-पंकज भोसले

जगण्यासाठी परधार्जिणेपणाची विविध टोके गाठणारे कोरियन कुटुंब (पॅरासाईट २०२०), मंदी-आर्थिक संकटात नोकरी गमावून नवगरीबी अनुभवणारा अमेरिकी समूह (नोमॅडलॅण्ड २०२१) आणि तीन मूक-बधीर व्यक्ती असलेल्या घरातील चौथी साधारण व्यक्ती जगाशी संवादाचा सेतू बनत कुटुंबचौरसातील चौथा कोन ठरत असल्याची कथा (कोडा २०२२) या गेल्या तीन वर्षांतील ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधील साम्य काय असेल, तर तिन्ही चित्रपटांतील गोष्ट वंचितांमधील संचित शोधताना दिसते. यंदा ऑस्कर पुरस्कार मिळविणाऱ्या ‘कोडा’ चित्रपटानिमित्ताने.

यंदाचे वेगळेपण… –

यंदा नेटफ्लिक्सच्या ‘पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ तर वॉर्नर ब्रदर्सच्या ‘ड्यून’ला १० नामांकने होती. वाॅल्ट डिझ्नेच्या ‘वेस्ट साईड स्टोरी’ला ‘बेलफास्ट’ चित्रपटासह सात नामांकने, तर वॉर्नर ब्रदर्सच्याच ‘किंग रिचर्ड’ला सहा नामांकने होती. नामांकनात नेटफ्लिक्स या नव्या मनोरंजन फलाटाची सर्वांत मोठी आघाडी होती. ‘डोण्ट लूक अप’ या विडंबनपटासह नेटफ्लिक्सच्या ‘पॉवर ऑफ डॉग’ला धरून एकूण २७ नामांकने मिळाली होती. चित्रपट स्पर्धेचे अभिनय, कथा, दिग्दर्शन या निकषांवर असलेले समीकरण आता पूर्णपणे मनोरंजनाचा फलाटानुसार ठरत असल्याचे यंदा ठळक झाले.

ॲपलची किमया… –

या क्षेत्रात उशिराने दाखल झालेल्या ॲपल टीव्हीने पहिल्या वर्षातच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळविण्याची किमया करून दाखविली. ॲपलने गेल्या वर्षात दिलेल्या सर्व मालिका आणि चित्रपट हे गुणवत्तेच्या पातळीवर सरस असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘होम बिफोर डार्क’, ‘तेहरान’, ‘सी’, ‘डॉक्टर ब्रेन’, ‘फाऊंडेशन’ आणि ‘टेड लासो’ ही त्यातील सर्वांत लोकिप्रय टायटल्स.

नवा पायंडा… –

भव्य-दिव्य, प्रायोगिक सोस किंवा कल्पना-वास्तवाची विशेष अनुभूती देणाऱ्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत सहजसाध्या विषय-आशयाचा चित्रपट ऑस्कर अकादमी श्रेष्ठ ठरवत असल्याचा पायंडा ‘कोडा’च्या निमित्ताने यंदा पहायला मिळाला.

रूपांतर असूनही…-

शॉन हेडर या दिग्दर्शिकेने २०१४ मधील एका फ्रेंच सिनेमाचे अमेरिकी रूपांतर ‘कोडा’मध्ये केले. मूळ फ्रेंच चित्रपटात शेतकरी असलेले कुटुंब ‘कोडा’मध्ये मत्स्यशेतीशी संबधित दाखविले आहे.

भिन्न कुटुंबाची गोष्ट… –

बड्या धेंडांमुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योगात तगून जाण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या रॉसी कुटुंबाची ही सरळसाधी गोष्ट. कुटुंब मात्र सर्वांसारखे सरळसाधे नाही. चौघांपैकी तिघे जन्मापासून मुके आणि बहिरे. तर शेंडेफळ असलेली सतरा वर्षीय रुबी (अमेलिया जोन्स) ही जन्मतःच बोलण्याची आणि ऐकण्य़ाची पूर्ण क्षमता घेऊन आलेली.

कथेतील वळण…-

रुबी दररोज पहाटे तीन वाजता गजर लावून बाप आणि भावासह मासेमारीला निघून जाते. तेथूनच शाळेचाही रस्ता पकडते. मत्स्यदर्पामुळे वर्गात हेटाळणी विषय बनलेल्या रुबीला शाळेच्या संगीत समूहात प्रवेश मिळतो. काही दिवसांनी संगीत शिक्षकाला तिच्या आवाजातील गुण लक्षात येतात. संगीत शिष्यवृत्तीसाठी तिच्या आवाजाला तयार करण्याचा विडा हा शिक्षक घेतो. पण कुटुंबचौकोनातील अविभाज्य कोन असलेल्या रुबीने कुटुंब सोडून शिकण्यासाठी इतरत्र जाण्याचा विचार म्हणजे त्या कुटुंबाचा संवादासाठी इतर जगाशी मार्ग खुंटण्याची शक्यता निर्माण करणारा असतो.

घडत जाण्याचा प्रवास…-

रुबीसमोर निर्णय घेण्यासाठी अटळ असलेल्या वळणांवर या कुटुंबाचा एकमेकांशी खुणांनी होणारा संवाद (त्यांच्या खुणांना सबटायटल्स देण्यात आल्या आहेत.) त्यांच्या चर्चा आणि रुबीचा भावनिक आणि मानसिक पातळीवर घडत जाण्याचा प्रवास म्हणजे ‘कोडा’ हा चित्रपट.

महासिनेमांच्या तुलनेत… –

संपूर्ण सकारात्मक ऊर्जेची अनुभूती दिणारे म्हणून काही चित्रपट असतात. त्यात या चित्रपटाचा समावेश करता येईल. एका बाजूला स्पीलबर्ग, पॉल थॉमस ॲण्डरसन या दिग्गजांचे महासिनेमा स्पर्धेत असताना खर्चाच्या आणि कलाकारांच्या दृष्टीनेही बेताचीच बेगमी असताना, ‘कोडा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळणे,ही जगभरच्या सिनेप्रेमींना चकित करणारी बाब होती.

Story img Loader