ओमायक्रॉनबाधितांची वाढती संख्या, ओमायक्रॉनमुळे पुन्हा लॉकडाउन लागणार, ओमायक्रॉनमुळे परदेशामध्ये हाहाकार या आधी अशापद्धतीच्या बातम्या मागील काही आठवड्यांपासून सतत प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील सरकारने पावलं उचलायला सुरुवात केलीय. भारतामध्येही काही राज्यांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केलीय तर काही राज्यं लवकरच तशी घोषणा करण्याची शक्यात आहे. भारतामध्येही ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसतेय. मात्र दुसरीकडे आता जगभरामध्ये आणि खास करुन पाश्चिमात्य देशांमध्ये ‘डेल्मिक्रॉन’ची चर्चा सुरु झालीय. ‘डेल्मिक्रॉन’वरुन तज्ज्ञांमध्येच मतभेद असले तरी त्याचा धोका नाकारता येणार नाही असं सर्वाच जाणकारांचे म्हणणे आहे. जगासमोर २०२२ मध्ये ‘डेल्मिक्रॉन’चं मोठं संकट निर्माण होऊ शकतं अशी शक्यता आहे. पण ‘डेल्मिक्रॉन’ म्हणजे नक्की काय?, त्याचा भारताला किती धोका आहे? याचा सर्वाधिक फटका कोणत्या देशांना बसू शकतो? या आणि अशा अनेक शंका सर्वसामान्यांना आहेत. अनेकांनी तर ‘डेल्मिक्रॉन’ हा शब्दच पहिल्यांदा ऐकलाय. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात या ‘डेल्मिक्रॉन’बद्दल आणि त्याने निर्माण होऊ शकणाऱ्या संकटासंदर्भात…

डेल्मिक्रॉन म्हणजे काय?
डेल्मिक्रॉन हा करोना विषाणूचा नवा व्हेरिएंट नाहीय. हा शब्द डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन शब्दांपासून तयार करण्यात आलाय. सध्या हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातोय. पहिला म्हणजे एकाच वेळी दोन प्रकारच्या करोना विषाणूंचा होणारा प्रादुर्भाव आणि दुसरा म्हणजे या दोन्ही विषाणूंमधील रचेनतून संयुक्तरित्या निर्माण होण्याची शक्यता असलेल्या नव्या प्रकारच्या विषाणूलाही काहीजण याच नावाने संबोधताना दिसत आहेत. आता डेल्मिक्रॉनचा अगदी सामान्य भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या स्ट्रेनचा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणे. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या या दोन्ही विषाणूंचा प्रादुर्भाव एकाच वेळी होऊ लागला तर करोना रुग्णांची संख्या फार झपाट्याने वाढू शकते असा तज्ज्ञांचा दावा आहे. भारतामध्ये ओमायक्रॉनची चर्चा असली तरी काही देशांमध्ये ओमायक्रॉनबरोबरच डेल्टा व्हेरिएंटचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतोय. एका अहवालानुसार, ओमायक्रॉनचा अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. तर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशनने दिलेल्या माहितीनुसार डेल्टा व्हेरिएंटच्या प्रादुर्भावापैकी ९९.५ टक्के प्रकरण ही अमेरिकेशी संबंधित आहेत. प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनमुळे अमेरिकेमध्ये आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झालाय.

नक्की वाचा >> एक दोन नाही तर त्याने तब्बल आठ वेळा घेतली करोनाची लस… कारण ऐकून पोलिसही चक्रावले

‘डेल्मिक्रॉन’चा विषाणू तयार होऊ शकतो?
सध्या तरी डेल्मिक्रॉन असा कोणताही व्हेरिएंट नसला तरी भविष्यात असा एकादा व्हेरिएंट तयार होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांबरोबरच, वयस्कर व्यक्ती, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. कमी लसीकरण झालेल्या भागांमध्ये हे दोन्ही व्हेरिएंट फार वेगाने प्रादुर्भाव करु शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र दोन्ही व्हेरिएंट एकत्र येऊन एक सुपर स्ट्रेन तयार करु शकतात की नाही यावरुन तज्ज्ञांमध्येच मतमतांतरे आहेत. असं असलं तरी दोन्ही व्हेरिएंट एकत्र येण्याची शक्यता फेटाळण्यात आलेली नाहीय. काही संशोधकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अशाप्रकारे एकाच वेळी दोन व्हेरिएंट सक्रीय असले तरी ते एकत्र येऊन नवीन व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता दुर्मिळ आहे. मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळता येणार नसल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे.

