सिद्धार्थ खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फिलिपिन्समध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फर्डिनंड ‘बाँग बाँग’ मार्कोस ज्युनियर हे मोठ्या बहुमताने निवडून आले. एरवी फिलिपिन्स या देशाच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष जावे, इतका तो काही महत्त्वाचा वा मोठा देश नाही. पण या मार्कोस यांचे त्याच नावाचे वडील फर्डिनंड मार्कोस गतशतकाच्या उत्तरार्धातील एक कुख्यात हुकूमशहा होते. त्यांच्या जाचाला कंटाळून फिलिपिनोंनी उठाव केला आणि त्यांची सत्ता उलथून टाकली होती. त्याच हुकूमशहाच्या चिरंजीवाला ३६ वर्षांनंतर इतक्या बहुमताने तेथील जनतेने कसे निवडून आणले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण होते फर्डिनंड मार्कोस सिनियर?
फिलिपिन्समध्ये १९६५ ते १९८६ इतका प्रदीर्घ काळ फर्डिनंड मार्कोस फिलिपिन्सच्या अध्यक्षपदावर राहिले. त्यांचे हुकूमशाही रंग १९७२पासून खऱ्या अर्थाने दिसू लागले. अध्यक्षपदाची दुसरी टर्म संपण्याच्या एक वर्ष आधी मार्कोस यांनी सगळी सत्तासूत्रे स्वहस्ते घेतली. लष्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला. फिलिपिनो पार्लमेंट स्थगित झाली, विरोधकांची धरपकड झाली, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध आले. स्वतः निष्णात वकील असलेल्या मार्कोस यांनी न्यायपालिकेवरही पकड घेतली. विरोधकांची निव्वळ धरपकड करून ते थांबले नाहीत, तर त्यांचे हत्यासत्रही सुरू झाले. फिलिपिन्समधील तो काळ अभूतपूर्व होता. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे फिलिपिनो जनता हालाखीत जीवन जगत असताना, मार्कोस कुटुंबियांनी जनतेचे लाखो डॉलर लुबाडले आणि चैन केली.
त्यांच्याविरुद्ध बंडाची सुरुवात कधी झाली?
बेनिन्यो अक्विनो हे फिलिपिन्समधील मार्कोस यांचे प्रमुख विरोधक त्यांच्या दडपशाहीला कंटाळून अमेरिकेत पळून गेले होते. ते ऑगस्ट १९८३मधील एका दुपारी राजधानी मनिलामध्ये परतले. पण विमानातून उतरल्यावर लगेचच त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे फिलिपिन्समध्ये जनक्षोभ उसळला. या जनक्षोभातूनच फिलिपिनो जनता अक्विनो यांच्या पत्नी कोरी यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली. या प्रसंगामुळे फिलिपिन्समध्ये लोकशाहीसमर्थक चळवळीला बळ मिळाले. फिलिपिनो नागरिक हजारोंनी रस्त्यावर उतरले. १९८६मध्ये मार्कोस यांनी घाईघाईत निवडणूक घेतली. कोरी अक्विनो त्यांच्या विरोधात लढल्या. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समजल्यावर जनता अधिकच प्रक्षुब्ध झाली. जगभर त्यांच्या प्रक्षोभाची दखल घेतली गेली. कॅथलिक चर्चनेही जनतेला पाठिंबा दिला. फिलिपिनो लष्कराने अध्यक्षांची पाठ सोडून जनतेला पाठिंबा जाहीर केला आणि निदर्शकांवर गोळ्या चालवण्यास नकार दिला. बदलणारे वारे पाहून मार्कोस कुटुंबिय अमेरिकी हेलिकॉप्टरांमधून देश सोडून पळून गेले आणि त्यांनी अमेरिकेतील हवाई बेटांचा आश्रय घेतला.
