संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाकाहारी की मासांहारी आहार हा वाद आपल्याकडे सार्वकालिक आहे. पशुहिंसेला विरोध म्हणून अनेक व्यक्ती, संस्था, समाज शाकाहाराचा आग्रह धरतात. मात्र शाकाहार म्हणजे केवळ मांसाहाराचाच नव्हे तर सर्वच प्राणीजन्य पदार्थ वर्ज्य करणे हे सांगणारी ‘वीगन’ चळवळ सध्या जगभरात पसरत आहे. १ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक वीगन दिन’ म्हणून साजरा केला जातो. दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मध अशा सर्वच प्राणीजन्य पदार्थांचा त्याग करणाऱ्या वीगनिझमविषयी…

‘वीगन’ चळवळ काय आहे?

डोनाल्ड वॉटसन या अमेरिकी प्राणीहक्क अधिवक्त्याने १९४४ मध्ये ‘वीगन’ हा शब्द तयार केला. वॉटसन हे अशा शाकाहारी लोकांच्या विरोधात होते, जे दुग्धजन्य पदार्थांचा वापर आहारात करतात. त्यांनी ‘व्हेजिटेरियन’ या शब्दातील पहिले तीन आणि अंतिम दोन अक्षरे घेऊन वीगन हा शब्द तयार केला. जगात शाकाहाराचा प्रसार करणारी चळवळ अनादी काळापासून आहे, मात्र याच शाकाहारी चळवळीचा एक भाग म्हणून वीगन चळवळ १९९४ पासून जगभर पसरली. ही चळवळ सुरू करण्याचे श्रेय जाते, ते ब्रिटनमधील प्राणीहक्कांसाठी काम करणारी प्रसिद्ध गायिका लुईस वॉलिस हिला. १९९४मध्ये वीगन सोसायटीची अध्यक्ष असलेल्या लुईस हिने या सोसायटीच्या सुवर्ण वर्धापन दिनानिमित्त १ नोव्हेंबर हा दिवस जागतिक वीगन दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून या दिवसाच्या माध्यमातून वीगन चळवळीचा प्रसार केला जातो. ब्रिटनमध्ये ‘वेगनरी’ नावाची सेवाभावी संस्था दरवर्षी जानेवारीमध्ये वीगन आहाराचे आव्हान करते. जानेवारीत नववर्षापासून वीगन आहाराचा संकल्प करण्याचा आणि तो राबवण्यास प्रोत्साहन देते. ब्रिटिश उद्योजक मॅथ्यू ग्लोव्हर आणि प्राणीहक्क प्रसारक जेन लँड यांनी २०१४ मध्येही ही चळवळ सुरू केली. २०२१मध्ये २०९ पेक्षा अधिक देशांतील नागरिकांनी त्यात सहभाग घेतला असून आता ही चळवळ वेगाने पसरत आहे.

हेही वाचा – विश्लेषण: आपण रोज किती तास झोप घ्यायला हवी? कमी किंवा जास्त झोपेमुळे शरीरावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

वीगन आहार म्हणजे नेमके काय?

वीगन हा शाकाहाराचाच एक भाग असला तरी वीगन आहारात काही शाकाहारी मानले जाणारे पदार्थही वर्ज्य असतात. लेक्टो व्हेजिटेरियन या शाकाहाराच्या प्रकारात दूध व दुग्धजन्य पदार्थांसह सर्व शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो, तर ल्याकटो ओव्हर व्हेजिटेरियन या प्रकारात अंडी खाण्यास मनाई नसते. मात्र वीगन या प्रकारात सर्वच प्राणीजन्य पदार्थ व्यर्ज केले जाते. म्हणजे मांसाहार व्यर्ज आहेच, पण त्याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, मध, प्राणीजन्य तेल-तूप यांचाही समावेश केला जात नाही. वीगन आहार करणारे नागरिक प्राण्यांपासून तयार केलेली उत्पादने किंवा प्राण्यांवर चाचणी केलेली उत्पादने वापरणेही टाळतात. प्राण्यांच्या चामड्यापासून तयार केलेले कपडे व वस्तू, रेशीम किड्यांचे रेशीम, मेंढीची लोकर, माशांपासून तयार करण्यात येणारे उत्पादने यांचा वापर ते करत नाहीत. अगदी प्राण्यांवर चाचणी करून तयार करण्यात आलेली सौंदर्य प्रसाधने, शॅम्पू, रंग, फ्लोअर पॉलिश यांचाही वापर करण्यास ते मनाई करतात. मात्र मासांहारी आहाराची सवय असणाऱ्यांसाठी काही देशांमध्ये ‘मीटलेस मीट’सारखे प्रकार तयार करण्यात आले आहे. या चळवळीचाच भाग म्हणून हे पदार्थ तयार करण्यात आले असून अमेरिका, यूके, कॅनडा आणि रशियामधील ‘केएफसी’सारख्या काही उपाहारगृहांमध्ये ‘फिंगर-लिकिन’ व्हेगन नगेट्स’ अशा वीगन खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. बियाँड मीट, क्वॉर्न, लाइटलाइफ या वीगन मांस उत्पादकांच्या सहयोगाने हे पदार्थ तयार करण्यात आले आहेत.

वेगनिझमचा भारतातील प्रसार शक्य?

भारतात २० ते ३९ टक्के नागरिक शाकाहारी असल्याचे सरकारी नोंदी सांगतात. मात्र भारतात शाकाहारी आणि मांसाहारी या दोनच प्रकारचे नागरिक आहेत. शाकाहारामध्ये वीगन आहार करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे, कारण भारतीयांचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरील निर्विवाद प्रेम. भारतात शाकाहारी चळवळ पसरवण्यास जैन धर्माचा मोठा हातभार आहे. महाराष्ट्रातही वारकरी आणि महानुभाव पंथाने शाकाहाराचा प्रसार केला. त्याशिवाय ब्राह्मण आणि लिंगायत समाजाताही काही जण मांसाहार वर्ज्य करतात. मात्र शाकाहारी भारतीयांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा वापर टाळत नाहीत. जैन समाज तर पूर्णपणे दुग्ध शाकाहारी आहेत. मात्र जागतिकीकरण आणि समाजमाध्यमांचा वाढता वापर यांमुळे भारतातही काही प्रमाणात वीगनिझमचा प्रचार होत आहे. मुंबई, पुण्यासह देशातील काही शहरांमध्ये पूर्णपणे वीगन उपाहारागृहांची संख्या वाढत आहे. बाजारातील अनेक उत्पादकांनी वीगन उत्पादने विक्रीसाठी आणली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात भारतात वीगनिझमचा प्रचार होत आहे.

वीगन आहार घेणाऱ्या भारतातील प्रसिद्ध् व्यक्ती कोणत्या?

प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेची सदस्य असलेली अभिनेत्री सोनम कपूर ही पूर्णपणे वीगनाहारी आहे. तिचा स्वत:चा फॅशन ब्रँड असलेल्या ‘ऱ्हिसन’ या कंपनीला प्राण्यांच्या चामड्यापासून पर्स बनविण्यास तिने मनाई केली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही २०१८ पासून वीगनिझमचा स्वीकार केला. त्याशिवाय अभिनेत्री कंगना राणावत, अभिनेता अमिर खान, चित्रपट निर्माती किरण राव, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडिस, नेहा धुपिया, रिचा चड्डा, मल्लिका शेरावत, इशा गुप्ता आदी कलावंतांनी वीगनिझमचा स्वीकार केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is veganism which is new trend gathering steam in india print exp sgy
Show comments