लीना मणिमेकलाई यांच्या काली या माहितीपटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या माहितीपटाच्या पोस्टरवरुन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत असून लीना यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचवेळी, लीना यांच्या काली या माहितीपटाची कथा काय आहे आणि  पोस्टरद्वारे काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा सर्वांमध्ये सुरू आहे.

एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात सिगारेट घेऊन उभ्या असलेल्या कालीमातेचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे. दिग्दर्शक लीना मनिमेकलाई यांच्या ‘काली’ या माहितीपटाचे हे पोस्टर आहे, ज्यावर लोक प्रचंड संतापलेले दिसत आहेत. ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून वाद सुरूच आहे. दरम्यान, चित्रपटाच्या कथेबाबतही अनेक चर्चा सुरु आहेत. या माहितीपटाच्या पोस्टरमध्ये लीना यांना काय संदेश द्यायचा आहे याबाबत त्यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

स्वतःच्या मामाशी लग्न ते आईचं उपोषण; वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिल्यात लीना मणीमेकल

मणिमेकलाई यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या चित्रपटात कालीमातेला मानवाच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बीबीसी तमिळला दिलेल्या मुलाखतीत लीना मनिमेकलाई म्हणाल्या होत्या की, “मी म्हणेन की काली ही एक महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहे जी राक्षसी प्रवृत्ती आणि वाईटाच्या सर्व टोकांना पायदळी तुडवते. हा माहितीपट अशीच एक व्यक्ती माझ्यात सामावली आणि त्यावेळी मी टोरंटोच्या रस्त्यावर फिरताना काय होईल हे दाखवतो.”

सिगारेट आणि कॅनेडाचे ते लोक

माहितीपटाबाबत पुढे बोलताना लीना म्हणाल्या की, “ज्या कॅनेडियन लोकांकडे घर नाही, जे गरीब कामगार वर्ग आहेत, जे उद्यानात झोपतात, त्यांच्याकडे फक्त एक सिगारेट आहे जी त्यांच्या मनोरंजनासाठी वापरली जाते. काली ती प्रेमाने स्वीकारते.”

पाहा व्हिडीओ –

कवयित्री, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि निर्मात्या म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या लीना यांनी असे अनेक चित्रपट बनवले आहेत ज्यात लैंगिक आणि सामाजिक अत्याचार उघडपणे दाखवण्यात आले आहेत. मादाथी आणि रेड सी या लीना यांच्या चित्रपटांमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, लीना यांच्या चित्रपटांमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीय महिलांचे चित्रण समाविष्ट असते.

Kaali poster row: शीर धडावर हवंय ना? अयोध्येतील साधूची लीना मणीमेकलाईना धमकी

टोरंटोमध्ये कालीचे माहितीपटाचे प्रदर्शन

टोरंटो येथील आगा खान संग्रहालयात ‘अंडर द टेंट’ प्रकल्पाचा एक भाग म्हणून मनिमेकलाई यांचा माहितीपट काली प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाल्यानंतर, कॅनडातील हिंदू समुदायाच्या नेत्यांकडून माहितीपटाबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ओटावा येथील भारतीय उच्चायुक्ताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना त्याच्याशी संबंधित सर्व प्रक्षोभक सामग्री काढून टाकण्याची विनंती केली.