जगात शीतयुद्धानंतर प्रथमच अणुयुद्धाचा धोका निर्माण झाला असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे अण्वस्त्राबाबतचे वक्तव्य मस्करीत घेऊ नये, असे प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले असून रशियाच्या अण्वस्त्र हल्लाबाबतच्या धमक्यांवरून त्यांनी चिंताही व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे विधान करताना १९६२ मध्ये झालेल्या क्युबियन क्षेपणास्र हल्ल्यानंतर पहिल्यांदाच महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. बायडन यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिका पुन्हा एकदा रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, बायडन यांचा दावा नेमका किती योग्य आहे? आणि पुतीन यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं? जाणून घेऊया.

बायडन नेमकं काय म्हणाले?

“रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे अण्वस्त्राबाबतचे वक्तव्य मस्करीत घेऊ नये. जगात शीतयुद्धानंतर प्रथमच अणुयुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. १९६२ मध्ये झालेल्या क्युबियन क्षेपणास्र हल्ल्यानंतर पहिल्यांदाच महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मी पुतीन यांना खूप चांगले ओळखतो. ते जर जैविक हल्याबाबत बोलत असतील, तर मस्करीत बोलू शकत नाहीत”, अशी प्रतिक्रिया बायडन यांनी दिली आहे.

पुतीन काय म्हणाले होते?

सप्टेंबर महिन्यात रशिया-युक्रेन युद्धाबाबत बोलताना पुतीन यांनी रशियाकडे असलेल्या अण्वस्त्रसाठ्या संदर्भात एक वक्तव्य केले होते. “जर कोणी रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा रशियाला विभागण्याचा प्रयत्न केला, तर आमचा देश वाचवण्यासाठी आम्ही कोणताही मार्ग स्वीकारू शकतो. नाटो देश रशियाविरोधात अणुबॉम्ब किंवा जैविक हल्ले करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचे प्रत्युत्तर देण्याकरिता आमच्याकडे बरीच शस्रे आहेत”, असे ते म्हणाले होते.

बायडेन यांची भीती योग्य?

२१ सप्टेंबर रोजी पुतीन यांनी ३ लाख सैन्य भरती करणार असल्याचे जाहीर केले होते. पुतीन यांच्या या निर्णयावरून रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा वणवा इतक्यात शांत होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. याबरोबरच “पुतीन यांच्या वक्तव्या व्यतिरिक्त रशिया जैविक हल्ल्यांच्या तयारीत आहे, अशी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही”, असे बायडन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, बायडन यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, आम्ही जैविक हल्ल्याच्या धोक्याबाबत गंभीर आहोत, हे सांगण्याचा बायडन प्रयत्न करत होते, असे स्पष्टीकरणही बायडन प्रशासनाकडून देण्यात आले.

बायडन यांची यापूर्वीही टीका

रशिया युक्रेन युद्धाला सुरूवात झाल्यानंतर बायडन यांनी पुतीन यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. वॉरसॉ येथे झालेल्या भाषणात पुतीन यांच्या सारखा व्यक्ती सत्तेत राहू नये, असे ते म्हणाले होते. तर रशिया युक्रेन युद्धाला पुतीन हेच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली होती. मात्र, त्यानंतर व्हाईट हाऊसकडून याबाबत स्पष्टीकरणही देण्यात आले होते.

Story img Loader