करिमा बलोच या सामाजिक कार्यकर्तीचामृत्यू संशयास्पदरित्या झाला. कॅनडातील टोरांटोमध्ये त्यांचा मृतदेह सापडला.पाकिस्तानील बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी लष्कर आणि तेथील स्थानिक प्रशासनाने जे काही अन्याय आणि अत्याचार केलेत त्याविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. २०१६ मध्ये बीबीसीच्या १०० सर्वाधिक प्रभावशाली स्त्रियांच्या यादीत करिमा यांचा समावेश झाला होता. रविवारपासून बेपत्ता झालेल्या करिमा यांचा मृतदेह कॅनडात आढळून आला. आपण या बातमीतून जाणून घेऊया त्या कोण होत्या आणि त्यांचं कार्य काय होतं?
कोण होत्या करिमा बलोच ?
करिमा बलोच या लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. पाकिस्तानी सैन्याकडून बलुचिस्तानमध्ये होणारे अन्याय व अत्याचार त्यांनी जगासमोर आणले. अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी या विरोधात आवाज उठवला होता. एवढंच नाही तर करिमा बलोच या विद्यार्थी संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षाही होत्या. बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जाहिद बलोच यांचं अपहरण झाल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
मोदींना मानलं होतं भाऊ
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी भाऊ मानून साद घातली होती आणि मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. २०१६ मध्ये रक्षाबंधनचं औचित्य साधून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाऊ मानलं होतं. या व्हिडीओची तेव्हा चांगलीच चर्चाही झाली होती. बलुचिस्तानमधील हजारो बहिणींचे भाऊ बेपत्ता आहेत. त्या बहिणी आपल्या भावांची वाट बघत आहेत. कित्येकजण परतणार नाहीत हे वास्तवही त्यांना ठाऊक होतं. मोदींनी हा मुद्दा मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात बलूच समुदायाच्या वतीने मांडावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.
बलुचिस्तानमधल्या महिलांच्या न्याय आणि हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. पाकिस्तानतली पोखरलेली न्यायव्यवस्था, तिथली सामाजिक व्यवस्था ही कायम स्त्रियांना कसं लक्ष्य करते हे त्यांनी त्यांच्या आंदोलनातून वारंवार दाखवून दिलं होतं. मे २०१९ रोजी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत असले तरी तेथील लोकांना फारशी किंमत देत नसल्याचे करिमा यांनी म्हटलं होतं.
शेवटचं ट्विट
करिमा बलोच यांनी १४ डिसेंबरला केलेलं एक ट्विट हे त्यांचं शेवटचं ट्विट ठरलं त्यात त्यांनी म्हटलं होतं की अपहरण, छळ आणि हत्या : ही पाकिस्तानतली सद्यस्थिती आहे. हजारो लोक गायब आहेत. या आशयाचं ट्विट करुन त्यांनी पाकिस्तानवर टीका केली होती.
मृत्यूची बातमी
करिमा बलोच यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला. कॅनडातील टोरांटो या ठिकाणी त्यांचा मृतदेह मिळाला. करीमा बलोच या रविवारपासून बेपत्ता होत्या. २०१६ मध्ये पाकिस्तानातून पलायन करुन त्यांनी कॅनडात आश्रय घेतला होता. यावर्षीच बलोच पत्रकार साजिद हुसैन यांचीही हत्या झाली. करिमा बलोच या भारतीय गुप्तचर संस्था रॉच्या एजंट आहेत असाही संशय पाकिस्तानला होता. आता त्यांच्या मृत्यूचा सखोल तपास पोलीस करत आहेत.