नक्की वाचा >> Coronavirus: वुहान लॉकडाउननंतरचा चीनचा सर्वात मोठा निर्णय; १ कोटी ३० लाख लोकसंख्येचं संपूर्ण शहरच केलं क्वारंटाइन

डेल्मिक्रॉन निर्मितीची शक्यता कशी?
करोना विषाणूचे वेगवेगळे व्हेरिएंट हे त्यामधील जनुकीय रचना म्हणजेच आरएनएमधील बदलांमुळे निर्माण होतात. मानवाच्या पेशांचं मूळ हे ज्याप्रमाणे डीएनए आहे तसेच आरएनए असतात. या आरएनएमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. डेल्टा व्हेरिएंटचा करोना विषाणूच्या आरएनएची रचना ही ओमायक्रॉनच्या विषाणूच्या रचनेपेक्षा वेगळी आहे. या विषाणूंच्या आरएनएमध्ये सातत्याने बदल होत असतात. असाच एखादा बदल होऊन डेल्टा आणि ओमायक्रॉनमधील काही रचना एकत्र येऊन नवीन विषाणू तयार होण्याची शक्यता सध्या काही संशोधकांकडून व्यक्त केली जातेय. या जनुकीय रचनेमधील बदलामुळे अनेकदा नव्याने संशोधन करणं, नव्याने लसनिर्मितीबद्दल अभ्यास करणं, निर्माण केलेल्या लसी या नवीन विषाणूवर प्रभावी असणार की नाही याबद्दल शोध घेणं अशी बारीच काम वाढतात. त्यामुळेच नवीन व्हेरिएंट निर्माण झाल्यास त्यासाठी सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कराव्या लागतात. हे आर्थिक दृष्ट्या तसेच वेळेचा विचार करता फार खर्चिक काम असतं.

नक्की वाचा >> “करोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदी ‘मृतदेहांचं डम्पिंग ग्राऊंड’ झालेली”; स्वच्छ गंगा मोहिमेच्या प्रमुखांचा दावा

भारताला ‘डेल्मिक्रॉन’चा धोका किती?
महाराष्ट्राच्या कोव्हिड-१९ टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या शशांक जोशी यांनी, “डेल्मिक्रॉन या डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या एकत्र संसर्गामुळे युरोप आणि अमेरिकेतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय,” असं सांगितलं. ओमायक्रॉन पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेला.आतापर्यंत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव तब्बल ८९ देशांमध्ये झालाय. भारतामध्ये ओमायक्रॉनचे ३५४ रुग्ण आढळून आले आहेत. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या डेल्टा डेरिवेटिव्स, डेल्टा प्रकारातील विषाणूचा भारतामध्ये प्रादुर्भाव होतोय. जगभरातील अनेक देशांमध्ये आता डेल्टापेक्षा अधिक वेगाने ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होतोय. मात्र भविष्यात डेल्टा डेरिवेटिव्ह आणि ओमायक्रॉन विषाणू कशापद्धतीने परिणाम करतील हे आताच सांगता येणार नाही किंवा त्याचा अंदाजही बांधता येणार नाही.” “मुंबई, दिल्लीमधील सर्वेक्षणानुसार सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९० टक्के लोकांना करोनाची बाधा होऊन गेलीय. तसेच ८८ टक्के लोकसंख्येने करोना लसीचा किमान एक डोस तरी घेतलेला आहे,” अशी माहितीही जोशी यांनी दिली. लसीकरण आणि डेल्टाचा प्रादुर्भाव पाहता भारताआधी युरोपीयन देश आणि पाश्चिमात्य देशांमध्ये डेल्मिक्रॉनचा अधिक परिणाम दिसून येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

Story img Loader