२४ सप्टेंबर २०१४ या दिवशी भारताने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विशेषतः अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना भारताच्या पराक्रमाने- विक्रमाने आश्चर्याचा धक्का बसला होता. मुळातच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आणि त्यातही उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच देश आजही आहेत. असं असतांना आत्तापर्यंत कोणत्याच देशाला अमेरिकेची नासा, रशिया आणि युरोपियन स्पेस एजन्सी सारख्या दिग्गज देशांना-संस्थांना पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत कृत्रिम उपग्रह पोहचवता आला नव्हता, तो पराक्रम भारताने-भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने (ISRO) केला होता. आता आठ वर्षानंतर मंगळयानामधील इंधन संपल्याने त्याचा संपर्क तुटला असल्याचे सांगत या मोहिमेची सांगता झाल्याचं इस्रोने जाहीर केलं आहे. या मोहिमेने काय फायदा झाला, याने किती फरक पडला याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…
मंगळयान मोहीम कशी होती?
साधारण १३०० किलो वजनाचे ‘मंगळयान’ ( मंगळ ग्रहाभोवती फिरू शकणारा कृत्रिम उपग्रह ) (Mangalyaan) हा इस्रोने श्रीहरीकोटा या तळावरुन PSLV या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ५ नोव्हेंबर २०१३ ला अवकाशात धाडला. थेट मंगळ ग्रहाकडे उपग्रह पाठवणारे शक्तीशाली प्रक्षेपक-रॉकेट आपल्याजवळ नव्हते. म्हणून पृथ्वीभोवती मंगळयानाला फिरत ठेवत त्याची कक्षा हळुहळु वाढवण्यात आली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करत एखाद्या गोफणीतून सुटलेल्या दगडाप्रमाणे गती घेत मंगळयान हे साधारण महिनाभरानंतर मंगळ ग्रहाकडे रवाना झाले. तीन वेळा दिशेमध्ये बदल करत हे यान ३०० दिवसात सात कोटी ८० लाख किलोमीटर एवढा प्रवास करत २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्विरित्या भ्रमण करु लागले. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाभोवती पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला. इस्रोने मंगळयान मोहिमेचा कालावधी हा फक्त सहा महिने एवढा निश्चित केला होता. मंगळ ग्रहाभोवती फिरायला सुरुवात केली तेव्हा यानामध्ये ४० किलो इंधन बाकी होते. त्यामुळे ही मोहिम सहा महिने नाही तर तब्बल आठ वर्षे चालली.
मंगळ ग्रहाबद्दलची कोणती माहिती मिळाली?
मंगळ ग्रहाभोवती मंगळयानाने ४२१ किलोमीटर बाय ७६ हजार ९९३ किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमंतीला सुरुवात केली. ग्रहाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला साधारण ७२ तास ५१ मिनीटांचा अवधी लागायचा. गेल्या आठ वर्षात मंगळयानावर असलेल्या पाच प्रमुख वैज्ञानिक उपकरणांनी मंगळ ग्रहाची माहिती गोळा केली असून त्याचे विश्लेषण अजुनही वेगवेगळ्या पातळीवर केले जात आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंगळ ग्रहाचा संपूर्ण नकाशा तयार करण्यात यश आले, यामध्ये या ग्रहाचा ध्रुव, भव्य असे डोंगर, दऱ्या याची सुस्पष्ट छायाचित्रे मिळाली आहेत. तसंच मंगळ ग्रहाच्या वातावरणात असलेल्या विविध वायूंची माहिती संग्रहीत करण्यात आली. निष्क्रीय वायू Argon-40 चे अंश या ग्रहाच्या वातावरणात आढळले आहेत, या ग्रहावरील वातावरणात का बदल झाले याची माहिती मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. मंगळाचा अवघ्या सहा किलोमीटर व्यासाचा चंद्र – Deimos ची छायाचित्रे काढणे मंगळयानामुळे शक्य झाले आहे. या ग्रहावर सातत्याने धुळीची वादळे येत असतात, यामुळे ग्रहाचे वातावरण हे धुळीने भरून जाते, तेव्हा अशा वादळांबद्दलही माहिती मिळवण्यात आली आहे. अशा या सर्व माहितीचा भविष्यातील मंगळ मोहिमांकरता उपयोग होणार आहे.
मंगळयान मोहिमेने इस्रोला काय मिळाले?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे इस्रोकडे – भारताच्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील वाटचालीकडे जगात गांभीर्याने बघितले जाऊ लागले. भारतावरील विश्वास यामुळे वाढला असून विविध उपग्रह प्रक्षेपणासाठी तसंच उपग्रहाद्वारे संयुक्त अभ्यास मोहीमा राबवण्यासाठी आता करार होऊ लागले आहेत. भारत सरकारनेही अशा मोहिमेच्या यशामुळे इस्रोला आणखी गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आहे, इस्रोचे बजेट वाढण्यास मदत झाली आहे. विविध मोहीमा आखण्यास आता वेगाने परवानगी मिळू लागली आहे.
या मोहीमेच्या यशामुळे पृथ्वीबाहेर उपग्रह मोहिमा आखण्याचा आत्मविश्वास इस्रोला मिळाला. तसंच या विविध पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या ज्याचा वापर चांद्रयान २ तसंच परग्रहावरील मोहिमांकरता केला जात आहे, जाणार आहे. आता शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठीची मोहीम प्रत्यक्षात येणार असून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ मोहीम आखली जात आहे. मंगळयान २ मोहिमेच्या तयारीला लवकरच सुरुवात होणार आहे. चंद्रावर रोव्हर उतरवण्यात चांद्रयान २ मोहीमेत अपयश आले असतांना आता चांद्रयान ३ मोहीमेच्या माध्यमातून चंद्रावर रोव्हर उतरवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाणार आहे. इस्रोवर वाढलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे.
मंगळयान मोहीमेमुळे जनमानसात इस्रोबद्दल तसंच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राबद्दलचा ओढा वाढण्यास एकप्रकारे मदत झाली आहे. यामुळे फारसे माहीत नसलेल्या या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राकडे अधिकाधीक युवा वर्ग आकर्षीत होत आहे. याचा फायदा देशालाच होणार आहे.