मंगळवारी (१ नोव्हेंबर ) राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यांतील ‘मानगढ धाम’ येथे संबोधित करताना मानगढ येथे १९१३ मध्ये घडलेले हत्याकांड भारताच्या इतिहासात दुर्लक्षित राहिल्याची खंत पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवली. तसेच ही आता चूक सुधारण्याची वेळ असून आगामी काळात ‘मानगढ धाम’ला एक वेगळी ओळख मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मानगढ हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही भीषण असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल म्हणाले. मात्र, १७ नोव्हेंबर १९१३ रोजी मानगढमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : एलॉन मस्क Twitter Verification धोरण बदलणार, कोणाला किती पैसे मोजावे लागणार? काय आहे ‘ब्लू टिक’ शुल्क वाद?

पंतप्रधान मोदी नेकमं काय म्हणाले होते?

“मानगढ येथे इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात १५०० पेक्षा जास्त आदिवासी नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र, दुर्देवाने भारताच्या इतिहासात या घटनेला योग्य ते स्थान मिळू शकले नाही. मात्र, आता ही चुकी सुधारण्याची वेळ आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. तसेच त्यांनी यावेळी गोविंद गुरू यांना अभिवादन केले. “गोविंद गुरू हे महान स्वातंत्रसैनिक होते. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लढा दिला”, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राजस्थान शेजारी असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेशच्या राज्य सरकारांना ‘मानगढ धाम’ विकसित करण्यासाठी योजना तयार करण्याचीही विनंती केली.

मात्र, ‘मानगढ हत्याकांड’ नेमकं काय होतं? हे जाणून घेण्यापूर्वी १७ नोव्हेंबर १९१३ पूर्वीची परिस्थिती नेमकी कशी होती हे जाणून घेणं, हे महत्त्वाचं आहे.

हेही वाचा – विश्लेषण: काही व्यक्तींना मुळातच कमी झोप कशी येते? हे गुणसूत्रांमुळे घडते? नवीन अभ्यास काय सांगतो?

हत्याकांड घडण्यापूर्वीची परिस्थिती काय होती?

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात राहणाऱ्या भिल्ल आदिवासी समाजावर इंग्रजांकडून अत्याचार सुरू होते. २०व्या शतकाच्या अखेरीस राजस्थान आणि गुजरातमध्ये राहणारे आदिवासी हे बंधपत्रित मजूर होते. इंग्रजांचे अत्याचार, मजुरी आणि दोन वेळचे जेवणं एवढाच काय त्यांच्या आयुष्याचा भाग होता. दरम्यान, १८९९-१९०० मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. आदिवासी समाजाच्या या परिस्थितीला त्यावेळची सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि दारूचे व्यसन हे मोठे कारण होतं. अशावेळी समाजसुधारक गोविंद गुरू यांनी ही परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी १९०८ मध्ये ‘भगत चळवळ’ सुरू केली. नागरिकांना शाहाकारी बनवणे आणि दारूचे व्यसन सोडवणे, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता. त्यांनी त्यांच्या समर्थकांना इंग्रजांची गुलामगिरी सोडून स्वत:च्या हक्कासाठी लढवणे शिकवले. आदिवासी समाज जसाजसा जागरूक होत गेला, त्यामुळे इंग्रजांपुढे अडचणी निर्माण होऊ लागल्या.

१९०३ मध्ये, गोविंद गुरूंनी बांसवाडा आणि संतरामपूरच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलाच्या मध्यभागी मानगढ टेकडीवर आश्रम स्थापन केला. याच ठिकाणाहून त्यांनी आदिवासींना एकत्रित आणि प्रशिक्षित करण्याचे कार्य सुरू ठेवले. दरम्यान, १९१३ मध्ये इंग्रजांनी त्यांना मानगढ टेकडी १५ नोव्हेंबर १९१३ पर्यंत खाली करण्याचे निर्देश दिले. मात्र, गोविंद गुरू आणि त्यांच्या समर्थकांनी हे आदेश धुडकावून लावले.

हेही वाचा – विश्लेषण: धान्य कराराच्या निमित्ताने रशियाकडून ‘ब्लॅकमेलिंग’? रशियाच्या पवित्र्याने का वाढतो जगभरात भूकपेच?

मानगढ हत्याकांड

गोविंद गुरू आणि त्यांच्या समर्थकांनी मानगढ टेकडी सोडण्याचा आदेश धुडकावून लावल्यानंतर इंग्रज अधिकारी आर.ई.हॅमिल्टनने संतरामपूर, डुंगरपूर आणि बांसवाडा या प्रदेशात सैन्य तैन्यात केले. तसेच एक तु़कडी मानगढ टेकडीच्या दिशेने रवाना केली.

गुजरात वनविभागाने प्रकाशित केलेल्या ‘द चीफ अॅक्टर ऑफ मानगढ रिव्हॉल्यूशन’, या पुस्तकानुसार “मेजर एस. बेली आणि कॅप्टन ई. स्टोईली यांनी हल्ल्यामध्ये वापरल्या जाणारी हत्यारं गाढवांवर लादून टेकडीवर पोहोचवली होती.”

१७ नोव्हेंबर १९१३ रोजी इंग्रजांनी मानगढ टेकडीवर उपस्थित गोविंद गुरू यांच्या समर्थकांवर गोळीबार करण्याचे निर्देश दिले. या गोळीबारात १५०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडानंतर गोविंद गुरू यांना ब्रिटीशांनी अटक केली. तसेच न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांची लोकप्रियता आणि तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे १९१९ मध्ये हैदराबाद तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, त्यांचे अनुयायी असलेल्या अनेक संस्थानांमध्ये त्यांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली.

हेही वाचा – विश्लेषण: ट्विटर ताब्यात घेणारे एलॉन मस्क ‘टेस्ला’मुळे अडचणीत; जगभरात दाखल होतायत खटले! नेमका काय आहे प्रकार?

कोण होते गोविंद गुरू?

गुरू गोविंदगिरी हे गोविंद गुरू या नावानेही ओळखले जातात. २० डिसेंबर १८५८ रोजी डूंगरपूर येथे बंजारा परिवारात त्यांचा जन्म झाला होता. १९०३ मध्ये त्यांनी स्वांतत्र लढ्यातही सहभाग घेतला होता. तसेच त्यांनी आदिवासी समाजाला शिक्षित करण्याचे महान कार्य केले. मानगढ हत्याकांडानंतर त्यांना ब्रिटीशांनी दहा वर्षाची शिक्षा सुनावली. १९३१ मध्ये गुजरातमध्ये त्यांचे निधन झाले.

हेही वाचा – विश्लेषण : पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व कसे दिले जाते?

इतिहासात दुर्लक्षीत?

भारताच्या इतिहासात ही घटना कायमच दुर्लक्षीत राहिली आहे. अनेक इतिहाकारांच्यामते ही घटना १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही भीषण होती. मात्र, शालेय पुस्तकांमध्ये याची खूप कमी माहिती आहे. दरम्यान, १९५२ पासून गोविंद गुरू यांच्या स्मरर्णार्थ दरवर्षी मानगढ टेकडीवर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच २०१५ मध्ये गोधरा विद्यापीठाला गोविंद गुरू यांचे नाव देण्यात आले.