अमित जोशी
इस्रोची उपग्रह प्रक्षेपणाची एक मोहिम रविवारी पार पडली. यामध्ये SSLV या नव्या रॉकेटचे-प्रक्षेपकाचे पहिले प्रायोगिक उड्डाण (SSLV-D1) झाले. इस्रोसह या क्षेत्राशी रुची असणाऱ्यांचे, देशासह जगभरातील अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित लोकं-संस्था यांचे या मोहिमेकडे लक्ष लागले होते.
या नव्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने इस्रोने दोन उपग्रह (EOS 02 आणि AzaadiSAT) ज्यांचे एकत्रित वजन एकुण ५०० किलोग्रॅमपेक्षा कमी आहे, अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित केले. मात्र उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर उपग्रह ज्या उपकरणावर आरुढ असतात त्याने व्यवस्थित काम न केल्यामुळे उपग्रहांना योग्य तो वेग मिळाला नाही आणि दोन्ही उपग्रह वापरासाठी योग्य नसल्याचे-निकामी असल्याचे जाहीर केले. त्यामुळे इस्रोच्या नव्या प्रक्षेपकापेक्षा या अपयशाचीच जास्त चर्चा झाली. SSLV हा नवा प्रक्षेपक इस्रोसाठी गेम चेंजर ठरणार आहे.
नवा प्रक्षेपक कसा आहे?
Small Satellite Launch Vehicle (SSLV) असं या प्रक्षेपकाचे नाव आहे. SSLV प्रक्षेपकाची उंची ३४ मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे, वजन ११० टन आहे. या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ५०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे, वेळ पडल्यास एक हजार किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे ५०० किलोमीटर ते अगदी एक हजार किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित केले जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रक्षेपक फक्त ७ कर्मचारी-तंत्रज्ञ-अभियंता उड्डाणासाठी सज्ज करु शकतात तेही अवघ्या सात दिवसात. त्यामुळे कमी वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी इस्रोच्या मनुष्यबळ, पैसा यांची मोठी बचत होणार आहे. यामुळे आवश्यकता भासल्यास दर आठवड्याला सुद्धा या नव्या प्रक्षेपकाद्वारे उपग्रह प्रक्षेपित करणे इस्रोला शक्य होणार आहे.
याआधी कमी वजनाचे उपग्रह पाठवण्यासाठी प्रतिक्षा करावी लागायची
इस्रोकडे सध्या २९० टन वजनापेक्षा जास्त वजन असलेला polar satellite launch vehicle (PSLV) आणि geosynchronous satellite launch vehicle प्रकारातील सुमारे ४१४ टन वजनाचा GSLV-II आणि तब्बल ६४० टन वजनाचा इस्रोचा बाहुबली GSLV Mark III असे एकुण तीन प्रक्षेपक उपलब्ध आहेत. उपग्रह प्रक्षेपणासाठी हे सर्व प्रक्षेपक सज्ज करतांना इस्रोला किमान दोन महिने आधी तयारी सुरु करावी लागते आणि यासाठी ६०० पेक्षा जास्त मनुष्यबळ कामी जुंपवावे लागते. हे सर्व प्रक्षेपक दोन टनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह सहज प्रक्षेपित करु शकतात. त्यामुळेच जर अधिक वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करायचे असतील तरच त्यामध्ये वजनाचे नियोजन करत या तीन अवाढव्य प्रक्षेपकांच्या सहाय्याने कमी वजनाचे उपग्रह इस्रो प्रक्षेपित करते. यामुळे कधी कधी कमी वजनाचे उपग्रह तयार असून सुद्धा इस्रोला या तीन प्रक्षेपकांच्या मोहिमेसाठी काही महिने थांबावे लागते. नव्या SSLV मुळे कमी वजनाचे उपग्रह हवे तेव्हा, स्वस्तात प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे.
कमी वजनाच्या उपग्रहांची वाढती मागणी
जगभरात कमी वजनाच्या उपग्रहांचा वापर हा दिवसेंदिवस वाढत आहे. कमी वजनाचे उपग्रह हे विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, संशोधन संस्था यांना आवश्यक आहेत. तसंच संदेशवहनासाठी, जमिनीची छायाचित्रे काढण्यासाठी, वाणिज्य वापराकरता, माहिती(Data) पाठवण्याकरता या लहान उपग्रहांची मागणी वाढत आहे. ५०० किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या उपग्रहांना उपग्रह असं सर्वसाधारणपणे म्हटलं जात असलं तरी त्यापेक्षा कमी वजनाच्या उपग्रहांना Small satellites, Microsatellites, Nanosatellites असं म्हंटलं जातं. अशा उपग्रहांचा कार्यकाल हा जेमतेम एक वर्षापर्यंतचा असतो. येत्या काही वर्षात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात अशा उपग्रहांची हजारोंच्या संख्येने गरज लागणार आहे. तेव्हा उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात भारतासह मोजके देश आणि खाजगी कंपन्या या कार्यरत असून एवढ्या कमी वजानाचे उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी एक स्पर्धा जगात सुरु झाली आहे, भविष्यात आणखी तीव्र होणार आहे.
या सर्वांमध्ये भारत हा सर्वात स्वस्तात उपग्रह प्रक्षेपित करतो. तेव्हा आता भारताच्या इस्रोकडे SSLV च्या रुपाने एक मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे येत्या काळात भारत जगाच्या तुलनेत शब्दशः शेकड्याने लहान उपग्रह अवकाशात पाठवत बक्कळ कमाई करु शकणार आहे. म्हणूनच SSLV हा इस्रोसाठी गेम चेंजर ठरणार आहे.