छाती दडपून टाकणारी लूट…
अनेक पेट्या दागिने, उंची कपडे, रोकड अशी जवळपास त्यावेळच्या १० अब्ज डॉलरचा ऐवज घेऊन फर्डिनंड मार्कोस, त्यांची पत्नी इमेल्डा, इमी आणि मार्कोस ज्युनियर ही मुले आणि काही समर्थक अमेरिकेला पळून गेले. या लुटीतील आजवर केवळ ४ अब्ज डॉलरच फिलिपिन्सच्या तिजोरीत परत आले आहेत. उर्वरित रक्कम मार्कोस कुटुंबियांकडून वसूल करण्याची प्रक्रिया एका आयोगामार्फत सुरू आहे. अध्यक्षपत्नी इमेल्डा मार्कोस यांना जगभर हिंडून उंची वस्तू खरीदण्याची भारी हौस होती. त्यातही वहाणा म्हणजे त्यांचा जीव की प्राण. मार्कोस कुटुंबिय पळून गेल्यानंतर अध्यक्षीय प्रासादामध्ये इमेल्डा यांनी जमवून ठेवलेल्या ३००० वहाणजोड आढळून आल्या! मार्कोस कुटुंबियांच्या बेबंद उधळपट्टीचे ते प्रतीक ठरले.
मार्कोस पुत्र राजकारणात कधी आले?
मार्कोस थोरले यांचे राजकीय विजनवासात १९८९मध्ये निधन झाले. त्यानंतर तीन वर्षांनीच मार्कोस कुटुंबिय फिलिपिन्समध्ये परतले आणि राजकारणात परतण्याची तयारी करू लागले. यासाठी अर्थातच त्यांनी गडगंज संपत्तीचा पुरेपूर वापर मोक्याची पदे मिळवण्यासाठी करून घेतला. मार्कोस ज्युनियर हे युवा वयापासूनच महत्त्वांकाक्षी आहेत. एका प्रांताचे गव्हर्नर, काँग्रेस सदस्य, सिनेटर असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. त्यांच्या मातोश्री इमेल्डा या काँग्रेस सदस्य होत्या, तर भगिनी इमी माजी गव्हर्नर आणि सिनेटर आहेत.
परंतु मार्कोस कुटुंबियांना फिलिपिनो जनतेने स्वीकारले कसे?
नवीन पिढीची दिशाभूल करण्यात मार्कोस यशस्वी ठरले, असे तेथील विश्लेषक सांगतात. मार्कोस कुटुंबियांनी फिलिपिन्सच्या भल्यासाठीच माया जमवली आणि सत्तेवर आल्यानंतर त्या पैशाचा वापर फिलिपिन्सच्या प्रगतीसाठीच केला जाईल, असे कथानक समाजमाध्यमांवरून पेरण्यात मार्कोस ज्युनियर कमालीचे यशस्वी ठरले. मार्कोस सिनियर काही इतके जुलमी नव्हते. त्यांना निष्कारण खलनायक ठरवले गेले. उलट त्यांच्या काळात फिलिपिन्सची आर्थिक प्रगतीच झाली. त्यांच्या कुटुंबियांवर सूडबुद्धीने कारवाई झाली वगैरे मार्कोस ज्युनियर यांच्या दाव्यांना युवा आणि ग्रामीण फिलिपिनो जनतेने प्रतिसाद दिला. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना भरघोस मते मिळाली. फिलिपिन्समधील आणखी एक वजनदार राजकीय कुटुंब दुतेर्ते यांच्याशी जुळवून घेतल्याचाही मोठा फायदा मार्कोस यांना झाला. या कुटुंबातील रॉब्रेडो दुतेर्ते सध्या फिलिपिन्सचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या कन्या सारा दुतेर्ते या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मार्कोस ज्युनियर यांच्या बरोबरीने लढल्या. दुतेर्तेंचा दरारा फिलिपिनो राजकारणात मोठा आहे आणि त्याचाच फायदा मार्कोस ज्युनियर यांना झाला.