संपदा सोवनी
‘मेटा’तर्फे करण्यात आलेल्या एका पाहणीत अनेक भारतीय स्त्रियांनी फेसबुक हे समाजमाध्यम वापरणे लक्षणीयरीत्या बंद केले असल्याचे समोर आले आहे. २०२१ अखेरपर्यंतच्या जवळपास दोन वर्षांतील फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या मांडणाऱ्या या पाहणीचे निष्कर्ष फेब्रुवारीत कंपनीच्या एका अंतर्गत व्यासपीठावर मांडण्यात आले होते. आधी बाहेर न आलेल्या या माहितीसंदर्भातले वृत्त ‘रॉयटर्स’ने दिल्यानंतर सध्या त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
फेसबुककडे स्त्रियांची पाठ का?
वापरकर्त्यांमध्ये स्त्रियांचा सहभाग वगळून ‘मेटा’ला भारतात प्रगती करताच येणार नाही, असा धोक्याचा इशारा देणाऱ्या या पाहणीनुसार स्त्रियांना फेसबुक हे माध्यम फारसे सुरक्षित वाटत नाही. आपण पोस्ट करत असलेल्या कंटेंट वा फोटोंच्या सुरक्षिततेबद्दल असलेली शंका आणि विनाकारण अनोळखी लोकांकडून संपर्क साधला जाण्याची भीती यामुळे अधिकाधिक भारतीय स्त्रिया फेसबुकपासून दूर जात असल्याचे ही पाहणी नोंदवते. या पाहणीनुसार, स्त्रियांनी फेसबुक वापरणे कमी करण्याबरोबरच फेसबुकवरचा अश्लील कंटेंट, भारतात प्रांतानुसार स्थानिक भाषा बदलणे, शिक्षणाचा अभाव या गोष्टींमुळेही फेसबुकच्या वापरकर्त्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. यासह फेसबुक ॲपच्या वापराची काठिण्यपातळी आणि ज्या वापरकर्त्यांना व्हिडिओ कंटेंट आवडतो, त्यांना फेसबुक पुरेसे रंजक न वाटणे, हेही अडसर ठरले आहेत.
‘मेटा’चे म्हणणे काय?
प्रचंड लोकसंख्या आणि त्यातही मोबाईल व डेटा वापरणाऱ्यांची मोठी संख्या, यामुळे समाजमाध्यमांसाठी भारत ही महाकाय बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतीय स्त्री वापरकर्त्यांमध्ये झालेली घट हे फेसबुकपुढचे मोठे आव्हान मानले जात आहे. ‘मेटा’ने मात्र हे नाकारले असून सात महिन्यांपूर्वीच्या पाहणीच्या आधारे असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे ‘मेटा’चे म्हणणे आहे.
आकडेवारी काय सांगते?
भारतात इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक फेसबुक वापरकर्ते आहेत. नोव्हेंबर २०२१ च्या आकडेवारीनुसार भारतात ४५ कोटी फेसबुक वापरकर्ते आहेत. त्यामुळे भारतात फेसबुकला कसा विस्तार करता येईल याचा विचार करणे आवश्यक असून भारतातील वापरकर्ते वाढल्यामुळे जागतिक स्तरावरच फेसबुकला फायदा होईल, असे पाहणीत नोंदवले गेले आहे.
फेसबुक वापरात लिंगाधारित असमानता का?
भारतात इंटरनेट आणि फेसबुक दोन्हीच्या वापरकर्त्यांचे प्रमाण व्यस्त आहे. फेसबुक वापरणाऱ्या पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा खूपच जास्त आहे. गेल्या वर्षी फेसबुकच्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांमध्ये ७५ टक्के पुरुषच होते.
पाहणीतील निरीक्षणे काय सांगतात?
- फेसबुक वापरणाऱ्या ७९ टक्के स्त्रियांनी आपण पोस्ट करत असलेल्या कंटेंट वा छायाचित्रांचा गैरवापर होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे.
- फेसबुकवर अश्लील कंटेंट बघायला मिळाल्याचे नोंदवणाऱ्या एकूण वापरकर्त्यांचे प्रमाणही भारतात अधिक आढळले आहे.
- विशेष म्हणजे अनेक स्त्रियांनी आपल्याला फेसबुक वापरायला कुटुंबातून मनाई आहे, असे सांगितले.
फेसबुकवर अनेकदा स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर अज्ञात लोकांकडून ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ येतात किंवा स्त्रीने जर ‘लॉक्ड प्रोफाईल’ या ‘प्रायव्हसी सेटिंग’ची काळजी घेतलेली नसेल तर अज्ञात लोकांकडून तिच्या छायाचित्रांवर कमेंट केल्या जातात आणि ते स्त्रियांना मनस्ताप देणारे ठरते. आपले फेसबुक प्रोफाईल ‘लॉक’ करण्याची सोय फेसबुकने २०२० मध्ये उपलब्ध करून दिली. जून २०२१ पर्यंत ३४ टक्के भारतीय स्त्रियांनी त्याचा वापर केला होता.
फेसबुकने २०१९मध्ये आपण केवळ स्त्रियांना फेसबुकवर सुरक्षितता मिळावी म्हणून असुरक्षित कंटेंट हटवण्यासाठी खास टीम नेमली असल्याचे जाहीर केले होते.
१६ टक्के व्यक्तींना कुटुंबातून फेसबुक वापरास मनाई!
‘मेटा’च्या अंतर्गत पाहणीत फेसबुकविषयी माहिती असलेल्या, पण फेसबुक न वापरणाऱ्या १५ ते ६४ या वयोगटातील व्यक्तींकडून फेसबुक न वापरण्याची कारणे जाणून घेण्यात आली होती. त्यात २७ टक्के व्यक्तींनी आपल्याला फेसबुक वापरण्यात काही रस वाटत नसल्याचे सांगितले. २४ टक्के व्यक्तींच्या मते फेसबुक वापरणे अवघड आहे, तर १६ टक्के व्यक्तींना कुटुंबातून फेसबुक वापरास मनाई होती.