-दत्ता जाधव

इंडोनेशियाने रिफाईंड पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर सर्वांत मोठा आयातदार देश असलेल्या भारतात नेमकी काय स्थिती निर्माण होणार यावरून मोठी चर्चा घडून आली. ही निर्यात बंदी जशी भारताच्या हिताची नाही, तशीच ती इंडोनेशियाच्याही हिताची नाही. जगाला पाम तेलाचा पुरवठा करणाऱ्या इंडोनेशियातील पाम तेलाची शेती नेमकी कशी आहे. यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

इंडोनेशियात पाम तेलाचे उत्पादन किती? –

इंडोनेशिया पाम तेलाचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. जगभरात उत्पादित होणाऱ्या पाम तेलापैकी सुमारे पन्नास टक्के पाम तेल इंडोनेशिया उत्पादित करते. इंडोनेशियाने २०२१मध्ये ४ कोटी ६२ लाख टन पाम तेल उत्पादित केले होते. त्यापैकी २ कोटी ६० लाख टन तेल निर्यात केले. त्यात कच्च्या आणि रिफाईंड पाम तेलाचा समावेश आहे. इंडोनेशियात २०२०मध्ये सुमारे १ कोटी ४६ लाख हेक्टरवर पामच्या झाडांची लागवड झालेली आहे. इंडोनेशिया आणि मलेशियात जवळपास जगभरातील निम्मी पामची झाडे आहेत. ग्लोबल फॉरेस्ट वॉचनुसार, इंडोनेशियात २००१ ते २०१८ दरम्यान सुमारे अडीच लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावरील वृक्ष तोडण्यात आले. हे क्षेत्र न्यूझीलंड देशाएवढे आहे. त्यामुळे इंडोनेशिया आणि मलेशियातील जंगले संपुष्टात आली आहेत. त्याचा परिणाम पर्यावरण आणि अन्न साखळीवर होत आहे. अनेक पशु-पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत आहे. इंडोनेशियानंतर मलेशिया दुसऱ्या क्रमांकाचा पाम तेल उत्पादक देश आहे. त्यानंतर थायलंड, सिंगापूर, पापुआ न्यू गिनी या देशांचा क्रमांक लागतो.

इंडोनेशियाने का केली निर्यात बंदी? –

इंडोनेशियाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणाऱ्या आणि संपूर्ण अर्थव्यवस्था ज्या पाम तेलावर अवलंबून आहे, त्याच पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची वेळ का आली, असा प्रश्न पडतो. इंडोनेशियात महागाई वाढली आहे. तेथील नागरिक खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतींचा सामना करीत आहेत, त्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला आहे. खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी इंडोनेशियाची सरकारी ऊर्जा कंपनी पेर्टामिना हिने पाम तेलापासून बायो इंधन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४पर्यंत डिझेलमध्ये ३० टक्क्यांपर्यंत बायो इंधन मिसळण्याचे नियोजन केले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून रिफाईंड पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. परंतु, त्यामुळे संपूर्ण अर्थचक्रच अडचणीत येण्याची शक्यता असल्यामुळे आता कच्च्या पाम तेलाच्या निर्यातीला सूट देण्यात आली आहे.

पाम तेलाचा वापर कशात होतो? –

पाम तेलाचा वापर स्वयंपाकाच्या तेलापासून ते प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आणि जैवइंधन या उत्पादनांमध्ये केला जातो. पाम तेल हे जगातील सर्वांत जास्त वापरले जाणारे वनस्पती तेल आहे. पाम तेलाचा वापर बिस्किटे, मार्गारीन, लॉन्ड्री डिटर्जंट आणि चॉकलेटसह अनेक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये केला जातो. शॅम्पू, अंघोळीचे साबण, टूथपेस्ट, व्हिटॅमिनची गोळी किंवा मेकअपच्या साहित्यांत वापर केला जातो. इतर तेलांच्या तुलनेत पाम तेल स्वस्त आहे. ते पिवळे आणि गंधहीन असल्यामुळे अन्य खाद्य तेलांत भेसळीसाठी त्याचा वापर केला जातो.

भारतात का रंगली महाचर्चा? –

भारत दरवर्षी सुमारे १ कोटी ३५ लाख टन खाद्यतेल आयात करतो, त्यापैकी सुमारे ८५ लाख टन टन (सुमारे ६३ टक्के) पाम तेल आहे. यापैकी जवळपास ४५ टक्के इंडोनेशिया आणि उर्वरित मलेशियासह अन्य शेजारील देशातून येते. इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला, तर त्याचे गंभीर परिणाम भारताला सहन करावे लागतील, असे मत भारतीय सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक बी. व्ही मेहता यांनी व्यक्त केले आहे. भारतात दर वर्षी आयात होणाऱ्या एकूण पाम तेलाच्या जवळपास ४५ टक्के पाम तेल इंडोनेशियातून येते. इंडोनेशियाच्या निर्यात बंदीमुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या अगोदरच वाढलेल्या किमतींचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२१मध्ये देशाची खाद्यतेलाची गरज दोन कोटी ३९ लाख टनांवर गेली होती, ती २०२७मध्ये २ कोटी ६३ लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे.

देशात होणार पामच्या झाडांची लागवड –

केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य तेल मिशन-पाम ऑईल, जाहीर केले आहे. त्यानुसार, येत्या काळात भारत पाम तेलाची आयात कमी करण्यासाठी ईशान्येकडील राज्यांत आणि अंदमान-निकोबार बेटांवर पाम तेलाची शेती आणि त्या संबंधीच्या प्रक्रियेवर अधिक भर देईल. या योजनेसाठी सरकार ११ हजार कोटींची आर्थिक मदत करणार आहे. यातील ८,८४४ कोटी केंद्र सरकार, तर २१९६ कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलेल. २०२५ पर्यंत १० लाख हेक्टर क्षेत्रावर पाम तेलाची शेती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. येत्या १० वर्षांत भारतातील पाम तेलाचे उत्पादन २८ लाख टनांपर्यंत पोहोचेल. पाम तेलाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तोटा होणार नाही, याची हमी सरकारतर्फे देण्यात येणार आहे. देशात सध्या केवळ ३.७ लाख हेक्टर क्षेत्रावर पाम तेलाची शेती केली जाते. भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, मिझोराम, नागालँड, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पामची झाडे आहेत.

Story img Loader