मोहन अटाळकर

अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाक् युद्ध सुरू आहे. त्यात अनेकवेळा आक्षेपार्ह भाषेचा वापर झाला आहे. रवी राणांनी बच्चू कडूंवर सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर ‘येत्या १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, अन्यथा परिणामांची तयारी ठेवा’ असे आव्हानच कडूंनी राणांना दिले. सत्तारूढ आघाडीतील या दोन आमदारांच्या वादात शिंदे-फडणवीस सरकारला देखील परीक्षा द्यावी लागत असल्याने कडू आणि राणा यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

बच्चू कडू, रवी राणांमधील वादाला कशी सुरूवात झाली?

गेल्या ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदार संघातील एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राणांनी बच्चू कडू यांना डिवचणारे एक वक्तव्य केले. ‘मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… हे या मतदार संघातल्या आमदाराचे ‘स्लोगन’ आहे,’ अशी टीका त्यांनी केली. मेळघाटातील धारणी येथेही त्यांनी बच्चू कडूंना पुन्हा डिवचले. त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडूंनी रवी राणांविषयी असंसदीय शब्दांचा वापर केला आणि त्यानंतर हा वाद चांगलाच वाढत गेला. त्याआधी उभय नेते अशा पद्धतीने वाद घालताना दिसून आलेले नव्हते.

“माझं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर, पण…”, बच्चू कडूंचा इशारा; म्हणाले, ” एक तारखेला ट्रेलर येणार!”

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात स्पर्धा का निर्माण झाली?

बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे आमदार आहेत. पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्याच वेळी रवी राणांना त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा जनाधार वाढविण्याचे वेध लागले आहेत. अचलपूर आणि मेळघाट या दोन विधानसभा मतदार संघांमध्ये बच्चू कडू हे विरोधक म्हणून सामोरे येण्याची शक्यता लक्षात घेऊन राणा दाम्पत्याने कडू यांना लक्ष्य केल्याचे‍ दिसून आले आहे. बच्चू कडू यांचे राजकारण संपविण्याचा हा डाव असल्याचे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नवनीत राणा यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी मैदान सज्ज करण्याच्या प्रयत्नात रवी राणांनी थेट कडू यांच्या मतदार संघात जाऊन आव्हान दिल्याने बच्चू कडू हे संतापल्याचे पहायला मिळाले.

बच्चू कडूंनी राणांना कोणते आव्हान दिले आहे?

बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन ‘खोके’ घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला, त्याचे पुरावे येत्या १ नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत, अन्यथा आपण मोठा ‘बॉम्ब’च फोडणार आहोत, असा इशारा बच्चू कडूंनी दिला. हा ‘बॉम्ब’ कोणता असेल, याची उत्सुकता ताणली गेली आहे. रवी राणा स्वत:हून आपल्या विरोधात अशी भूमिका घेतील, असे आपल्याला वाटत नाही, आपल्याला संपविण्याचा डाव कुणी आखला असेल, तर वेगळा विचार करावा लागेल, असे कडूंनी म्हटले आहे. राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. या वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मध्यस्थी करतील, असे सांगितले जात आहे.

बच्‍चू कडू, रवी राणांमध्‍ये संघर्षाची ठिणगी नेमकी केव्‍हा पडली ?

मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू, रवी राणा अस्वस्थ आहेत का?

बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. सत्ताबदलानंतर पहिल्या विस्तारात कडू यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, अजूनही त्यांचे नाव प्रतीक्षायादीत आहे. रवी राणादेखील मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. मंत्रिपदाची लालसा आपल्याला नाही, आपल्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम असल्याचे ते सांगतात, पण त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सत्ताबदल होऊनही मनासारखे काही होताना दिसत नाही, ही त्यांची खंत आहे. रवी राणा हे देवेंद्र फडणवीस समर्थक आहेत, तर बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटातील मानले जातात. कडू आणि राणा हे परस्पर स्पर्धक ठरले आहेत. यांच्यातील संघर्षाचे हेही एक कारण मानले जात आहे.

राणा आणि कडूंमधील हा संघर्ष टोकदार कसा बनला?

बच्चू कडू आणि रवी राणा हे सत्तारूढ आघाडीचे घटक असले, तरी स्थानिक सत्तासंघर्ष उफाळून आला. दोघांच्या शाब्दिक युद्धात आक्षेपार्ह भाषा वापरल्या गेल्याने स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. दोन्ही नेत्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे, बच्चू कडू यांनी तर आपल्या घरालाच आग लागली आहे, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सांगून हतबलता व्यक्त केली. ‘खोके’ घेतल्याच्या आरोपामुळे सर्वच सत्तारूढ आमदारांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरोपांबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी कडूंची अपेक्षा आहे. ती पूर्ण होणार का, हा प्रश्न आहे.

mohan.atalkar@expressindia.com

Story img Loader