गुरूवारी (२७ ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेटपटूंसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. महिला आणि पुरुष खेळाडूंना यापुढे समान वेतन दिलं जाणार असल्याची मोठी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली. महिला आणि पुरुष खेळाडूंमधील भेदभाव दूर करण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल असल्याचं जय शाह यांनी सांगितलं. मात्र, बीसीसीआयचे नवे वेतन धोरण नेमके काय आहे? हा निर्णय घेण्यापूर्वी महिला क्रिकेटपटूंना नेमकं किती वेतन दिले जात होते? या निर्णयानंतर महिला क्रिकेटपटूंच्या वेतन नेमके किती वाढणार आहे? जाणून घेऊया.
बीसीसीआयचे नवे वेतन धोरण काय आहे?
बीसीसीयाने महिला किक्रेटपटूंसाठी नवे वेतन धोरण जाहीर केले आहे. या नव्या वेतन धोरणानुसार पुरुष खेळाडूंप्रमाणेच महिला खेळाडूंना समान वेतन दिलं जाणार आहे. त्यामुळे महिला खेळाडूंनाही आता पुरुष खेळाडूंप्रमाणे कसोटी सामन्यासाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी सहा लाख आणि टी-२० साठी तीन लाख मानधन दिले जाणार आहे.
जय शाह यांनी नेमकं काय म्हटलं?
नवे वेतन धोरण जाहीर करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया जय शाह यांनी दिली होती. “बीसीसीआयने भेदभाव दूर करण्याच्या हेतूने पहिलं पाऊल टाकल्याची घोषणा करण्यात मला आनंद होत आहे. बीसीसीआयशी करारबद्ध असणाऱ्या महिला खेळाडूंसाठी आम्ही समान वेतन धोरणाची अमलबजावणी करत आहोत. भारतीय क्रिकेटमधील स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगात आपण प्रवेश करत आहोत. महिला आणि पुरुष खेळाडूंची मॅच फी यापुढे समान असेल,” असे ट्वीट जय शाह यांनी केले होते.
हेही वाचा – विश्लेषण: फिशर रँडम बुद्धिबळ स्पर्धेचे वेगळेपण कशात? काय आहेत नियम? कार्लसनला कोण देणार टक्कर?
खेळाडूंना वेतन कसे दिले जाते?
बीसीसीआयच्या वेतन धोरणानुसार पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंबरोबर वार्षिक करार करण्यात येतो. या करारानुसार त्यांना वर्षासाठी एक निश्चित रक्कम दिली जाते. तसेच ज्या खेळाडूंनी नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे किंवा ज्यांना करार केलेल्या खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांना प्रत्येक सामन्यानुसार मानधन दिले जाते. दरम्यान, खेळाडूंच्या श्रेणीचा विचार केला, तर यात अजूनही तफावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, एकंदरीतच या निर्णयामुळे महिला खेळाडूंना दिलासा मिळाला आहे.
नव्या वेतन धोरणापूर्वी खेळाडूंचे वेतन किती?
वर्ष २०२१-२२ मध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंशी केलेल्या करारानुसार ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना ५० लाख प्रतिवर्ष, ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना ३० लाख प्रतिवर्ष तर ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना १० लाख प्रतिवर्ष वेतन देण्यात आले. याची तुलना जर पुरुष खेळाडूंबरोबर केली, तर यात मोठी तफावत आहे. २०२१-२२ च्या करारानुसार पुरुष खेळाडूंना ‘अ+’, ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा चार श्रेणींमध्ये वेतन दिले जाते. पुरुष खेळाडूंसाठी ‘अ+’ एक अतिरिक्त श्रेणी असून त्यांसाठी सात कोटी प्रतिवर्ष वेतन, तर ‘अ’ श्रेणासाठी पाच कोटी, ‘ब’ श्रेणीसाठी तीन कोटी आणि ‘क’ श्रेणासाठी एक कोटी रुपये प्रतिवर्ष वेतन दिले जाते. याचाच अर्थ नव्या वेतन धोरणापूर्वी जितके वेतन पुरुष खेळाडूंच्या ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना दिले जात होते, त्याच्या अर्धे वेतन ‘अ’ श्रेणीतील महिला खेळाडूंना दिले जाते.
हेही वाचा – विश्लेषण: डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धती काय आहे? या पद्धतीमुळे धक्कादायक निकालांची शक्यता वाढते का?
महिला क्रिकेटपटूंची श्रेणी काय?
बीसीसीआयच्या करारानुसार ‘अ’ श्रेणीत हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, पूनम यादव, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड यांचा समावेश आहे. तर ‘ब’ श्रेणीत मिताली राज, झुलन गोस्वामी, तान्या भाटिया, शफाली वर्मा, पूजा वस्त्राकर आणि ‘क’ श्रेणीत पूनम राऊत, शिखा पांडे, रिचा घोष, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, स्नेह राणा यांचा समावेश आहे.