सचिन रोहेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोबाइल फोनवरील प्रयोजनांच्या (ॲप) वापराचे अनेक नमुने रोजच्या रोज आपल्यापुढे नव्या रूपात येत असतात. या उत्क्रांत प्रक्रियेला अधिक एकप्रवाही बनविणारे अतिगुणक प्रयोजन अर्थात सुपरॲपचे अनावरण टाटांसारख्या महाकाय समूहाने नुकतेच केले. येत्या काळात अन्य बड्या कंपन्यांकडून याचे अनुकरण केले जाईल आणि ती एका नवप्रवाहाची सुरुवात असेल, असे मानले जाते. हा प्रकार नेमका काय आहे, त्यामागची कंपन्यांची गणिते व अर्थकारण काय, भारतात येत्या काही काळात याच अनुषंगाने कंपन्या-कंपन्यांत चढाओढ सुरू होईल का या व अशा अनेक प्रश्नांचा वेध. एकुणच जगभरातील सुपरॲपचा अनुभव आणि भारतातील प्रयोगाचे अपेक्षित परिणाम या संबंधाने हा एक धावता आढावा…

अतिगुणक प्रयोजन अर्थात ‘सुपरॲप’ नेमके असते काय?

आजच्या डिजिटल युगात, संपूर्ण जग जणू आपल्या हातात सामावले आहे. अर्थात स्मार्टफोनवरील कळ दाबल्यासरशी जगातील कोणत्याही कोपऱ्यातील सर्व सुख-सुविधा विनासायास आपल्यापुढे सादर होताना दिसतात. फोनवर उपलब्ध वेगवेगळ्या प्रयोजनांच्या (ॲप) माध्यमातून, संभाषण व संदेशांचे आदानप्रदान यासह मनोरंजन, शिक्षण, खरेदी-विक्री व्यापार, प्रवास-पर्यटन, जिभेचे चोचले ते खेळ, करमणूक, व्यायाम, लेखन-वाचन आणि आर्थिक व्यवहारांपर्यंत सारे काही शक्य झाले आहे. या प्रत्येक गरजेसाठी वेगवेगळ्या प्रयोजनांना फोनवरील उपलब्ध स्मृतिकोशात सामावून (डाऊनलोड) घेण्याऐवजी, मनोरंजन ते व्यापार-विनिमय आणि आर्थिक व्यवहार हे सारे काही एकाच सर्वसमावेशी वाहिनीद्वारे उपलब्ध करून देण्याची किमया म्हणजे अतिगुणक प्रयोजन अर्थात सुपरॲप होय. गल्लीच्या तोंडावरील वाण-सामानाचे दुकान ते सर्व प्रकारच्या गरजा भागविणारे आणि सर्व नाममुद्रांच्या चीज-वस्तू सामावलेले आधुनिक धाटणीचे मॉल असे हे संक्रमण म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मॉलमध्ये गेल्यावर कितीही संयम राखला तरी गरजेपेक्षा जास्त खरेदी अपरिहार्यपणे होतेच, अगदी त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारच्या सेवेसाठी सुरू असलेल्या ग्राहकांच्या वर्दळीला वेगळ्या प्रकारच्या अतिरिक्त खरेदीकडे (क्रॉस – सेलिंग) वळविण्याची क्लृप्ती म्हणूनही या अतिगुणकांकडे पाहता येईल.

हे अतिगुणक प्रयोजन कंपन्यांना गरजेचे का वाटते?

बहुविध सेवा-उत्पादनांचे भांडार ग्राहकांसाठी खुले करणारे अनेक नावाजलेले उद्योग समूह भारतात आहेत. अशा बड्या समूहांना त्यांच्या या बहुविध सेवा व निर्मित वस्तू एकत्रित रूपात ग्राहकांपुढे प्रस्तुत करून त्यांच्या व्यावसायिक भव्यतेचे दर्शन घडविण्यासह, ग्राहकांच्या व्यापक वर्गाला आकर्षित करण्याचा हा एक उमदा मार्ग ठरतो. जसे मिठापासून आधुनिक सॉफ्टवेअर प्रणालीपर्यंत विस्तृत व्यवसाय फैलावलेल्या टाटा समूहाने नुकतेच (१४ एप्रिलला) ‘टाटा न्यू’ नावाचे अतिगुणक सर्वसमावेशी व्यासपीठ (सुपरॲप) दाखल केले. ऑक्टोबर २०२१ पासून ते टाटा समूहातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांपुरते प्रयोगरूपात सुरू होते. म्हणजेच विमान प्रवासाचे तिकीट, विमा, हॉटेलचे आरक्षण, किराणा सामान, वस्त्रप्रावरणे, औषधांच्या खरेदीच्या सोयीसह या अतिगुणकावर हे सर्व करण्यासाठी गरज पडल्यास झटपट कर्ज अथवा उसनवारीची सोय ग्राहकांसाठी करण्यात आली आहे. अर्थात टाटा समूहातील एअर इंडिया, विस्तारा, टायटन, तनिष्क, बिगबास्केट, १ एमजी, टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल अशा बहुतांश नाममुद्रा आणि त्यांच्या सेवा एकत्रित रूपात ग्राहकांपुढे आल्या आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी तर, येत्या काळात टाटा समूहाबाहेरच्या सेवा-उत्पादनांच्या (तृतीय-पक्षी) नाममुद्रांनाही या सुपरॲपमध्ये सामावून घेतले जाईल, असे भविष्यवेधी भाष्य ‘टाटा न्यू’च्या अनावरणप्रसंगी केले.

