ग्रीनलॅड देशातील ८० टक्के भाग हा सदैव बर्फाच्छादीत असून या भागाला ग्रीनलॅडची बर्फाची चादर (Greenland ice sheet) या नावाने ओळखले जाते. या सर्व भागाची लांबी उत्तर-दक्षिण अशी सुमारे दोन हजार ९०० किलोमीटर तर पूर्व-पश्चिम अशी रुंदी ही एक हजार १०० किलोमीटर असून जाडी ही सरासरी दीड किलोमीटर एवढी आहे. अशा या बर्फाच्या चादरीचे क्षेत्रफळ तब्बल सतरा लाख चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे, महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापेक्षा पाचपटीने जास्त.
उत्तर ध्रुवाच्या जवळ असलेला या देशामधील बर्फाच्छादीत भाग सध्या अभ्यासकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. ही बर्फाची चादर वेगाने वितळत असून जर या भागातील सर्व बर्फ वितळला तर समुद्राच्या पातळीत न भूतो न भविष्यति अशी वाढ होईल असा एक अभ्यास Nature Climate Change या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. शास्त्रज्ञांच्या या अहवालामुळे या विषयात रुची असणाऱ्यांची जणू काही झोप उडाली आहे. यामध्ये Zombie Ice चे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Zombie Ice म्हणजे काय?
बर्फाची चादर असलेल्या मुळ जागेपासून वेगळा होत समुद्रात वाहत गेलेला हिमनग म्हणजे Zombie Ice अशी सर्वसाधारण व्याख्या करता येईल. जागतीक तापमानात वाढ होत असल्याने हिवाळ्यात बर्फाच्छादीत भागात नव्या बर्फवृष्टीचे – नव्या बर्फाचे प्रमाण हे लक्षणीय कमी झाले आहे. म्हणजे एकप्रकारे बर्फ हा रिचार्ज होत नाहीये. म्हणजेच मुख्य बर्फाच्छादीत भाग हा खुला रहाण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यात तापमान वाढ, यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगाने होत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे मुख्य बर्फाच्छादीत भागापासून हिमनग वेगळे होण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असे हिमनग समुद्राची पातळी वेगाने वाढवण्यास हातभार लावत आहेत.
यामुळे नक्की काय होईल?
ग्रीनलॅडचा ३.३ टक्के बर्फाच्छादीत भाग जरी वितळला तरी समुद्राच्या पातळीत वाढ होत त्याचा फटका जगभर बसण्याची भिती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. सध्याचा बर्फ वितळण्याचा वेग बघितला तर २०५० पर्यंत समुद्राची पातळी ही अर्ध्या मीटरने वाढणार असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे समुद्राच्या किनाऱ्यावरील ५७० पेक्षा जास्त विविध शहरांवर-गावांवर प्रभाव पडणार असून जगातील एकुण ८० कोटी लोकांना याचा थेट फटका बसण्याची भिती व्यक्त होत आहे. किनाऱ्यांवरील अनेक भाग हे पाण्याखाली जाणार आहेत.
त्यामुळेच Greenland ice sheet बाबतच्या ताज्या अहवालाने अनेकांची झोप उडाली असून जागतिक तापमान न वाढू देणे याबाबतीत उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत आणखी गांभीर्याने विचार सुरु झाला आहे.