एकीकडे जगभरात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर झपाट्याने वाढतो आहे. तर दुसरीकडे स्वित्झर्लंड एका असा देश आहे, जो इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. यासाठी स्वित्झर्लंड सरकारकडून कायदादेखील तयार करण्यात येणार आहे. स्वित्झर्लंड सरकारने हा निर्णय नेमका का घेतला आहे? याचं कारण नेमकं काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण: सोशल मीडियावर तुमची मतं दडपण्यासाठी खास ‘टूल्स’चा वापर? ‘ट्विटर शॅडो बॅन’ नेमकं आहे तरी काय?

इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय का?

रशियाकडून युरोपीय देशांना तेल आणि नैसर्गिक गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे हा पुरवठा स्थगित करण्यात आला आहे. परिणामता, युरोपीय देशांसमोर उर्जासंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंवरही वीजसंकट ओढवण्याची शक्यता आहे. मुळात स्वित्झर्लंडमध्ये ६० टक्के वीज जलविद्युत प्रकल्पांपासून तयार केली जाते. मात्र, हिवाळ्यात विजेची निर्मिती मंदावते. तसेच विद्युत उपकरणांचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा स्थितीत स्वित्झर्लंडला फ्रान्स आणि जर्मनीकडून वीजपुरवठा केला जातो. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे फ्रान्स आणि जर्मनीमध्येदेखील वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे विजेचा वापर मर्यादीत व्हावा, विजेची कमतरता भासू नये, या उद्देशाने स्वित्झर्लंड सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर तात्पूर्ती किंवा कायमस्वरुपी बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा – विश्लेषण : जगभरात Wednesday Dance ची क्रेझ; लेडी गागापासून ते सामान्य जनतेलाही थिरकायला लावणारा हा प्रकार आहे तरी काय?

विजेच्या वापराबाबत स्वित्झर्लंडमध्ये नवा कायदा

विजेच्या वापराबाबत स्वित्झर्लंड सरकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्याचा मसुदादेखील तयार करण्यात आला आहे. जर स्वित्झर्लंडवर वीज संकट ओढवले, तर हा कायदा संपूर्ण लागू करण्यात येईल. अशा स्थितीत वीज वापराबाबतचे नियम आणि निर्बंध या कायद्याद्वारे सांगण्यात आले आहेत. वीजसंकट निर्माण झाल्यास खासगी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केवळ वैद्यकीय, न्यायालयीन आणि खरेदीसाठीच करता येईल, असे या कायद्यात म्हटले आहे.

हेही वाचा – विश्लेषण : दक्षिण कोरियातील नागरिक अचानक एक-दोन वर्षांनी लहान होणार; जाणून घ्या नेमका काय आहे हा प्रकार

विजेच्या वापराबाबत इतरही उपाययोजना

इलेक्ट्रिक वाहनांवर तात्पूर्ती किंवा कायमस्वरुपी बंदी घालण्याबरोबरच स्वित्झर्लंडमधील सरकार इतरही उपाययोजना करण्यात तयारीत आहे. वीज संकटाच्या काळात इमारतीचे तापमान २० अंश सेल्सिअस तर वाशिंग मशीनचे तापमान ४० अंश सेल्सिअस ठेवण्याचे निर्देश स्वित्झर्लंड सरकारकडून दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच दुकानांच्या वेळेमध्येदेखील बदल होण्याची शक्यता आहे. याचबरोबर नाट्यगृह आणि सिनेमागृहांवर बंदी घालण्याचा विचार स्वित्झर्लंड सरकारकडून केला जाऊ शकतो.