नुसरत मिर्झा नावाचे पाकिस्तानी पत्रकार सध्या भारतात चर्चेत आहेत. अलीकडेच या पत्रकाराने दावा केला होता की आपण अनेक वेळा भारताला भेट दिली होती आणि त्यादरम्यान जी काही माहिती मिळाली ती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला दिली होती. याच आधारे नुसरत मिर्झा यांनी भारतात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा दावा केला जात आहे.
मिर्झा यांचा संदर्भ देत भाजपाने माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर टीका केली आहे. हमीद अन्सारी यांनी त्यांच्या कार्यकाळात एका पाकिस्तानी पत्रकाराला आमंत्रित केले होते, ज्याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला अनेक गोपनीय माहिती पुरवली होती, असा आरोप भाजपाने केला आहे. हमीद अन्सारी यांनी हे आरोप ठामपणे फेटाळले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच उपराष्ट्रपती कोणत्याही परदेशी पाहुण्याला आमंत्रित करू शकतात, असे हमीद अन्सारी यांनी म्हटले आहे. या सगळ्यात नुसरत मिर्झा यांची स्वत: पत्रकार म्हणून पाकिस्तानात विश्वासार्हता काय आणि त्यांना किती गांभीर्याने घेतले जाते असा प्रश्न पडतो.
पाकिस्तानचे कुप्रसिद्ध पत्रकार
नुसरत मिर्झा यांचा वादांशी संबंध नवीन नाही. त्याच्यावर अनेक वेळा कथा पसरवल्याचा आरोप आहे. २००५ मध्ये पाकिस्तानात आलेला भूकंप आणि २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीबाबतही त्यांनी असेच काहीसे केले होते.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कराचीचे रहिवासी असलेले नुसरत मिर्झा ‘नवा-ए-वक्त’ आणि ‘जंग’ वृत्तपत्रांमध्ये लेख लिहायचे. यावेळी ते ‘सच टीव्ही’ नावाच्या वाहिनीवर स्वतःचा एक कार्यक्रम होस्ट करत. नुसरत हे एक अनुभवी पत्रकार आहे, पण पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये त्यांना ‘बडबड करणारे पत्रकार’ म्हणून ओळखले जाते.
वादाची सुरुवात
भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी बुधवारी, १३ जुलै रोजी ‘टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया’ रिपोर्ट्सचा हवाला देत, हमीद अन्सारी यांनी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना भेटल्याचा आणि गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप केला.
तसे, गौरव भाटिया यांनी कोणत्या ‘रिपोर्ट’च्या आधारे हा दावा केला आहे हे स्पष्टपणे सांगितले नाही. १० जुलै रोजी, पाकिस्तानी यूट्यूबर शकील चौधरीने नुसरत मिर्झा यांची मुलाखत अपलोड केली, ज्यामध्ये ते भारताबद्दल दावे करत आहे. हा व्हिडिओ गौरव भाटिया यांच्या आरोपांचा आधार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुमारे ५० मिनिटांच्या या मुलाखतीत नुसरत मिर्झा यांनी हमीद अन्सारी यांचा एकूण दोनदा उल्लेख केला आहे. मात्र, तत्कालीन उपराष्ट्रपतींशी आपले काही संभाषण झाल्याचे त्यांनी कुठेही सांगितले नाही. व्हिडीओमध्ये अन्सारीचा पहिला उल्लेख येतो जेव्हा मिर्झा यांनी सांगितले की २०१० मध्ये ‘हमीद अन्सारी उपराष्ट्रपती असताना’ दिल्लीत दहशतवादावरील परिषदेत सहभागी झाले होते.
यावर स्पष्टीकरण देताना हमीद अन्सारी म्हणाले की, ११ डिसेंबर २०१० रोजी त्यांनी ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ ज्युरिस्ट ऑन इंटरनॅशनल अँड ह्युमन राइट्स’चे उद्घाटन केले होते, मात्र या कार्यक्रमाला कोणाला आमंत्रित करायचे, हे आयोजकांचे काम होते. माजी उपराष्ट्रपती म्हणाले की, मी मिर्झा यांना फोन केला नाही किंवा भेटलो नाही.
मिर्झा यांच्या मुलाखतीत हमीद अन्सारी यांचा दुसऱ्यांदा उल्लेख करण्यात आला आहे जेव्हा ते म्हणतात की त्यांनी अन्सारींसह अनेक काँग्रेस नेत्यांना भेटलो होतो. मात्र, येथेही खास भेट आणि अन्सारी यांच्याशी बोलणे असा उल्लेख नाही.
स्वत:ला ‘भारतीय तज्ज्ञ’ म्हणवून घेतले
नुसरत मिर्झा यांनी या मुलाखतीत स्वत:ला ‘भारतीय तज्ज्ञ’ म्हणून वर्णन केले आणि सांगितले की त्यांनी भारतात अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्यांच्याकडे भारतातील सात शहरांचा व्हिसा आहे असे सांगितले. तर त्यावेळी पाकिस्तानी नागरिकांना फक्त तीन शहरांसाठी व्हिसा मिळाला होता.
मुलाखतीदरम्यान, त्यांनी दावा केला की, त्यांचे कौशल्य आणि भारताबाबतचा त्यांचा अनुभव पाकिस्तानी सरकारांनी दुर्लक्षित केला आहे. अन्यथा ते सामरिक बाबींमध्ये पाकिस्तानला मोठे यश मिळवून देऊ शकले असते.
२००६ चा भारत दौरा संपवून ते परत आले तेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांनी त्यांना सर्व माहिती आयएसआयचे महासंचालक अश्रफ परवेझ कयानी यांना देण्यास सांगितले होते, असे मिर्झा मुलाखतीमध्ये म्हणाले. मी त्यांना सांगितले की मी कयानींना भेटणार नाही, तुम्हीच त्यांना ही माहिती देऊ शकता. काही दिवसांनी मला एका ब्रिगेडियरचा फोन आला. मला अधिक माहिती देता येईल का असे त्यांनी विचारले. मी त्यांना म्हणालो की मी तुम्हाला पुरेशी माहिती दिली नाही का, असेही मिर्झा म्हणाले.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, खुर्शीद कसुरी यांनी मिर्झासारख्या व्यक्तीशी कधी बोलले असेल यावर त्यांचा विश्वास बसत नाही, असे पाकिस्तानी पत्रकारांचे मत आहे. कस्तुरी यांच्या जवळच्या पत्रकारांनी सांगितले की, त्यांनी मिर्झा यांना कधी पाहिले नाही किंवा कसुरी यांनी त्यांच्याशी बोलल्याचे ऐकलेही नाही. एका ज्येष्ठ पत्रकाराने वृत्तपत्राला सांगितले की, त्यांची संपूर्ण कथा खोटी आहे.
यापूर्वी नुसरत मिर्झा यांनी आणखी एक अफवा पसरवली होती. २००५ मध्ये पाकिस्तानात आलेला भूकंप आणि २०१० मध्ये आलेला पूर हा अमेरिकेचा डाव असल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच २०११ मध्ये जपानच्या त्सुनामीमागे अमेरिकेचा हात असल्याचा दावाही त्यांनी केला.