गेल्या काही वर्षात जगभरातील संरक्षण दलांमध्ये लढाऊ हेलिकॉप्टरने अनन्य साधारण स्थान प्राप्त केलं आहे. सोव्हिएत रशियाची अफगाणिस्तान मधील लढाई , अमेरिकेचे १९९० मधील इराक युद्ध यामध्ये लढाऊ हेलिकॉप्टरचे महत्व हे खऱ्या अर्थाने अधोरेखीत झाले. तसंच गेल्या काही वर्षात दहशतवाद विरोधी कारवायांसाठी लढाऊ हेलिकॉप्टर हे उपयुक्त असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. या सर्व पार्श्वभुमिवर भारताच्या संरक्षण दलात दाखल झालेले स्वदेशी बनावटीचे लढाऊ हेलिकॉप्टर हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दाखल झालेल्या या light combat helicopter (LCH) चे नाव आता ‘प्रचंड’ असे नाव ठेवण्यात आले आहे.
लढाऊ हेलिकॉप्टर का महत्त्वाचे?
नेहमीच्या वापरात असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बदल करत ते प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढण्यायोग्य बनवले गेले तर ते लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते. हेलिकॉप्टरला अधिक वेग प्राप्त व्हावा आणि हवेत कसरत करता यावी यासाठीही आवश्यक बदल केले जातात. यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी किंवा युद्ध सदृष्य प्रसंगी अशी लढाऊ हेलिकॉप्टर निर्णयक ठरतात. जंगलात, डोंगराळ भागात, रडारच्या क्षेत्रात न आलेल्या भागात वेगाने जात अचूक मारा करण्याची अनोखी क्षमता लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये असते. हवेतून हवेत मारा करणारी, हवेतून जमीनीवर मारा करणारी विविध क्षेपणास्त्रे तसंच गोळ्यांचा भडीमार करणारी गन यांमुळे लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर हा निर्णायक ठरतो. भर वस्तीमधील एखादी इमारत, जमिनीवर धावणारे रणागाडे-चिलखती वाहन, तसंच डोंगराळ भागातील-जंगलातील बंकर यावर हल्ला करण्याची- नष्ट करण्याची क्षमता लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये असते. काही वेळ वचक बसवण्यासाठी गस्त घालण्याची जबाबदारी लढाऊ हेलिकॉप्टर पार पाडतात. युद्धप्रसंगी जमिनीवरील सैन्याला किंवा प्रवास करणाऱ्या लष्करी ताफ्याला संरक्षण देण्याचे कामही अशी लढाऊ हेलिकॉप्टर करतात. यामुळेच लढाऊ हेलिकॉप्टरला सध्या संरक्षण विभागात अनन्य साधारण असं महत्व आहे.
संरक्षण दलासाठी ‘प्रचंड’ का महत्वाचे?
कच्छचे रण, राजस्थानचे वाळवंट, पंजाबमधील सुपिक प्रदेश, हिमालयातील घनदाट जंगल, डोंगराळ भाग ते लडाखमधील अतिथंड असे वाळवंट अशा समुद्रालगतच्या भागापासून ते अति उंच अशा अत्यंत प्रतिकूल आणि भौगोलिक वैविध्यता असलेल्या सीमेवर भारताचे सैन्य हे गस्त घालत आहे. अशा भागात प्रत्यक्ष कारवाईची आवश्यकता भासल्यास ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर हे निर्णायक ठरतील यात शंका नाही. पाकिस्तान आणि चीनची शस्त्रसज्जता लक्षात घेता लढाऊ हेलिकॉप्टरची नितांत आवश्यकता आहे. दहशतवाद्यांचा उपद्रव लक्षात घेता भर वस्तीत अचूक मारा करण्यासाठीही लढाऊ हेलिकॉप्टर वेळप्रसंगी वापरले गेले तर आश्चर्य वाटायला नको. कारगील युद्धात हिमालयात भक्कम असे बंकर घुसखोरांनी बनवले होते, ते उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा तिथे अचूक मारा करण्यासाठी लढाऊ हेलिकॉप्टरची नितांत आवश्यकता भासल्याचं स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
प्रचंड नेमकं कसं आहे?
बंगळूरु स्थित Hindustan Aeronautics Limited (HAL)ने ‘प्रचंड’ ची निर्मिती केली आहे. याच HAL ने स्वदेशी बनावटीचे ‘ध्रुव’ नावाचे हेलिकॉप्टर विकसित केले होते, जे २००२ मध्ये संरक्षण दलाच्या सेवेत दाखल झाले होते. याच हेलिकॉप्टरच्या आराखड्यात बदल करत ‘प्रचंड’ची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे ‘प्रचंड’ हे स्वदेशी बनावटीचे पहिले लढाऊ हेलिकॉप्टर ठरले आहे.
दोन पायलटच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर ऑपरेट करता येते. लांबी ५१ फूट, उंची १५ फूट असलेल्या ‘प्रचंड’चे वजन सुमारे सहा टन असून ते १.७ टन एवढा दारुगोळा वाहून नेऊ शकते. याचा जास्तीत जास्त वेग हा ३३० किलोमीटर प्रति तास एवढा असून एका दमात ५५० किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता आहे. तर हवेत जास्तीत जास्त तीन तास १० मिनीटे संचार करण्याची क्षमता असून गरज पडल्यास हे हेलिकॉप्टर २१ हजार ३०० फूट एवढी उंचीही गाठू शकते. सात किलोमीटर अंतरापर्यंतचे जमीनीवरील आणि हवेतील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेली विविध क्षेपणास्त्रे या हेलिकॉप्टरवर आहेत. ‘२० मिलीमीटर’ गनच्या माध्यमातून गोळ्यांचा वर्षावर करत शत्रू पक्षाला नेस्तनाबूत करण्याची अनोखी क्षमात यात आहे.
‘प्रचंड’ने पहिले उड्डाण हे २०१० च्या मार्च महिन्यात घेतले. आत्तापर्यंत चार प्रायोगिक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देशात विविध ठिकाणी, हवामानात चाचण्या घेण्यात आल्या. एवढंच नाही तर लडाखमध्ये भारत-चीन सैन्य आमने सामने उभे ठाकले असतांना प्रत्यक्ष युद्धभूमीजवळ तैनात करत ‘प्रचंड’ ची क्षमताही तपासण्यात आली. जानेवारी २०२१ मध्ये या हेलिकॉप्टरच्या प्राथमिक उत्पादनाला परवानगी देण्यात आली. आता वायू दलात दाखल झाल्याने मोठ्या प्रमाणात ‘प्रचंड’च्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बदलती रणनिती लक्षात घेता लष्कराला ९० पेक्षा जास्त तर वायू दलाला ६५ लढाऊ हेलिकॉप्टरची नितांत गरज आहे . असं असतांना अशा गरजेसाठी परदेशातील तंत्रज्ञावर अवलंबून रहाणे हे नेहमीच जोखमीचे ठरणार आहे. आता संरक्षण दलाची ही गरज light combat helicopter (LCH) – ‘प्रचंड’ माध्यमातून पुर्ण केली जाणार आहे. त्यामुळेच ‘प्रचंड’चा संरक्षण दलातील समावेश हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.