यात तामिळी निर्वासितांचा मुद्दा का आला? द्रमुकचा कायद्याला तीव्र विरोध का?
‘डिजीयात्रा’ काय आहे?
केंद्र सरकारने नुकताच डिजीयात्रा हे अॅप सुरू केले आहे. या अॅपचा वापर करत प्रवाशांना आता ओळखपत्रांशिवाय विमानप्रवास करता येणार आहे. या अॅपचा वापर करून चेहऱ्याच्या आधारे प्रवाशांची ओळख पटवत त्यांना विमानतळावर प्रवेश दिला जाईल. त्यासाठी विमानतळावर ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’ ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे चेहरा स्कॅन करून प्रवाशांची ओळख पटवण्यात येणार आहे.
‘डिजीयात्रा’चा वापर नेमका कसा करता येईल?
‘डिजीयात्रा’ सुविधा वापरण्यासाठी प्रवाशांना सर्वप्रथम ‘डिजीयात्रा’ अॅपवर आधारकार्डाद्वारे नोंदणी करावी लागेल. तसेच स्वत:चा एक फोटो आणि प्रवासाचे तिकीट अॅपवर अपलोड करावे लागेल. त्यानंतर ही संपूर्ण माहिती विमानतळ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. विमानतळावर प्रवेश करताच प्रवाशांना बारकोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आलेल्या ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’द्वारे प्रवाशांचा चेहरा स्कॅन करून त्याची ओळख पटवण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना विमानतळाच्या आत प्रवेश मिळेल.
सुरुवातीला तीन विमानतळांवर वापरता येईल ‘डिजीयात्रा’
सुरुवातीला दिल्ली विमानतळ टर्मिनल ३, बंगळुरू आणि वाराणसी या तीन विमानतळांवर ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’ बसवण्यात आली आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत हैदराबाद, पुणे विजयवाडा आणि कोलकाता या चार विमानतळांवर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण देशभरातील विमानतळांवर ही यंत्रणा बसवण्यात येईल.
हेही वाचा – विश्लेषण : ‘निविदा’ जिंकली म्हणजे नेमके काय?
‘या’ एअरलाईन्सच्या प्रवाशांना वापरता येईल ‘डिजीयात्रा’
दिल्ली विमानतळ टर्मिनल ३, बंगळुरू आणि वाराणसी या तीन विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या एअर इंडिया, विस्तारा आणि इंडिगो या एअनलाईन्सच्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येईल. तर स्पाईसजेट, गोफर्स्ट आणि अकासा एअर या एअरलाईन्ससुद्धा लवकरच या ही सुविधा सुरू करतील, अशी माहिती आहे.
‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’ नेमकी काय आहे?
‘फेशियल रिकग्निशन सिस्टीम’ ही एक बायोमेट्रिक प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे व्यक्तीचे डोळे, नाक आणि चेहऱ्याच्या आकारावरून त्याची ओळख पटवण्यात येते. आज जगभरातील अनेक विमानतळांवर ही प्रणाली वापरण्यात येत आहे. यामध्ये दुबई, सिंगापूर, अटलांटा, जपान या देशांचा समावेश आहे.