गौरव मुठे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) येथे इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजची (आयआयबीएक्स) सुरुवात करण्यात आली. तसेच राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आणि सिंगापूर एक्सचेंज लि. यांना जोडणाऱ्या सामूहिक मंचाचीदेखील सुरुवात केली. यामुळे सध्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील आर्थिक घडामोडींचे केंद्र गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये हस्तांतरित केले जाते आहे, अशी चर्चा सुरू आहे.
‘आयएफएससी’ म्हणजे काय?
विविध आर्थिक सेवा आणि त्यांच्या नियामक मंडळांची मिळून होणारी संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात इंटरनॅशनल फायनॅन्शियल सर्व्हिसेस सेंटर (आयएफएससी) होय. आयएफएससीअंतर्गत येणाऱ्या विविध सेवांवरच्या नियंत्रकाचे काम सध्या रिझर्व्ह बँक, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीए) करतात.
पण ‘आयएफएससी’ आर्थिक राजधानी मुंबईतून गिफ्ट सिटीमध्ये का?
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात आयएफएससी मुंबईतील बीकेसीमध्ये उभारण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठीची सर्व आखणीदेखील करण्यात आली होती. बीकेसीमधील या जागेत तळाला बुलेट ट्रेन स्थानक आणि त्यावर आयएफएससीच्या दोन इमारती असतील, असे सुरुवातीला नियोजन करण्यात आले होते. २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आयएफएससीची घोषणा केली होती. मुंबईच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानाचा फायदा या केंद्राला होईल असा यामागचा हेतू होता. यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. आयएफएससी होईल म्हणून मुंबईत एक ‘आर्बिट्रेशन सेंटर’ही सुरू करण्यात आले होते. पण आयएफएससी मुंबईऐवजी गुजरातच्या गांधीनगरमधल्या गिफ्ट सिटीत हलवण्यात आले. परिणामी इथे निर्माण होऊ शकणारे रोजगार आणि महसूलही आता महाराष्ट्राबाहेर जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाची आर्थिक कार्यालये जाणीवपूर्वक मुंबईतून बाहेर नेण्यात असल्याचा विद्यमान केंद्र सरकारवर आरोप आहे. गांधीनगर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनावे यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. गिफ्ट सिटी हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
‘गिफ्ट सिटी’ काय आहे?
‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी’ अर्थात गिफ्ट-सिटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखले जाणारे देश वा परदेशात जाणाऱ्या उद्योगांना आकर्षित करून भारतात आणण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. २००७च्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी या गिफ्ट सिटीचे रूपांतर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात करण्याचा मानस जाहीर केला होता. गुजरातमधील साबरमती नदीच्या काठावर गांधीनगर येथे गिफ्ट-सिटी हा गुजरात सरकार आणि विविध कंपन्यांच्या यांच्या संयुक्त विद्यमानातून वसवलेला व्यापारी जिल्हा आहे. साबरमती नदी काठी सुमारे ८८६ एकर परिसरात हे अद्ययावत शहर विकसित केले असून हे एक आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र देखील बनले आहे. यातील ८० टक्के क्षेत्रावर राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. तर २० टक्के क्षेत्रावर निवासी क्षेत्र, शाळा, दवाखाने, हॉटेल, करमणूक केंद्रे उभारण्यात आले आहे. आर्थिक, वित्त आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना अनुकूल अशा पायाभूत सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापारी केंद्र आणि विशेष निर्यात उद्योग केंद्र येथे स्थापन करण्यात आले असून देशांतर्गत उद्योगांना पहिली दहा वर्षे प्राप्तिकरात सवलत देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय सोने-चांदी बाजार मंच (आयआयबीएक्स) म्हणजे काय?
इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (आयआयबीएक्स) म्हणजेच आंतरराष्ट्रीय सोने-चांदी बाजार मंचाची सुरुवात गिफ्ट सिटीमध्ये करण्यात आली. भारतीयांचे सोन्यावरील प्रेम जगजाहीर आहे. भारत सोन्याचा सर्वांत मोठा आयातदार देश आहे. म्हणूनच भारताला जागतिक सराफा बाजारात आपले स्थान मिळवून देण्यासाठी आणि जागतिक मूल्य शृंखलेत भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सोने-चांदी बाजार मंच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जागतिक पातळीवर सोने आणि चांदीचा मुख्य ग्राहक म्हणून भारताला जागतिक सोने बाजारातील किमतींवर प्रभाव टाकण्यास सक्षम बनवणार आहे.
‘आयआयबीएक्स’चे कामकाज कसे चालेल?
बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून खरेदीदार आणि विक्रेत्यांना सोने आणि चांदी तसेच संबंधित डेरिव्हेटिव्हमध्ये व्यवहार करता येतील. जगभरात अनेक सराफा बाजार आहेत. उदा. लंडन बुलियन मार्केट, जे दिवसाचे २४ तास व्यवहारासाठी खुले असते. शिवाय फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंगची सुविधा देते. हे सोने आणि चांदीचे प्राथमिक आणि मुख्य जागतिक बाजार व्यापार व्यासपीठ म्हणून सध्या ओळखले जाते. आता गिफ्ट सिटीमध्ये आयआयबीएक्सची सुरू करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स), इंडिया आयइनएक्स इंटरनॅशनल एक्सचेंज, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) यांनी भारत इंटरनॅशनल बुलियन होल्डिंग आयएफएससी ही होल्डिंग कंपनी स्थापन करण्यासाठी हातमिळवणी केली आहे, जी आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज चालवेल. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या आयआयबीएक्सने सराफांनी एक्सचेंजवर व्यवहार करण्यासाठी नोंदणी केली आहे. शिवाय भौतिक स्वरूपातील सोने आणि चांदी साठवण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. तेथे सेबीप्रमाणे स्वतंत्र नियामक मंडळ असून ते आयएफएससी नावाने ओळखले जाते. आयएफएससी या नियामक मंडळाने पात्र ५६ सराफांना सोने आयात करण्यासाठी आणि एक्सचेंजवर व्यवहार करण्यासाठी मान्यता दिली आहे.
प्रत्यक्षात कार्य कसे चालेल आणि त्याचे फायदे काय?
सोने आयात केल्यावर ते आयएफएससी या नियामक मंडळाने मंजूर केलेल्या तिजोरीत साठवले जाईल. त्यानंतर, सराफासाठी ठेवीची पावती तयार केली जाईल आणि सोने सुपूर्द केले जाईल. गेल्या काही महिन्यांत मर्यादित व्यवहार संख्येसह एक्सचेंजमध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्यवहार करण्यात आले. आयबीएक्स हे भारतातील सोने-चांदीच्या आयातीचे प्रवेशद्वार असेल, जेथे देशांतर्गत वापरासाठी सर्व सोने आणि चांदीची आयात एक्सचेंजद्वारे पार पडतील. विविध सहभागींना व्यवहारासाठी आधुनिक मंच उपलब्ध करून देण्याबरोबरच व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गुणवत्तेची हमी हे फायदे मिळतील. मानकीकरण आणि पारदर्शक यंत्रणा प्रदान करण्याव्यतिरिक्त, हे सोने-चांदीच्या उत्पादनांच्या आर्थिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने आयबीएक्स महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे. सुरुवातीला सोने-चांदीच्या किमतीवर प्रभाव टाकणारा आणि अखेर किंमत ठरवणारी बाजारपेठ म्हणून वाटचाल करण्याची अपेक्षा आहे.
‘एसजीएक्स निफ्टी’चे व्यवहार सिंगापूरऐवजी ‘गिफ्ट-सिटी’मधून होणार?
मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजार यांनी स्थापन केलेले इंडिया आयईनई आणि एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज हे आंतराष्ट्रीय भांडवली बाजार येथे कार्यरत असून जगभरातून कोठूनही अनिवासी भारतीय व परकीय गुंतवणूकदार येथे व्यवहार करू शकतात. यामुळे आता ‘एसजीएक्स निफ्टी’चे व्यवहार सिंगापूरऐवजी, भारतातून ‘गिफ्ट-सिटी’मधून सुरू झाले आहेत. हे व्यवहार जलद गतीने म्हणजेच अगदी एका मिनिटात दोन लाखांहून अधिक व्यवहार पार पडू शकतात. येथील दलालांना सह-स्थानकाची सुविधा देण्यात आली असून त्यायोगे झटपट निष्कर्ष काढून स्वयंचलितपणे व्यवहार पूर्णत्वास जातील. येथे भारताबाहेरील कंपन्याचे समभाग, डिपॉझिटरी रिसीट, कर्जरोखे, परकीय चलन, व्याजदर, भारतीय निर्देशांक, वस्तुबाजारातील वस्तू, एक्सचेंज ट्रेडेड फंड यांच्यावर आधारित डेरिव्हेटिव्हच्या खरेदी विक्रीचे व्यवहारदेखील करता येतील. या व्यवहारांना काही करांतून वगळण्यात आले आहे.
gaurav.muthe@expressindia.com