गेली दोन वर्षे, मे २०२० पासून भारत-चीन दरम्यान लडाख सीमेवर तणावाचे वातावरण आहे. लडाखमधील काही भागात सीमेवर चीनने सैन्य आणल्याने आणि भारताला गस्त घालण्यास अटकाव केल्याने ही संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. लडाखमधील गलवान भागात जून २०२० मध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवान आणि अधिकाऱ्यांना वीरमरण आले होते, या संघर्षात चीनचे ४० जवान ठार झाले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले असून आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या करण्याचं काम जोरात सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा सर्व तणाव निवळण्यासाठी लष्करी पातळीवर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. नुकत्याच झालेल्या १६ व्या चर्चेच्या फेरीनंतर लडाखच्या पूर्व भागात गोगरा – हॉट स्प्रिंग्स भागातील Patrolling Point 15 (PP15) या भागात तैनात असलेले सैन्य मागे घेण्याचे चीनने मान्य केले आहे. येत्या सोमवारपर्यंत ही सैन्य माघारी पूर्ण होईल, चीनप्रमाणे भारतही या भागातील सैन्य मागे घेणार आहे. सैन्य माघारी दरम्यान PP15 भागात असलेले पक्के बांधाकाम तोडण्याचे ठरवण्यात आले आहे. याबाबतची खात्री दोन्ही देशांच्या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. PP15 भागातून सैन्य माघारी हा भारतासाठी एक मोठी घडामोड ठरली आहे.

PP15 का महत्त्वाचे आहे?

पँगाँग सरोवराच्या उत्तर भागात गोगरा-हॉट स्प्रिंग्स हा परिसर असून या ठिकाणी PP15 हा भाग आहे. या भागातून भारतीय सैन्य मे २०२० च्या आधी नियमित गस्त घालत असे. मात्र त्या काळात लडाखमधील विविध भागात सीमेवर चीनने आगळीक केली. PP15 भागातून गस्त घालता येतील अशा सर्व मार्गांवर चीनने सैन्य आणून ठेवले आणि भारतीय सैन्याला अटकाव केला. त्यामुळे गोगरा-हॉट स्प्रिंग्स भागावर नियंत्रण ठेवणे भारताला अवघड जात होते. आता याभागातून सैन्य चीन मागे घेत असल्याने मे २०२० पूर्वी जशी परिस्थिती होती ती पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.

आणखी वादग्रस्त भाग कोणते?

गलवान संघर्षानंतर भारत-चीन दरम्यान लडाखमधील तणाव निवण्यासाठी लष्करी चर्चेच्या फेऱ्यांना सुरुवात झाली. सुरुवातीला या फेऱ्यांमधून काहीही निष्पन्न झालं नाहीा. मात्र त्यानंतर चीनने नरमाईचे धोरण स्विकारल्याने सीमेवरील तणाव निवळायला सुरुवात झाली. पँगाँग सरोवराच्या परिसरात आता बऱ्यापैकी सैन्य माघारी करण्यात आली असून मे २०२० च्या तुलनेत परिस्थिती सुधारली आहे. गलवान खोऱ्यात काही प्रमाणात परिस्थिती सुधारली असली तरी Charding Nala आणि Depsang Plains याभागात अजुनही तणाव कायम आहे.

PP15 मधील सैन्य माघारी सुरळीत पार पडली तर १५ सप्टेंबरला उझबेकिस्तान इथे होणाऱ्या Shanghai Cooperation Organisation च्या परिषदमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे. तिथे चीनचे अध्यक्ष जिनपिंग हेही सहभागी होणार आहेत. तेव्हा तिथे या दोन नेत्यांची भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असं असलं तरी दोन्ही देशांनी लडाखमध्ये थेट सीमेवर काही ठिकाणी पण सीमेजवळ मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले असून दोन्ही देशांचे लष्कर आणि वायू दल हे युद्धसराव तिथे करत आहेत. लडाखमधील काही भागांबाबत अजुनही वाद कायम असल्याने लष्करी चर्चेच्या फेऱ्या आणखी किती होतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is the significance of chinas military withdrawal from gogra hot springs area in ladakh asj
Show comments