सध्या अनेक सेलिब्रिटी सरोगसीच्या मदतीने पालक बनत आहेत आणि भारतातही सरोगसीचा ट्रेंड खूप वाढला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई बनली आहे. नयनताराचे पती विघ्नेश शिवन यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली. नयनतारा विघ्नेश शिवन यांचा विवाह यावर्षी ९ जून २०२२ रोजी झाला होता. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, दुसरीकडे हे दाम्पत्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहचले आहे.

नेमका वाद काय?

भारतीय सरोगसी कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रिया या दाम्पत्याने पाळल्या आहेत की नाही अशी शंका अनेकांनी उपस्थित केली आहे. कारण या दोघांचा विवाह चार महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. तसेच अनेक कायदे तज्ञांच्या मते यावर्षीच्या जानेवारीपासून सरोगसी कायदा हा बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. या प्रकरणावर तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यन यांना प्रश्न विचारण्यात आले त्यांनी, ‘आम्ही यांची चौकशी करू’ असे सांगितले. ते पुढे म्हणाले ‘सरोगसीबाबत अनेक वाद होत असतात. जर कुटुंबाची मान्यता असेल आणि व्यक्तीचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त आणि ३६ वर्षांपेक्षा कमी असेल तर अशांना कायद्यात मान्यता आहे. भारतात व्यावसायिक सरोगसीवर बंदी असताना, सरोगेटने किमान एकदाच लग्न केले पाहिजे आणि तिला स्वतःचे मूल असावे असा निकष आहे’. असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात अशी शक्यता वर्तवली जात आहे की नयनतारा आणि विघ्नेश यांनी डिसेंबर २०२१ पूर्वी सरोगसी प्रक्रिया सुरू केली होती, जेव्हा व्यावसायिक सरोगसीला परवानगी होती.

विश्लेषण: सौरव गांगुलीच्या पत्नीला चिकनगुनियाची लागण; डासांमुळे होणारा हा आजार कसा टाळाल?

सरोगसी म्हणजे नेमकं काय?

सरोगसी म्हणजे आधुनिक तंत्राद्वारे मूल जन्माला घालणे, जी स्त्री दुसऱ्याचे मूल स्वतःच्या पोटात वाढवते तिला सरोगेट मदर असे म्हणतात. यात स्त्री तिच्या स्वतःच्या आणि दात्याच्या अंड्याद्वारे दुसऱ्या जोडप्यासाठी गर्भवती राहते. यामध्ये जोडपे आणि सरोगेट मदर यांच्यात एक करार केला जातो. ज्यात जोडप्याने त्या सरोगेट मदरची काळजी, वैद्यकीय तपासण्यांचा खर्च द्यायचा असतो. तसेच कायद्यानुसार सरोगेट मदर मुलाला जरी जन्म दिला तरी पालक मात्र जोडपेच असणार.

कायदा काय सांगतो?

२०१९ पर्यंत या कायद्यात सरोगेट महिलेकडे सरोगसी करण्यासाठी वैद्यकीयदृष्टया फिट असण्याचे प्रमाणपत्र आवश्यक होते. तसेच ज्या जोडप्याला सरोगसीचाअवलंब करायचा आहे त्यांच्याकडे आई वडील होण्यासाठी अयोग्य असल्याचा पुरावा असायला हवा. मात्र २५ जानेवारी २०२२ पासून व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे.सध्या, केवळ परोपकारी सरोगसीला परवानगी आहे म्हणजे सरोगेट मातेला वैद्यकीय खर्चाशिवाय कोणतेही मानधन किंवा इतर आर्थिक प्रोत्साहन मिळणार नाही.

विश्लेषण : बॉलिवूडच्या ‘शहेनशहा’नं भारताला काय दिलं? या वयातही का आहे रसिकांच्या मनावर गारुड?

सरोगसीचा पर्याय निवडलेले सेलिब्रेटी :

नयनतारा विघ्नेश शिवन यांच्या आधी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी हा पर्याय निवडला आहे. फराह खान – शिरीष कुंदर, आमिर खान – किरण राव, सोहेल खान – सीमा खान, शाहरुख खान – गौरी खान, करण जोहर. हॉलिवूडमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे मात्र आता भारतातदेखील हा प्रकार वाढत आहे.