सुशांत मोरे
नेरुळ-उरणदरम्यान रस्त्याने कराव्या लागणाऱ्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय अद्याप प्रत्यक्षात उपलब्ध झालेला नाही. मध्य रेल्वेने नव्या उपनगरीय मार्गिकेचा प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या या नव्या रेल्वे मार्गिकेतील नेरुळ-बेलापूर-खारकोपर हा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत आहे. परंतु साडेतीन वर्षे होऊनही खारकोपर-उरण हा दुसरा टप्पा मात्र सेवेत आलेला नाही. त्यामुळे उरण आणि नेरुळदरम्यानच्या प्रवासाची शुक्लकाष्ठे संपलेली नाहीत. भूसंपादन, निधी यामुळे दुसऱ्या टप्प्याच्या कामाचीही अंतिम मुदत हुकली. सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करून संपूर्ण नेरुळ-उरण प्रकल्प मार्गी लागणार होता. मात्र आता या प्रकल्पाला आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत.
नेरुळ-उरण चौथी उपनगरीय मार्गिका कशासाठी?
मध्य रेल्वेवर सीएसएमटी-कसारा, खोपोली हा मुख्य मार्ग, याशिवाय सीएसएमटी-पनवेल हार्बर आणि ठाणे-वाशी व पनवेल ट्रान्स हार्बर असे तीन मार्ग आहेत. यानंतर नेरुळ-उरण असा चौथा उपनगरीय रेल्वे मार्ग करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. नवी मुंबईतील नेरुळ-उरण रेल्वे मार्ग १९९७पासून रखडला आहे. उरणमध्ये गेल्या काही वर्षांत औद्योगिक वसाहती वाढल्या. त्यामुळे रहदारी वाढली. उरणला जाण्यासाठी नेरुळ, बेलापूर, जुईनगर रेल्वे स्थानकाबाहेरून पालिकेच्या थेट बस आहेत, तर उलवेपर्यंत रिक्षा आणि तेथून पुन्हा बस असा प्रवास करावा लागतो. मात्र नेरुळ, बेलापूर, जुईनगर येथून बसची वारंवारिता म्हणजेच प्रवाशांना बस उपलब्ध होण्याचा कालावधी बराच आहे. त्यामुळे प्रवाशांना उरणला जाण्यासाठी ताटकळत राहावे लागते किंवा रिक्षाचा पर्याय निवडावा लागतो. या तीन स्थानकांबाहेरून रिक्षाने प्रथम उलवेला जावे लागते. तीन प्रवासी गेल्यास प्रत्येक प्रवाशामागे ५० ते ६० रुपये मोजावे लागतात आणि एका प्रवाशाने रिक्षा केल्यास १५० ते २०० रुपये उलवेपर्यंत द्यावे लागतात.त्यानंतर पुन्हा उरणला जाण्यासाठी बस पकडावी लागते. प्रवासाचा कालावधी, त्यासाठी मोजावे लागणारे पैसे, अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचाही धोका यामुळे हा प्रवास अनेकांना नकोसा होतो. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आणि उरणवासियांकडून चौथ्या उपनगरीय मार्गिकेची मागणी होऊ लागली आणि १९९७ साली या मार्गिकेची घोषणा केल्यावर अनेक अडचणींनंतर ११ नोव्हेंबर २०१८ ला नेरुळ -उरणमधील केवळ नेरुळ-बेलापूर-खारकोपर हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत आला.
रेल्वेच्या फेऱ्याही अपुऱ्या?
नेरुळ-बेलापूर-खारकोपर मार्गावर सध्या २० डाउन आणि २० अप अशा दररोज ४० फेऱ्या चालवल्या जातात. या मार्गावरील दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात नसली तरीही असलेल्या काही फेऱ्यांमुळे थोडी का असेना पण गैरसोय कमी होते. मात्र या फेऱ्या सुरू होऊनही प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते. नेरुळ येथून खारकोपरसाठी सकाळी ७.१० वाजता लोकल असून त्यानंतर ४५ मिनिटांनी, एक तासांनी, दोन तासांनी फेऱ्या आहेत. बेलापूर येथून खारकोपर स्थानकातूनही बेलापूरसाठी सकाळी ६ वाजता लोकल सुटते. त्यानंतर तब्बल दोन तास वीस मिनिटांनी बेलापूर खारकोपर एक फेरी आहे. ही फेरी होताच सव्वा तास, दोन तास, दीड तासांच्या अंतराने फेऱ्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, नेरुळ-खारकोपर २० मिनिटांचा आणि बेलापूर-खारकोपर १८ मिनिटांचा लोकल प्रवास आहे. त्यामुळे या प्रवासासाठी एक लोकल गेल्यावर प्रवाशांना वाट पाहावी लागते. परिणामी त्या वेळेत पालिका परिवहन बस, रिक्षा किंवा उरणला जाणाऱ्या अन्य खासगी बसचा पर्याय निवडावा लागतो. त्यामुळे लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे
दुसरा टप्पा कधी होणार?
नेरुळ-बेलापूर-खारकोपर ते उरण उपनगरीय रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. यातील नेरुळ ते बेलापूर, खारकोपर हा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रवाशांंच्या सेवेत आला आहे. भूसंपादनासह अनेक अडथळ्यांमुळे नेरुळ ते उरण संपूर्ण प्रकल्प रखडला होता. यातील पहिला टप्पा वेळेत पूर्ण झाला. परंतु दुसरा टप्पा पूर्ण होताना बऱ्याच अडचणी उद्भवल्या. परिणामी प्रकल्पासाठीचा एकूण ५०० कोटींचा खर्च सुमारे १७०० कोटींपर्यंत पोहोचला. खारकोपरपुढील उरणपर्यंतच्या रेल्वेमार्गासाठी जमीन संपादनाची समस्या कायम होती. यात सिडकोकडून तीन किलोमीटरची जागा रेल्वेला मिळणे बाकी होते. त्याचे भूसंपादन झाले आणि ती जागा रेल्वेला मिळाली. त्यामुळे मोठा अडसर दूर झाला होता. त्यामुळे खारकोपर ते उरण दुसरा टप्पा सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उदिद्ष्ट मध्य रेल्वेने ठेवले होते. मात्र हा मुहूर्तही पुढे ढकलण्यात आला आहे. खारकोपर ते उरण दुसऱ्या टप्प्यात सिडकोकडून भूसंपादन पूर्ण झाले असून या टप्प्याचे कामही ७५ टक्के झाले आहे. या प्रकल्पासाठी सिडकोकडून ६७ टक्के आणि ३३ टक्के रेल्वेकडून निधी मिळतो. सिडकोकडून काही प्रमाणात निधी मिळणे बाकी आहे. तो मिळताच या वर्षाअखेरपर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करून त्यानंतर नेरुळ ते उरण संपूर्ण मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
नव्या वेळापत्रकात चौथ्या मार्गिकेला स्थान?
नेरुळ-बेलापूर-खारकोपर मार्गिकेवर दिवसाला एकूण ४० लोकल फेऱ्या होतात. या मार्गावरील फेऱ्यांची संख्या आणि दोन लोकलमधील वेळ पाहता फेऱ्या वाढविण्याचा विचार मध्य रेल्वेकडून होत आहे. येत्या ऑक्टोबरच्या नव्या लोकल वेळापत्रकात या मार्गिकेलाही स्थान देण्याचा विचार आहे. चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यातून तीन नव्या गाड्या येणार असून त्या या मार्गिकेवर चालवून फेऱ्या वाढविण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय दुसरा टप्पाही वेळेत उपलब्ध झाल्यास आणखी लोकल आणि फेऱ्या वाढतील.