शीख नेते रिपुदमन सिंग मलिक (७५) यांची गुरुवारी कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. १९८५ मध्ये एअर इंडियाच्या विमानात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांचे नाव आले होते. मात्र, २००५ साली त्यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली होती. १९८५ मध्ये झालेल्या या घटनेत ३३१ जणांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा तपास करणार्या कॅनडाच्या तपास पथकानुसार व्हँकुव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानात सुटकेस बॉम्ब ठेवण्यात आला होता आणि नंतर तो टोरंटोमधील एअर इंडिया फ्लाइट १८२ मध्ये ठेवण्यात आला होता. रिपुदमन सिंग मलिक यांनी या खटल्यातून निर्दोष सुटण्यापूर्वी चार वर्षे तुरुंगात घालवली होती. त्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाईसाठीची भरपाई म्हणून ९.२ दशलक्ष डॉलर मागितले होते. पण ब्रिटिश न्यायाधीशांनी त्यांचे भरपाईचे दावे नाकारले.
बब्बर खालसाशी होते संबंध!
पंजाबमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवणाऱ्या बब्बर खालसा या खलिस्तानी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप रिपुदमन सिंग यांच्यावर आहे. एअर इंडिया बॉम्बस्फोटाचा कथित सूत्रधार तलविंदर सिंग परमार याचेंही ते जवळचे सहकारी होते. १९९२ मध्ये पंजाबमध्ये पोलिसांनी त्याला ठार केले होते. त्यापूर्वी तलविंदर सिंग परमार परमार बब्बर खालसातील एका गटाचे नेतृत्व करत होते. रिपुदमन सिंग मलिक यांच्या मालकीच्या शाळेत त्यांचे दोन नातेवाईक काम करायचे.
रिपुदमन कॅनडाला कधी गेले?
रिपुदमन सिंग मलिक १९७२ मध्ये कॅनडाला गेले. सुरुवातीला त्यांनी तिथे कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते व्हँकुव्हर स्थित १६,००० सदस्यांच्या खालसा क्रेडिट युनियन (केसीयू) चे अध्यक्ष देखील बनले. केसीयूची मालमत्ता ११० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त होती. ते सतनाम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षही होते. कॅनडाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पंजाबी भाषा आणि शीख इतिहास शिकवणाऱ्या शाळा त्यांनी चालवल्या.
भारतात कधी आले होते रिपुदमन सिंग?
रिपुदमन सिंग शेवटचे 2019 च्या डिसेंबर महिन्यात भारतात आले होते. रिपुदमन सिंग यांची भारत भेट २५ वर्षांच्या अंतराने झाली. त्यांना भारत सरकारने ‘ब्लॅकलिस्ट’ केले होते. नरेंद्र मोदी सरकारने त्यांचे नाव या यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०१९ मध्ये, भारत सरकारने ३५ वर्षे जुन्या काळ्या यादीतून परदेशात राहणाऱ्या ३१२ शीखांची नावे काढून टाकली होती.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी रिपुदमन सिंग मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शीखांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांसाठी त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या पत्रात १९८४ च्या दंगलीची प्रकरणे पुन्हा उघडण्यासह भाजपा सरकारने शीखांसाठी घेतलेल्या विविध योजनांचा उल्लेख केला आहे.
भाजपाने २०१९ मध्ये त्यांच्या भेटीदरम्यान सुवर्ण मंदिरातील त्यांच्या फोटोसह पक्षाच्या वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील त्यांच्या पत्राचा संदर्भ दिला होता.