– राजेंद्र येवलेकर
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा सध्या एवढा बोलबाला झाला आहे की, या गोळ्या म्हणजे करोनावरचा रामबाण उपाय असावा कुणाचा समज होऊ शकतो पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाने या रोगाच्या एका विशिष्ट टप्प्यातच उपयोग होतो. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या गोळ्यांच्या नावाचा जपच चालवला आहे. त्यांनी भारताकडे या गोळ्या मागितल्या त्यामुळे त्याचे महत्व आणखी वाढले. प्रत्यक्षात अमेरिकेतील वृत्तपत्रांनी जी माहिती दिली आहे ती पाहता अमेरिकी अध्यक्षांचे चुकीचे सल्लागार त्यांना ही माहिती देत आहेत. प्रत्यक्षात या गोळीचा फार कमी उपयोग करोनावर करता येतो. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानेही या गोळ्यांचा करोनावर वापर करण्यास दिलेली परवानगी नाईलाजास्तव व तात्पुरत्या स्वरूपातील आहे. पण या गोळ्या म्हणजे नेमका काय प्रकार आहे हेही आपण जाणून घेण्याची गरज आहे.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या गोळीला करोना विषाणूच्या अति जोखमीच्या रूग्णांवर वापरण्यासाठी मान्यता दिली आहे. हे औषध गेली काही दशके अस्तित्वात आहे. त्याचा वापर केवळ प्रतिबंधात्मक म्हणून करोनावर होऊ शकतो. भारतात विशेष करून आरोग्य कर्मचाऱ्यांना या गोळ्या दिल्या जात आहेत. ज्या रूग्णात लक्षणे नाहीत त्यांच्याकरिता त्यांचा वापर केला जात आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय ?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या आहेत त्यांचा वापर स्वप्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणाऱ्या रोगात केला जातो. मलेरियाविरोधात वापरल्या जाणाऱ्या क्लोकोक्विन या गोळीच्याच प्रजातीचे हे औषध आहे. पण त्याचा वापर हृदयाच्या संधीवातावर केला जातो. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी २१ मार्चला या गोळ्यांचा वापर करण्याचे सुचवल्याने त्याला महत्व आले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर अॅझिथ्रोमायसिन बरोबर केला तर करोनावर चांगला उतार पडतो असा दावा ट्रम्प यांनी केला होता.
औषधाचे वैद्यकीय पुरावे काही आहेत का ?
दी लॅन्सेट ग्लोबल हेल्थ या नियकालिकातील संशोधन निबंधानुसार या औषधाने प्राथमिक पातळीवर तरी सार्स सीओव्ही २ या विषाणूला मारण्याचे गुणधर्म दाखवले आहेत, या औषधामुळे शरीरात एका टप्प्यावर विषाणूंची जी संख्या वाढत जाऊन ते मोकाट सुटतात त्या प्रक्रियेला आळा घातला जातो. भारतात या औषधाच्या वापराबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने काही नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार प्रायोगिक पातळीवर हे औषध करोनावर प्रतिबंधात्मक पातळीवर गुणकारी आहे. लक्षणे न दाखवणारे आरोग्य कर्मचारी तसेच संपर्कात आलेले पण लक्षणे न दाखवणारे रूग्ण यांच्यात या औषधाचा वापर करावा अशी शिफारस करण्यात आली. भारताच्या करोना प्रतिबंधक दलाने या औषधाचा वापर तातडीच्या परिस्थितीत मर्यादित पातळीवर करावा असे म्हटले आहे. फ्रान्समधील जर्नल ऑफ अँटीमायक्रोबियल एजंटस या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात फ्रेंच वैज्ञानिकांनी असे म्हटले होते की, वीस रूग्णांवरील उपचारात या औषधाने चांगले परिणाम दाखवले पण हे औषध अॅझिथ्रोमायसिन बरोबर वापरले तरच परिणामकारक ठरते.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन व क्लोरोक्विन यांच्यात काय फरक असतो
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन बाजारात प्लाकनील नावाने मिळते. त्याचे भावंड म्हणजे क्लोकोक्विन ते क्विनाइन पासून तयार करतात. क्विनाईन हे प्रथम फ्रेंच रसायनशास्त्रज्ञांनी सिंकोनाच्या झाडाच्या बुंध्यापासून मिळवले होते. १९३४ मध्ये जर्मन वैज्ञानिकांनी कृत्रिम क्लोरोक्विन तयार केले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हा क्लोरोक्विनचा कमी विषारी असलेला प्रकार आहे.
या औषधाचे दुष्परिणाम काय असतात ?
मेडिप्लसच्या मते या औषधाने डोकेदुखी, गरगरणे, भूक न लागणे, अतिसार, पोटदुखी, वांत्या, त्वचेवर चट्टे हे परिणाम होतात, औषध जास्त प्रमाणात घेतल्यास माणूस बेशुद्ध पडतो.
या औषधाचे भारतातील उत्पादक कोण आहेत ?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाची बाजारपेठ फेब्रुवारी २०२० पर्यंत १५२.८० कोटी रूपयांची होती. अनेक देश हे औषध भारताकडून घेतात. मुंबईच्या आयपीसीए लॅबोरेटरीजकडून या औषधाचे ८२ टक्के उत्पादन होते. त्यांची एचसीक्यूएस व एचवायक्यू ही उत्पादने आहेत. या कंपनीचे ८० टक्के औषध निर्यात होते. अहमदाबाद येथील कॅडिला हेल्थकेअरचा वाटा आठ टक्के आहे तर वॉलेस फार्मास्युटिकल्स, टॉरेंट फामॉस्युटिकल्स, ओव्हरसीज हेल्थकेअर प्रा. लि. यांचा वाटा खूप कमी आहे.