गौरव मुठे

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) चौथ्या तिमाहीच्या निकाल हंगामाची दमदार सुरुवात करत पहिल्यांदाच ५० हजार कोटींपुढील तिमाही महसुलाचा टप्पा ओलांडणारी कामगिरी केली. त्यापाठोपाठ या क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसनेदेखील सरलेल्या मार्च तिमाहीत चांगली कामगिरी करत ५,६८६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली. एकीकडे कंपन्यांच्या नफ्यात उत्तरोत्तर वाढ सुरू असली तरी दुसरीकडे आयटी कंपन्यांना कर्मचारी गळतीच्या (ॲट्रिशन) वाढत्या समस्येने ग्रासले आहे.

उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांतील नोकऱ्याही एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडल्या जाण्यामागची नेमकी कारणे जाणून घ्यायला हवीत.

‘ॲट्रिशन रेट’ म्हणजे काय?

कंपनीतील प्रस्थापित नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण म्हणजे ‘ॲट्रिशन रेट’ (कर्मचारी गळतीचे प्रमाण) होय. एका ठरावीक कालावधीत कंपनी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येला, त्या ठरावीक कालावधीत कंपनीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सरासरी संख्येने भागले जाते. त्यावरून गळतीचे प्रमाण म्हणजेच ‘ॲट्रिशन रेट’ काढला जातो. कर्मचारी जेव्हा स्वतःहून कंपनी सोडून जातात किंवा कंपनीकडून काढले जाते अथवा समूहातील कंपन्यांमध्ये अंतर्गत बदली करण्यात येते तेव्हा ते ‘ॲट्रिशन’ मानले जाते.

समजा एखाद्या कंपनीत वर्षाअखेर २०० कर्मचारी कार्यरत असतील आणि त्याच वर्षात ४० कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली तर ‘ॲट्रिशन रेट’ म्हणजेच गळतीचे प्रमाण २० टक्के इतके होईल.

आघाडीच्या कंपन्यांमध्ये ‘ॲट्रिशन रेट’ किती आहे?

टीसीएसमध्ये सरलेल्या मार्च तिमाहीत ‘ॲट्रिशन रेट’ १७.४ टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचला. कंपनीने सोमवारी (११ एप्रिल) चौथ्या तिमाहीचे निकाल सादर केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचारी गळतीच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच नजीकच्या काळात म्हणजेच पुढील दोन तिमाहीत कर्मचारी गळतीचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. याआधी आर्थिक वर्ष २०१५ मध्ये कर्मचारी गळतीचे प्रमाण १६.२ टक्क्यांवर पोहोचले होते. सध्याची परिस्थिती त्याहून बिकट असल्याची कबुली कंपनीने दिली असून त्यामध्ये सुधारणा होण्याआधी गळतीचे प्रमाण आणखी नवा उच्चांक गाठेल, असे भाष्य टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी केले.

टीसीएसपाठोपाठ इन्फोसिसमध्येदेखील कर्मचारी गळतीच्या प्रमाणाने नवीन उच्चांक गाठला आहे. मार्च तिमाहीमध्ये गळतीचे प्रमाण २७.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. याआधीच्या डिसेंबर तिमाहीमध्ये ते २५.५ टक्के होते. गेल्यावर्षी मार्च तिमाहीत मात्र हे प्रमाण १०.९ टक्क्यांपेक्षा कमी राहिले होते. अजूनही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झालेले नाहीत. मात्र विप्रो, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रमध्ये सरलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कर्मचारी गळतीचे हे प्रमाण अनुक्रमे २०.५० टक्के, १५.७० टक्के आणि २१ टक्के असे चढेच होते.

कंपन्यांकडून सरलेल्या वर्षात अत्युच्च कर्मचारी भरतीही…

चौथ्या तिमाहीत टीसीएसने ३५,२०९ कर्मचारी नक्त रूपात जोडले, ही एका तिमाहीतील मनुष्यबळात झालेली सर्वाधिक वाढ आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरीस कंपनीतील पटावरील कर्मचाऱ्यांची संख्या ५,९२,१९५ इतकी होती, ज्यामध्ये वर्षभरात १,०३,५४६ अशी सार्वकालिक उच्च वाढ झाली आहे. विद्यमान २०२२-२३ आर्थिक वर्षांत ४० हजार नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीचे नियोजन असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तर इन्फोसिसने सरलेल्या आर्थिक वर्षात ५४,३९६ कर्मचारी जोडले असून चौथ्या तिमाहीपर्यंत कंपनीतील पटावरील कर्मचाऱ्यांची संख्या ३,१४,०१५  एवढी झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीमध्ये २,५९,६१९ कर्मचारी कार्यरत होते. त्यात सरलेल्या वर्षात सुमारे २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर विद्यमान २०२२-२३ आर्थिक वर्षांत ५० हजार नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीचा टीसीएसचा मानस आहे.

कर्मचारी गळतीचे प्रमाण का वाढते आहे?

– बड्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्या सतत कुशल आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे कंपन्यांकडून अशा कर्मचाऱ्यांना मोठा पगार दिला जातो. बौद्धिक भांडवलावर आधारित या उद्योगात गुणी मनुष्यबळ हीच सर्वात मोठी मत्ता असते. कुशल आणि अनुभवी अशा दोन्ही गुणांचा मिलाफ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता हे या कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. देशात नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांनीही चांगलाच जोम धरला आहे. या तंत्रज्ञानधारित नवागत कंपन्या ग्राहकांना कमी दरात सेवा देत असल्याने त्यांच्याकडील कामात वाढ होत आहे. त्यामुळे या कंपन्या मोठ्या कंपन्यांमधील अनुभवी कर्मचाऱ्यांना अधिक पगार देऊन सेवेत घेण्यासाठी उत्सुक असतात.

कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने स्वतःहून कंपनी सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. बऱ्याचदा कंपन्यांकडून कर्मचाऱ्याला नेमके काय हवे आहे? किंवा त्याच्यावर सोपविलेले काम अथवा त्याला जी भूमिका देण्यात आली आहे, त्याबाबत संबंधित कर्मचारी समाधानी आहे का याचीही दखल घेतली जात नाही, हेही एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे.

कर्मचारी गळतीचा कंपनीवर काय परिणाम होतो?

अनुभवी कर्मचारी निघून गेल्याचा कंपनीच्या कामगिरीवर निश्चितच नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून कंपनीबद्दलचे विश्लेषण मांडताना, कर्मचारी गळतीचे प्रमाण हा एक महत्त्वाचा निकष असतो. शिवाय नवीन कर्मचारी भरतीच्या प्रक्रियेवर बऱ्याचदा कंपन्यांकडून मोठा खर्च केला जातो. शिवाय अशा कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर खर्च आणि वेळही द्यावा लागतो. विशिष्ट विभागातील कर्मचाऱ्यांच्या जाण्याने त्या विभागातील इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण स्वाभाविकपणे येतो, ज्यातून त्यांची कार्यक्षमताही बाधित होते. परिणामी त्यांचे मनोबल खचू शकते आणि कदाचित कंपनीच्या एकूण व्यावसायिक कामगिरीवरही यातून विपरीत परिणामाची शक्यता बळावते.

guarav.muthe@expressindia.com