गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. त्यानंतर संध्याकाळी विविध ‘एक्झिट पोल’चे निकाल जाहीर झालेत. भारतात मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी ‘एक्झिट पोल’चे निकाल जाहीर केले जातात. खरं तर या ‘एक्झिट पोल’विषयी अनेक लोकांमध्ये उत्सुकता असते. बऱ्याचदा हा अंदाज खरादेखील ठरतो. मात्र, हे एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे? ते कशा पद्धतीने काढले जातात? त्यासाठी नियम काय आहेत? यासह विविध गोष्टी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण: ड्रायव्हिंग करताना तुफान वेगाने गाडी चालवण्याची आपली इच्छा का होत असते? काय आहेत वैज्ञानिक कारणं?
‘एक्झिट पोल’ म्हणजे नेमकं काय?
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्यासाठी असलेले एक माध्यम म्हणून ‘एक्झिट पोल’कडे बघितलं जातं. याद्वारे जाहीर झालेले निकाल हे अचूक नसले तरी बऱ्याचदा हे अंदाज खरे ठरतात. आज भारतात ‘एक्झिट पोल’ विविध माध्यम संस्थांद्वारे प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने घेतले जातात. एक चांगला ‘एक्झिट पोल’ हा त्याच्या नमुन्यांची संख्या आणि विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर अवलंबून असतो. यासंदर्भात बोलताना ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी’चे संचालक संजय कुमार म्हणतात, ”योग्य प्रश्नावलींशिवाय कोणत्याही ‘एक्झिट पोल’साठी योग्य माहिती गोळा करता येत नाही किंवा त्याचे योग्य ते विश्लेषण करता येत नाही. दरम्यान, या ‘एक्झिट पोल’वर राजकीय पक्षांकडून नेहमीच पक्षपाती असल्याचा आरोप केला जातो.
‘एक्झिट पोल’ कसे घेतले जातात?
‘एक्झिट पोल’ मतदानाच्या दिवशी घेतले जातात. यावेळी मतदारांनी मतदान केल्यानंतर त्याने कोणाला मत दिलं, याबाबत विचारण्यात येते. मतदारांची संख्या आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन मतदान केंद्रांची निवड केली जाते. त्यानंतर मतदारांनी दिलेली उत्तरं गोळा करून त्याचे विश्लेषण केले जाते आणि निकालाचा अंदाज जाहीर केला जातो.
‘एक्झिट पोल’बाबात कायदा काय सांगतो?
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ नुसार, निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या कालावधीदरम्यान, कोणतीही व्यक्ती कोणताही एक्झिट पोल आयोजित करू शकत नाही किंवा प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे तो प्रकाशित करू शकत नाही, या नियमाचे उल्लंघन केल्यास आरोपीला दोन वर्षांपर्यंत कारावास किंव्हा दंड किंवा दोन्ही अशा स्वरुपाचे शिक्षा होऊ शकते. उदाहरण द्यायचं झाल्यास, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका जाहीर करताना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० पर्यंत कोणताही एक्झिट पोल प्रसिद्ध करू नये, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते.
‘एक्झिट पोल’चा इतिहास काय?
‘एक्झिट पोल’ची सुरुवात कधी झाली याबाबत अनेक मत-मतांतरे आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला ‘एक्झिट पोल’ प्रकाशित केला होता, असे म्हटले जाते. तर इतर काही रिपोर्टनुसार, वॉरेन मिटोफस्की या अमेरिकी नागरिकाने १९६७ मध्ये सीबीएस न्युजसाठी पहिला ‘एक्झिट पोल’ तयार केला होता, असे म्हटले जाते. तसेच १९४० मध्येही ‘एक्झिट पोल’ बनवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, अयशस्वी ठरला होता.
‘एक्झिट पोल’ आणि ‘ओपिनियन पोल’मध्ये काय फरक?
‘एक्झिट पोल’ आणि ‘ओपिनियन पोल’ हे दोन्हीही वेगळे आहेत. ‘ओपिनियन पोल’ मतदानापूर्वी घेतले जातात. ‘ओपिनियन पोल’मध्ये विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ‘ओपिनियन पोल’ तयार केला जातो. तर ‘एक्झिट पोल’ हे मतदारांनी मतदान केल्यानंतर घेतले जातात. ‘ओपनियन पोल’ मतदानाच्या आधी घेतले असल्याने त्यामध्ये बदल होऊ शकतात. मात्र, ‘एक्झिट पोल’ हा मतदानंतर घेण्यात येत असल्याने हे निकाल बऱ्यापैकी अचूक ठरण्याची शक्यता असते.