सुशांत मोरे
ऐन गर्दीच्या वेळी विलंबाने धावणाऱ्या लोकल आणि त्यामुळे प्रवाशांना सहन करावा लागणारा मनस्ताप नेहमीचाच झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेवर असेच चित्र आहे. त्यातून प्रवाशांची सुटका झालेली नाही. लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेला गेल्या काही महिन्यांपासून विलंबाचे ग्रहणच लागले आहे. त्याचा प्रवाशांना नाहक मनस्ताप होत आहे. याशिवाय मेल-एक्स्प्रेससाठी ठाणे-दिवा स्वतंत्र मार्ग उपलब्ध होऊनही लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारला नसल्याचा अनुभव मध्य रेल्वेच्या प्रवाशांना येत आहे.
मध्य रेल्वेचे वेळापत्रक का कोलमडते?
सिग्नल, ओव्हरहेड वायर, पेन्टोग्राफ, गाडीतील बिघाड अशी कारणे लोकलच्या विलंबामागे आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये या बिघाडांनी कळस गाठला. मात्र, सप्टेंबरमध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-खोपोली व सीएसएमटी-कसारा, हार्बरच्या सीएसएमटी-वाशी, पनवेल, तसेच ट्रान्स हार्बरच्या ठाणे-वाशी व ठाणे-पनवेल उपनगरीय रेल्वेचा वक्तशीरपणा ९३.९६ टक्के आणि ऑक्टोबरमध्ये ९५.१२ टक्के असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. दादर स्थानकात २२ सप्टेंबरला सकाळी ६च्या सुमारास सर्व मार्गांवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील १६ मेल-एक्स्प्रेस आणि १७४ लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. ऑक्टोबरमध्ये ठाणे स्थानकात सर्व मार्गावर सिग्नलमध्ये बिघाड झाला. सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळेही वेळापत्रक कोलमडले. तांत्रिक बिघाडाबरोबरच काही वेळा लोकलच्या मोटरमनकडून लाल सिग्नलचे उल्लंघन होते. त्याचे उदाहरण म्हणजे, ३० सप्टेंबरला ठाणे स्थानकाजवळ एका जलद लोकलच्या मोटरमनने लाल सिग्नल मोडल्यामुळे तांत्रिक समस्या उद्भवली. परिणामी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून ठाणे स्थानकाजवळ लोकलच्या रांगा लागल्या. यासह अनेक कारणे लोकलच्या विलंबास कारणीभूत ठरत आहेत.
कमी कालावधीत देखभाल-दुरुस्तीचे आव्हान?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नव्हे, रेल्वेच्या वाहतुकीसाठी मेगा ब्लॉक खूप महत्त्वाचा आहे. रूळ, सिग्नल, ओव्हरहेड वायरसह, लोकल दुरुस्तीसह अन्य दुरुस्ती कामे, रुळांखालील खडी नव्याने भरणे अशी नियमित कामे करण्यासाठी रेल्वेला ठराविक वेळेची गरज असते. परंतु वाढलेल्या लोकल फेऱ्यांमुळे मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेची वाहतूक मध्यरात्री अडीच ते तीन तासच बंद असते. आठवडाभर दर रात्री मिळणाऱ्या अडीच ते तीन तासांच्या अवधीत रेल्वेची विविध देखभाल-दुरुस्तीची कामे होणे शक्य नसते. ही कामे रविवारच्या चार ते पाच तासांच्या मेगा ब्लॉकच्या काळात पार पाडण्याचे आव्हान दर रविवारी रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांना पेलावे लागते. याशिवाय नवीन मार्गिका टाकणे, रुळांवरील पादचारी किंवा उड्डाणपूल पाडणे, त्यावर गर्डर बसविणे अशा कामांसाठी मोठ्या कालावधीचे ब्लाॅक घ्यावे लागतात. मिळालेल्या कमी कालावधीत ही कामे पूर्ण करणे आव्हानात्मक असते.
ठाणे-दिवा स्वतंत्र मार्गिहा होऊनही दिलासा का नाही?
