सिद्धार्थ खांडेकर

ब्रिटनमध्ये सत्तारूढ हुजूर पक्षाच्या (कन्झर्व्हेटिव्ह किंवा टोरी) नेतेपदावरून पंतप्रधान बोरिस जॉन्सन पायउतार झाले आहेत. नवीन नेतानिवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, डझनावरी नावे पुढे आली आहेत. ऑक्टोबरपर्यंत हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यरत राहण्याचा मनसुबा जॉन्सन यांनी जाहीर केला. परंतु त्यांना तातडीने पदावरून दूर करता यावे, यासाठी नेतानिवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा टोरी पक्षातील धुरिणांचा मानस आहे.

नेतानिवड कशी होते?

नेतानिवडीचे वेळापत्रक पुढील आठवड्यात प्रसृत होण्याची शक्यता आहे. नेतेपदाच्या इच्छुक उमेदवारांना किमान ८ खासदारांचा पाठिंबा असणे अनिवार्य आहे. दोनपेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असतील, तर अंतिम दोन उमेदवार शिल्लक राहीपर्यंत खासदारांचे मतदान होत जाते. पहिल्या फेरीत १८ पेक्षा कमी मते मिळालेला उमेदवार बाद होतो. पुढील फेरीत साधारण ३६पेक्षा कमी मते मिळालेला उमेदवार बाद होतो. सर्वांनाच ३६पेक्षा अधिक मते मिळाली, तर सर्वांत कमी मते मिळालेला उमेदवार बाद होतो. दोन उमेदवार शिल्लक राहीपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहते. दोन उमेदवारांतून अंतिम विजेत्याची निवड मात्र केवळ खासदारांमार्फत न होता, व्यापक स्तरावर टोरी पक्षाच्या अधिकृत सदस्यांकडून मतदानाद्वारे होते. यात विजयी ठरलेला उमेदवार पक्षनेता आणि पंतप्रधान होतो.

या प्रक्रियेचे वेळापत्रक आखणारी ‘१९२२ कमिटी ऑफ बॅकबेंचर्स’ हे काय प्रकरण आहे?

ब्रिटिश संसदीय लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षाशी संबंधित निवडणुका आणि पदाधिकारी निवडीचे अधिकार ढोबळ मानाने अशा खासदारांकडे असतात, जे सरकारमध्ये सहभागी नसतात किंवा त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत पद नसते. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ही मंडळी मागे बसतात, म्हणून त्यांना ‘बॅकबेंचर्स’ असे संबोधले जाते. या मंडळींची समिती पहिल्यांदा १९२३मध्ये कार्यरत झाली. त्या समितीत १९२२मध्ये निवडून आलेले खासदार सहभागी झाले, म्हणून समितीचे नाव ‘१९२२ कमिटी ऑफ बॅकबेंचर्स’ असे पडले. म्हणायला बॅकबेंचर्स पण त्यांच्यावर पक्षांतर्गत निवडणुकांची, तसेच पार्लमेंटरी पक्षनेता निवडण्याची किंवा त्याच्या विरोेधात अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यावर मतदान घडवून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. या प्रक्रियेत कोणत्याही सत्तापदस्थ खासदाराचा, पंतप्रधान वा मंत्र्याचा हस्तक्षेप खपवून घेतला जात नाही! 

टोरी नेतेपदी किंवा पंतप्रधानपदी निवडणून येण्याची सर्वाधिक संधी कोणाला आहे?

बोेरिस जॉन्सन यांच्या नेतेपदाच्या राजीनाम्यानंतर अनेक जण स्पर्धेत दाखल झाले आहेत. यांत माजी अर्थमंत्री ऋषी सुनाक यांची दावेदारी सर्वांत प्रबळ मानली जात आहे. करोना काळातही आर्थिक शिस्त सांभाळून ब्रिटिश अर्थव्यवस्था रुळांवर आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. करकपात न करताही आर्थिक विकास साधता येतो, या मताचे ते आहेत. मात्र त्यांच्या पत्नीविषयी करभरणा प्रकरणातून उद्भवलेला वाद आणि टाळेबंदी नियम मोडल्याचा ठपका या प्रतिकूल बाबी आहेत. परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांचे नावही चर्चेत आहे. त्यांनी जॉन्सन यांना पाठिंबा जाहीर केला होता आणि ही बाब कदाचित त्यांच्या विरोधात जाणारी ठरते. परराष्ट्र व्यवहार आघाडीवर संमिश्र कामगिरी दिसून येते. साजिद जाविद हे पाकिस्तानी मूळ असलेले खासदार आणि माजी मंत्री स्पर्धेत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१९मध्ये नेतेपदाची निवडणूक लढवली होती. आरोग्य आणि अर्थ अशी महत्त्वाची खाती हाताळली आहेत. स्पष्टवक्तेपणाबद्दल ते विशेष ओळखले जातात. विद्यमान अर्थमंत्री नधीम झहावी यांनी करकपातीचे आणि संरक्षण उत्पादन वाढवण्याचे आश्वासन देऊन लोकानुनयी वाट पकडली आहे. मूळ इराकचे असलेले झहावी लसीकरण कार्यक्रम परिणामकारकतेने राबवणारे म्हणून परिचित आहेत. याशिवाय गृहमंत्री प्रीती पटेल, अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन, खासदार जेरेमी हंट, राज्यमंत्री पेनी मोरडॉन्ट ही नावेही स्पर्धेत आहेत.

ऋषी सुनाक यांना बुकमेकर्सची पहिली पसंती!

इंग्लिश बेटिंग मार्केटमध्ये ३० टक्क्यांहून अधिक सटोडिया किंवा बुकमेकर्सनी ऋषी सुनाक यांना पसंती दिली आहे. त्यांच्या मागोमाग ट्रुस आणि मोरडॉन्ट यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे बहुतेक उमेदवार करपातीची आश्वासाने देत असताना, सुनाक यांनी मात्र तूर्त त्या मार्गाने न जाण्याचे ठरवले आहे. तरीही विश्लेषक आणि बुकमेकर्स यांच्या मते त्यांची दावेदारी प्रबळ आहे.

Story img Loader