ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश आमटे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
मात्र प्रकाश आमटे यांच्या काही तपासण्यांमधून ल्युकेमियाची (रक्ताच्या कर्करोगाची) सुरुवात असल्याचे लक्षात आले आहे. मात्र डॅा. आमटे यांची प्रकृती उत्तम असून ते उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. पण ल्युकेमिया आजार म्हणजे काय?
शरीरात रक्ताचे अस्तित्व हे श्वासाइतकेच महत्त्वाचे आहे. शरीरात त्याची कमतरता असल्यास अनेक आजारांचा धोका वाढतो. ल्युकेमिया हा रक्ताशी संबंधित गंभीर आजार आहे, ज्याला ब्लड कॅन्सर असेही म्हणतात. या आजारात शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या असामान्यपणे वाढते. या कर्करोगाच्या पेशी अस्थिमज्जामध्ये वाढतात आणि निरोगी रक्त पेशींची वाढ रोखण्यासाठी अस्थिमज्जामध्ये राहतात. यावर वेळीच उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. म्हणून, त्याच्या लक्षणांकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.
ल्युकेमिया किंवा रक्ताचा कर्करोग म्हणजे काय?
ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर हा रक्तवह स्रोतसाचा आजार असून यात मुख्यत: अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो व रक्त यांच्यात प्रथम कॅन्सरच्या विकृत पेशींची निर्मिती होते व नंतर या पेशी यकृत, प्लीहा, लसिका ग्रंथी, मस्तिष्क, वृषण या अवयवांत पसरतात. ल्युकेमियाचे कोणत्या प्रकारच्या रक्तपेशी कॅन्सरग्रस्त पेशींत परिवर्तित होतात, त्या किती वेगाने वाढतात, यानुसार अॅक्युट लिफोसायटिक ल्युकेमिया (ए.एल.एल.), अॅक्युट मायलॉइड ल्युकेमिया (ए.एल.एम.), क्रॉनिक लिफोसायटिक ल्युकेमिया (सी.एल.एल.) व क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (सी.एम.एल.) हे प्रमुख प्रकार आढळतात.
बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जा हा अस्थींमधील आतील मृदू भाग असून त्यात प्रामुख्याने स्टेम सेल्स व परिपक्व अशा रक्त निर्माण करणाऱ्या पेशी असतात. प्राकृतावस्थेत या पेशी अनेक अवस्थांतून परिवर्तित होऊन पूर्णत: विकसित अशा पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी व प्लेटलेटस्ची निर्मिती करतात. याच परिवर्तनाच्या प्रक्रियेत विकृती आल्यास कॅन्सरग्रस्त रक्तपेशी निर्माण होतात व ल्युकेमिया निर्माण होतो.
पांढऱ्या रक्तपेशींमधील लिफोसाइटस् कॅन्सरग्रस्त झाल्यास लिफोसायटिक ल्युकेमिया व्यक्त होतो व लिफोसाइटस् सोडून अन्य पांढऱ्या पेशी, लाल रक्तपेशी व प्लेटलेटस् कॅन्सरग्रस्त झाल्यास मायलॉइड ल्युकेमिया निर्माण होतो. अस्थिमज्जेत रक्तपेशी मोठ्या प्रमाणात योग्य प्रकारे परिपक्व झाल्या नाहीत तर अपरिपक्व ल्युकेमियाग्रस्त पेशींचे पुनर्जनन होतच राहाते व अॅक्युट म्हणजे जलदगतीने पसरणारा ल्युकेमिया निर्माण होतो. याउलट जेव्हा अस्थिमज्जेत रक्तपेशी काही प्रमाणात परिपक्व होतात व बहुतांशी प्राकृत रक्तपेशींप्रमाणेच दिसतात, तेव्हा क्रॉनिक म्हणजे कूर्मगतीने फैलावणारा ल्युकेमिया होतो. मात्र या रक्तपेशी प्राकृत रक्तपेशींची काय्रे करीत नाहीत व त्यामुळे ल्युकेमियाची लक्षणे व्यक्त होतात.
ल्युकेमिया कोणामध्ये आढळतो?
अॅक्युट लिफोसायटिक ल्युकेमियाचे प्रमाण ५ वर्षांखालील बालकांत व ५० वर्षांनंतर अधिक असून मृत्यूचे प्रमाण मात्र बालकांत कमी असते. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार अॅटॉमिक बॉम्बसारख्या रेडिएशनशी व बेंझिनसारख्या केमिकल्सशी दीर्घकाळ संपर्क, डाऊन सिंड्रोम क्लायनेफेल्टर सिंड्रोम, न्यूरोफायब्रोमेटॉसिससारख्या जन्मजात क्रोमोझोमल विकृती, फिलाडेल्फिया क्रोमोझोमसारख्या जन्मोत्तर क्रोमोझोमल विकृती असलेल्या व्यक्तींत ए.एल.एल. होण्याची संभावना अधिक असते.
ल्युकेमियाची लक्षणे कोणती?
ताप येणे, वजन कमी होणे, रात्री अधिक घाम येणे, भूक मंदावणे, चक्कर येणे, दम लागणे, अशक्तपणा, नाक व हिरडय़ांतून रक्तप्रवृत्ती, वारंवार जंतुसंसर्ग होणे ही ए.एल.एल.ची सामान्य लक्षणे असून लसिकाग्रंथीत पसरल्यास मान, काख, जांघ येथील लसिकाग्रंथींचा आकार वाढणे, पोटाचा आकार वाढणे, मस्तिष्क व मज्जारज्जूत परसल्यास चक्कर येणे, डोके दुखणे, फिटस् येणे अशी लक्षणे दिसतात. रक्ततपासणी, बोन मॅरो अॅस्पिरेशन व बायॉप्सी, प्लोसायटोमेट्री, सायटोजिनेटिक्स, फिश टेस्ट, पी.सी.आर., लिफ नोड बायॉप्सी, मस्तिष्कजलाचे परीक्षण या तपासण्यांच्या साहाय्याने ए.एल.एल.चे निदान निश्चित होते.
यावर उपचार कसे केले जातात?
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार ल्युकेमियामध्ये प्रामुख्याने मुखावाटे व शिरेवाटे केमोथेरॅपी, टारगेटेड थेरॅपी, रेडियोथेरॅपी व स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट या चिकित्सापद्धतींचा अवलंब केला जातो.
ल्युकेमिया कशामुळे होतो?
रक्तधातू व पित्तदोष यांच्या गुण-कर्मात बरेचसे साम्य असल्याने पित्तदोषाला दूषित करणारा आंबट- खारट- तिखट चवीचा, उष्ण- तीक्ष्ण- विदाही (जळजळ निर्माण करणारा) गुणाचा आहार; दही- शिळे पदार्थ- विरुद्धान्न- आंबवलेले पदार्थ असा रक्ताची दुष्टी करणारा आहार अधिक प्रमाणात व वारंवार सेवन करणे ल्युकेमियास कारणीभूत ठरतात असे आढळले आहे. ज्या कारणांनी व्याधी निर्माण झाली आहे ती कारणे कटाक्षाने टाळणे हे चिकित्सेचे पहिले सूत्र असल्याने ल्युकेमियाच्या रुग्णांनी या सर्व गोष्टी टाळणे अनिवार्य आहे.