भक्ती बिसुरे
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. नवजात बाळासाठी स्तनपान हे सर्वोत्तम औषध, टॉनिक मानले जाते. स्तनपान करावे, करू नये, कधी करावे, कसे करावे याबाबत अनेक समज गैरसमज समाजात पाहायला मिळतात. स्तनपानाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्याचा प्रघात आहे. त्यानिमित्ताने स्तनपान विषयावर अधिक माहिती देणारे हे विश्लेषण.
स्तनपान सप्ताह कशासाठी?
जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान जगभरात पाळला केला जातो. स्तनपान आणि त्याचे फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर या मोहिमेचे आयोजन करण्यात येते. स्तनपान करू इच्छिणाऱ्या मातांच्या संख्येत घट झाल्यानंतर बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर स्तनपानाबाबत आग्रह आणि जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आणि जागतिक आरोग्य संघटनेने स्तनपान जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात सुरुवात केली. नवजात बाळाला ते दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येते. प्रत्येकाला स्वयंनिर्णयाचे स्वातंत्र्य असले तरी स्तनपान हे आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्यासाठी आवश्यक आणि हिताचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात येते. स्तनपानाबद्दलचे गैरसमज दूर करण्याबरोबरच या काळात स्तनदा मातांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबतही या सप्ताहामध्ये जनजागृती केली जाते.
स्तनपान सप्ताहाचा इतिहास काय आहे?
जागतिक स्तनपान सप्ताह हा जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि UNICEF यांनी हाती घेतलेल्या सर्वांत मोठ्या संयुक्त मोहिमांपैकी एक आहे. वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग अॅक्शनद्वारे (WABA) त्याचे आयोजन केले जाते. स्तनपानाच्या फायद्यांना प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. १९९२पासून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जात आहे. स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणांचा प्रचार करण्यास या सप्ताहापासून सुरुवात केली जाते. स्तनपानातील समस्या, गरज आणि स्तनपानाभोवतीच्या समज गैरसमजांवर आधारित कथा आणि दंतकथा यांबाबत या काळात माहिती दिली जाते. एकोणिसाव्या शतकात बाजारपेठेतील बदलांबरोबर स्तनपानाला पर्याय म्हणून फॉर्म्युला मिल्कचे विविध प्रकार विक्रीसाठी आले. त्यानंतर नवजात मातांनी पारंपरिक स्तनपानापासून फारकत घेण्यास सुरुवात केली. त्याचे विपरीत परिणाम बालकांच्या आरोग्यावर दिसून आले. म्हणून स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणे अत्यावश्यक झाले आणि स्तनपान जनजागृती सप्ताहाची गरज निर्माण झाली.
स्तनपानाचे महत्त्व काय?
नवजात बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आयुष्यभर पुरेशी रोगप्रतिकारशक्ती त्याच्या शरीरात निर्माण करण्यासाठी आईचे दूध म्हणजेच स्तनपान अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळेच बाळाच्या जन्मानंतर पहिल्या एक तासात त्याला स्तनपान देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. वैद्यकीय परिभाषेत याला ‘गोल्डन अवर फीडिंग’ असे म्हटले जाते. हे दूध बाळाच्या शरीरात अनेक दीर्घकालीन रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते. या प्रतिकारशक्तीचे सुरक्षाकवच बाळाला आयुष्यभर उपयुक्त ठरते. काही भागांमध्ये समज आणि गैरसमजांमुळे बाळाच्या जन्मानंतर आईचे पहिले दूध पिळून टाकण्याची मात्र बाळाला न देण्याची पद्धत असते. ही पद्धत अत्यंत अशास्त्रीय, अयोग्य आणि बाळावर अन्याय करणारी आहे, असेही तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येते. स्तनपान हे केवळ बाळाच्याच नव्हे तर आईच्या आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. बाळाच्या जन्मानंतर येणाऱ्या नैराश्यावर (पोस्ट पार्टम डिप्रेशन) मात करण्याचा प्रभावी पर्याय म्हणून स्तनपानाकडे पाहिले जाते. स्तनपानामुळे आई आणि बाळ यांच्यातील भावनिक बंध विकसित होतो. संभाव्य टाईप टू डायबेटिस, संधिवात, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार, कोलेस्ट्रॉल, स्तनांचा तसेच अंडाशयाचा कर्करोग या आजारांचा आईला असलेला धोका कमी होतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर किमान पहिले सहा महिने बाळाला स्तनपानाव्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ देऊ नये. उलट केवळ आणि केवळ स्तनपानच द्यावे. शक्य असल्यास बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतही नियमितपणे स्तनपान देणे उत्तम असल्याचे जागतिक आरोग्य संघटना अधोरेखित करते.
स्तनपान की फॉर्म्युला मिल्क?
नवजात बाळाला स्तनपान द्यायचे की फॉर्म्युला मिल्क असा प्रश्न काळाबरोबर नवीन आईबाबांकडून विचारला जातो. या प्रश्नाला स्तनपान हेच उत्तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जाते. फॉर्म्युला मिल्कसारख्या उत्पादनांच्या जाहिराती करणे, त्यांचे नमुने वाटणे यासारख्या गोष्टींवर जगभरात सर्वत्र संपूर्ण बंदी आहे. वैद्यकीय कारणांसाठी जन्मानंतर बाळ आईपासून दूर असेल, अतिदक्षता विभागात असेल आणि आई स्तनपान करूच शकत नसेल तरी ह्यूमन मिल्क बँकेतील दुधाचा वापर बाळासाठी केला जातो. आईला स्तनपान देण्यास कोणतीही अडचण असेल तर ती सोडवण्यास प्रभावी समुपदेशन उपयुक्त ठरते. त्यामुळे अत्यंत दुर्मिळात दुर्मीळ केसमध्येच बाळासाठी फॉर्म्युला मिल्कचा पर्याय निवडला जातो. स्तनदा मातांचे दूध ह्यूमन मिल्क बँकेत साठवून ते गरजू नवजात बाळासाठी देण्याचे पर्यायही आता उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्तनपानाला पर्याय असू शकत नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येते.