अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या आठवड्यात भारतीय वंशाच्या भौतिकशास्त्रज्ञ आरती प्रभाकर यांची विज्ञान सल्लागार म्हणून नियुक्ती करणार आहेत. व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (ओएसटीपी) च्या संचालकपदी आरती प्रभाकर यांचे नाव अपेक्षित आहे. आरती प्रभाकर या एरिक लँडर यांची जागा घेतील. लँडर यांनी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रपतींच्या विज्ञान सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता.
आरती प्रभाकर यांना ओएसटीपी संचालक होण्यासाठी सिनेटची मंजुरी आवश्यक असणार आहे. या प्रक्रियेला काही महिने लागू शकतात. मात्र, त्या ताबडतोब राष्ट्रपतींच्या विज्ञान सल्लागाराची जबाबदारी घेऊ शकतात. डॉ. आरती प्रभाकर या अध्यक्ष बायडेन यांच्या कॅन्सर मूनशॉट या उपक्रमाचे नेतृत्व करतील.
विज्ञान सल्लागार म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये विज्ञान धोरणाच्या समस्यांचे निराकरण करणे समाविष्ट असणार आहे. चीनशी स्पर्धा करण्यासाठी अमेरिकेला सर्वोत्तम कसे बनवायचे यासारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश असणार आहे.
आरती प्रभाकर कोण आहेत?
आरती प्रभाकर या सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आहेत. १९९३ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी राष्ट्रीय मानक आणि तंत्रज्ञान संस्था (एनआयएसटी) चे प्रमुख म्हणून त्यांची निवड केली होती. एनआयएसटी प्रमुखपदी नामांकन मिळाल्यानंतर दोन दशकांनंतर, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रभाकर यांची डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (डीएआरपीए) प्रमुख म्हणून निवड केली. जर सिनेटने प्रभाकर यांची ओएसटीपीच्या संचालकपदी नियुक्ती मंजूर दिली, तर त्या ओएसटीपीच्या प्रमुखपदी असलेल्या पहिल्या महिला ठरतील.
नवी दिल्लीत जन्म, टेक्सासमध्ये शिक्षण
आरती प्रभाकर यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५९ रोजी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे झाला. त्यांचे बालपण आणि प्रारंभिक शिक्षण टेक्सासमध्ये झाले. १९८४ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएचडी मिळवल्यानंतर, त्यांनी फेडरल सरकारसाठी काम करण्यास सुरुवात केली.
Actuate च्या संस्थापक
डॉ. आरती प्रभाकर यांनी ३० जुलै २०१२ ते २० जानेवारी २०१७ पर्यंत युनायटेड स्टेट्स डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी च्या प्रमुख म्हणून काम केले. प्रभाकर या अॅक्ट्युएट या ना-नफा संस्थेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी १९९३ ते १९९७ या काळात राष्ट्रीय मानक आणि तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख पद भूषवले होते. एनआयएसटीच्या प्रमुखपदी असलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
विज्ञान सल्लागाराने काय करणे अपेक्षित आहे?
विज्ञान सल्लागाराचे मुख्य काम म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा विज्ञानाचा अजेंडा पूर्ण करण्यात मदत करणे. बायडेन यांनी १५ जानेवारी २०२१ रोजी लिहिलेल्या पत्रात विज्ञानासाठी त्यांच्या अजेंडाच्या उल्लेख केला होता.
पत्रात पंचसूत्री योजनेचे वर्णन केले आहे ज्यामध्ये बायडेन यांनी लँडर यांना सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी साथीच्या आजारातून शिकण्यासारखे धडे घेण्यासोबत हवामान बदल हाताळण्यासाठी संशोधन करण्यास सांगितले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रात देश जागतिक आघाडीवर राहील याची खात्री करण्यासही सांगण्यात आले.