भारतात अशा अतिगुणकांची अन्य उदाहरणे कोणती आहेत?

देशातील अग्रेसर बँक असलेल्या स्टेट बँकेने प्रस्तुत केलेले ‘एसबीआय योनो’ व्यासपीठ हे अतिगुणक असल्याचा तिचा दावा आहे. मर्यादित अर्थाने तो खराही आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने असा प्रयोग जिओअंतर्गत सुरू केला असून, तो अद्याप उत्क्रांत होण्याच्याच अवस्थेत आहे. मात्र टाटा न्यूसारख्या अतिगुणकाची तुलना करायची झाल्यास, ती ई-व्यापार क्षेत्रातील फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनकडून राबविल्या जाणाऱ्या अतिगुणक प्रयोजनांशीच करावी लागेल. फ्लिपकार्ट समूहातील फोन पे हे केवळ डिजिटल देयक व्यवहारांचे व्यासपीठ नव्हे, तर ओला, स्विगी, ग्रोफर्स, एजिओ, डेकॅथलॉन, दिल्ली मेट्रो सेवा, बुकिंग डॉट कॉम वगैरे विविधांगी सेवांचे विस्तारित दालन खुली करणारी ती सर्वसमावेशी वाहिनीच आहे.

जगभरात अन्यत्र अशा अतिगुणकांची स्थिती कशी आहे?

आघाडीचे टॅक्सी आणि सह-प्रवास सेवांचे व्यासपीठ ‘उबर’ हे अमेरिकेतील सर्वात मोठे अतिगुणक म्हणता येईल. उबरद्वारे तेथे वाण-सामान, तयार खाद्यान्ने घरपोच मिळविता येतात, तर उबर वॉलेट व उबरमनीद्वारे ऑनलाइन आर्थिक उलाढालीही पार पाडता येतात. उबरने भारतातही ‘उबर इट्स’द्वारे खाद्यपदार्थांच्या बटवड्याला सुरुवात केली आणि ही सेवा अव्यवहार्यही ठरल्याने लवकरच गुंडाळलीही. चीनमध्ये अशा अतिगुणक डिजिटल मालमत्ता खूप आहेत आणि चांगल्या फळल्या-फुललेल्याही दिसत आहेत. कोणत्याही मॉलला व्यावसायिक यशासाठी तेथील शेकड्याने असणाऱ्या दालनांमध्ये एखाद-दुसरे एकगठ्ठा मोठ्या गर्दीला आकर्षित करणारे आणि सर्वाधिक पदरवाचे ठिकाण (मल्टिप्लेक्स, फूडमॉल, फूड-बझारच्या रूपात) लागते, त्याचप्रमाणे अतिगुणकांची त्यांची काही चुंबकीय बलस्थाने असणे अतीव गरजेचे आहे, असे या प्रस्थापित उदाहरणांमधून दिसून येते.

अतिगुणकांचे बाजारपेठेवरील परिणाम आणि चिंतेच्या बाबी कोणत्या?

हाती लागलेला ग्राहक गमावता कामा नये याला कोणत्याही व्यापाराच्या लेखी प्रधान महत्त्व असते. आधुनिक ई-पेठेतील ग्राहकाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नातून अतिगुणकाची संकल्पना बड्या उद्योग समूहांना आवश्यक वाटत आहे. त्यासाठी मग कॅशबॅक, सवलती, लॉयल्टी बोनस वगैरेसारख्या युक्त्या-क्लृप्त्या योजल्या जाणे ओघाने आलेच. हे सारे डावपेच मक्तेदारीलाच खतपाणी घालणारे हा ई-व्यापाराच्या विरोधातील सनातन – वाद आणि आक्षेप पु्न्हा डोके वर काढणार असे चित्र आहे. शिवाय डिजिटल युगात ‘माहिती/ विदा’ ही अतीव कळीची गोष्ट आणि तितकीच आगलावी गोष्टदेखील ठरते. जोवर विमा उतरवू पाहणारे आणि विमा कंपनी अथवा रुग्ण आणि वैद्यकीय सेवा पुरवठादार अशा जोड्यांमध्ये माहितीची देवघेव सुरू असते तोवर ठीक. मात्र अतिगुणकाने अनेक तृतीय-पक्ष सेवा प्रदात्यांना एका व्यासपीठावर आणले आहे अशा प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या माहितीच्या गोपनीयतेबाबत चिंतेला निश्चितच जागा निर्माण होते. ग्राहकांबाबतीत संकलित केलेल्या विदेला नंतर मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देऊन, ग्राहकांच्या वर्तनाचा अधिक अचूकपणे अंदाज लावण्यासाठी वापर केला जाणार नाही, याची कोणीही हमी देऊ शकत नाही. तज्ज्ञांनीच हे आक्षेप पुढे आणले असून, अमेरिका- ब्रिटनसारख्या देशांमध्ये अतिगुणकांच्या वेगाला मर्यादा पडण्यामागे अनेक कारणांपैकी, हे एक मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.

sachin.rohekar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained whats are super apps print exp sgy