ठाणे ते दिवा दरम्यान स्वतंत्र मार्गिका नसल्याने जलद लोकलसाठी असलेल्या मार्गिकांवरूनच मेल, एक्स्प्रेसही जात होत्या. ठाणे ते दिवादरम्यान अप व डाऊन जलद मार्गिकेवर मेल, एक्स्प्रेस किंवा लोकल गाडीला प्राधान्य देताना यातील काही गाड्या अर्धा ते पाऊण तास थांबवण्यात येत होत्या. यामुळे मुंबईपर्यंतच्या किंवा कल्याणपुढील प्रवासासाठी अधिक वेळ लागत असल्याने मेल, एक्स्प्रेसचे वेळापत्रकही कोलमडत असे. त्यामुळे ठाणे ते दिवा-पाचवी सहावी मार्गिका तयार करण्यात आली. ती १९ फेब्रुवारीपासून वापरात आली. या मार्गिकेमुळे सुरुवातीला ३६ लोकल फेऱ्यांची भर पडली त्यापैकी दोन विनावातानुकूलित आणि ऊर्वरित वातानुकूलित फेऱ्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्याने आणखी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढल्या. त्यातच पाचव्या-सहाव्या मार्गावरूनच मेल, एक्स्प्रेस चालविणे आवश्यक असतानाही तिसऱ्या-चौथ्या मार्गाचाही वापर केला जात असल्याने वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो.
विशेष मेल-एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकल फेऱ्यांवरही परिणाम?
मध्य रेल्वे मुंबई विभागातून दिवसभरात साधारण ९० हून अधिक मेल-एक्स्प्रेस सुटतात. तेवढ्याच एक्स्प्रेस मुंबई विभागात येतात. याशिवाय उन्हाळी आणि हिवाळी विशेष गाड्या, गणपती, होळी आणि ख्रिसमसनिमित्त विशेष गाड्या मोठ्या प्रमाणात सोडल्या जातात. ऑक्टोबरपासून २५८ विशेष फेऱ्या मध्य रेल्वेने सोडल्या असून त्यातील ९० टक्के विशेष फेऱ्या मुंबईतून सोडल्या आहेत. एकंदरीतच उपलब्ध मार्गिकेवर येणारा ताण पाहता पाचव्या-सहाव्या मार्गाव्यतिरिक्त उपनगरीय गाड्यांसाठी असलेल्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही वापर मध्य रेल्वेला करावा लागत आहे. त्यामुळे पाचवी-सहावी मार्गिका होऊनही गर्दीच्या काळात अन्य मार्गिकेचा वापर करावा लागत असल्याने लोकल वेळापत्रकावर त्याचा परिणाम होत आहे.
रेल्वे डब्यातील आपत्कालीन साखळीची डोकेदुखी कशी?
आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना गाडी थांबविता यावी, यासाठी लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये ‘साखळी’ असते. मात्र याचा विनाकारण किंवा किरकोळ कारणांसाठी प्रवासी वापर करून रेल्वेगाड्या थांबवत आहेत. लोकल किंवा एक्स्प्रेस पकडताना एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला काही कारणास्तव डब्यात चढता न येणे, फलाटावरच सामान विसरणे, चुकीची गाडी पकडल्याने पुन्हा दुसऱ्या स्थानकात उतरण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक कारणांमुळे प्रवासी आपत्कालीन साखळी खेचतात. साखळी खेचल्यानंतर गाडी पुन्हा सुरू होण्यासाठी चार मिनिटांहून अधिक कालावधी लागतो. गाडी थांबल्याने त्याचा परिणाम मागून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या लोकल तसेच मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर होतो. धावत्या गाडीत साखळी खेचल्यावर ब्रेकच्या पोकळ कक्षात मोकळी हवा शिरते आणि त्यामुळे आपोआप ब्रेक लागतो. अशा वेळी गाडी पुढे जाणे शक्य नसते. या घटनांमुळे लोकल किंवा मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बिघडते.
लोकलच्या वेगावर मर्यादा का?
रुळांखाली खडी टाकणे, त्याखाली लाकडी किंवा लोखंडी स्लीपर्स बसविणे, नवीन रुळ यांसह अन्य कामांसाठी तसेच वळणदार मार्गिका असल्याने मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, खोपोली, कसारा या मुख्य तसेच सीएसएमटी-पनवेल हार्बर, ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर विविध ठिकाणी लोकल गाड्यांसाठी वेगमर्यादा निश्चित केली जाते. सध्या ४०पेक्षा अधिक ठिकाणी तात्पुरत्या कालावधीसाठी वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. वळणदार मार्गिका असल्याने अपघाताचा धोका संभवतो म्हणून कायमस्वरूपी लोकल गाड्यांच्या वेगावरही मर्यादा असते. १५,२०,३०,४० आणि ५० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आखून दिलेली असते. त्यामुळे त्या-त्या पट्ट्यात लोकलचा वेग मोटरमनकडून कमी ठेवला जातो.