ब्रिटीश उच्चायुक्तालयाने अलीकडेच ही माहिती उघड केली आहे की युनायटेड किंगडम (यूके) ने जून २०२२ पर्यंत एका वर्षात भारतीय विद्यार्थ्यांना १,१७,९६५ ‘स्पॉन्सर स्टडी व्हिसा’ जारी केले आहेत. जी २०१९ च्या तुलनेत २१५ टक्के वाढ आहे. कारण, तेव्हा केवळ ३७ हाजर ३९६ व्हिसा जारी करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच, ‘यूके’कडून सर्वाधिक ‘स्पॉन्सर स्टडी व्हिसा’ मिळवण्यात भारत अव्वल स्थानावर असून, चीनलाही मागे टाकले आहे. जाणून घेऊयात कोविड निर्बंध शिथिल केल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ‘स्पॉन्सर स्टडी व्हिसा’साठी का अर्ज करत आहेत?

ब्रिटनमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी व्हिसा मिळण्याचं प्रमाण हे जवळपास १०० टक्के आहे. याचा अर्थ, जे कुणी विद्यार्थी ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यासाठी व्हिसा अर्ज करतात, त्या सगळ्यांना व्हिसा मिळतो. त्यामुळे जून २००२ पर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या व्हिसाची संख्या १ लाख ८० हजार आहे म्हणजेच व्हिसासाठी आलेल्या अर्जांची संख्या देखील जवळपास तितकीच आहे. तसेच, अमृतसरमधील धवन एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे मालक चित्रेश धवन यांनी माहिती दिली की, ‘स्पॉन्सर स्टडी व्हिसा’ केवळ ३ ते ४ आठवड्यांत येतो, जे विद्यार्थ्यांमधील प्रमुख आकर्षण आहे.

यूके ‘स्टडी व्हिसा’साठी इतके विद्यार्थी का अर्ज करत आहेत? –

सध्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणास परदेशात जाण्यासाठी यूकेला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. या शतकाच्या पहिल्या दशकात, भारतातील बहुतांश विद्यार्थी यूकेकडे निघाले होत, परंतु २००६ -०७ पर्यंत हा कल ऑस्ट्रेलियाकडे वळल्याचे दिसून आले. २०११-१२ पर्यंत दरवर्षी भारतातून लाखोंच्या संख्येत विद्यार्थी जात होते. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे पंजाबचे होते. त्यानंतर काही वर्षांनी विद्यार्थ्यांचा ओढा कॅनडाकडे वाढला आणि मागील जवळपास एक दशकापासून कॅनडा हे भारतातील विद्यार्थ्यांसह आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. आजही जेव्हा मोठ्या संख्येने विद्यार्थी यूकेला जात आहेत, तेव्हा त्यापैकी बहुतेकांनी प्रथम कॅनडाला जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

परंतु, कॅनेडियन व्हिसासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका व काळजी निर्माण करत आहे आणि अशा परिस्थितीत, ते यूकेची संधी गमावू इच्छित नाहीत, असे देखील आणखी एका सल्लागाराने सांगितले. तसेच, पंजाबमधील मोठ्याप्रमाणावर विद्यार्थी हे एकतर कॅनडाकडून आलेल्या नकाराला समोरे जात आहे किंवा तत्काळ उड्डाण करू इच्छित आहेत, ज्यातून यूकेसाठीचे त्यांचे प्राधान्य स्पष्ट होते, अशीही त्यांनी माहिती दिली. याशिवाय, भारतातील त्या १ लाख ८० हजार व्हिसा धारकांपैकी जवळपास ४० टक्के विद्यार्थी पंजाबचे होते, असेही ते म्हणाले.

“मी जानेवारीत प्रवेश घेण्यासाठी गेल्या वर्षी कॅनडामध्ये अर्ज केला होता. पण माझा व्हिसा कोणतेही कारण नसताना नाकारण्यात आला होता, आता मी पुन्हा अर्ज केला आहे. जर प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर मी यूकेला जाईन.” असं मागील तीन महिन्यांपासून व्हिसाची वाट पाहत असलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितलं आहे.

एका सल्लागाराने सांगितले की कॅनडात विद्यार्थी व्हिसा अर्जांमध्ये अचानक झालेली वाढ हे देखील नकार येण्यामागचे एक कारण आहे. त्यामुळे “एक वर्ष किंवा सहा महिन्यांचे नुकसान टाळण्यासाठी, विद्यार्थी आता यूकेसाठी अर्ज करत आहेत. जिथे व्हिसा प्रक्रिया जलद आणि जवळजवळ निश्चित आणि छोटी आहे,” धवन म्हणाले की, यूकेमध्ये देखील विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर वर्क परमिटसाठी चांगल्या सुविधा मिळत आहेत. याशिवाय, यूके व्हिसा प्रक्रिया पारदर्शक आहे.

पाश्चात्य देशांमध्ये अधिकाधिक ‘स्टडी व्हिसा’ जारी करण्याची शर्यत –

यूके कडून अनेक ‘स्टडी व्हिसा’जारी करण्याचे आणखी एक कारण म्हणजे अनेक पाश्चात्य देशांमध्ये अधिकाधिक ‘स्टडी व्हिसा’ जारी करण्याची शर्यत आहे. कारण शिक्षण क्षेत्र या देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देत आहे. जेथे लाखो विद्यार्थी दरवर्षी अभ्यासासाठी येतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why are more and more indian students going to uk to study msr